मानवी जीवनात इंजिनवर चालणाऱ्या चारचाक्या जेव्हापासून आल्या तेव्हापासूनच समस्त मनुष्यगणाला या पृथ्वीतलावर इकडून तिकडे धावणाऱ्या कार्सबद्दल अप्रूप व आकर्षण. वाफेची इंजिन घेवून गाडी चालवणाऱ्याना तापवत फिरवणाऱ्या “स्टीम इंजिन गाड्या” पूर्वी वाफ व धूर सोडायच्या. असे म्हणतात की त्यावेळी गाडीवान गाडी चालवून चालवूनच काळा पडायचा. ते बघताना रस्त्यावर उभे असलेल्या पदचाऱ्यांना कौतुक वाटायचे अन हसूही यायचे. आता वातावरण बदललंय. नाऊ गाडीवान, प्रवासी एसीत मस्त गोरे होत घुमतात व धूर सर्व पदचाऱ्यांवर…

असो विषय तो नाहीय.. दोस्तहो, कार्सच्या इतिहासात आपल्या अनोख्या डिझायनर कार्स जगासमोर पेश करायचा प्रयत्न सतत नामांकित कंपन्या करत आल्या आहेत. त्यातूनच अनेक अनोख्या कार्स जागाने अनुभवल्या. कालांतराने नवीन कार्सनी त्यांची जागा घेतली अन या सुंदऱ्या संग्रहालयात वा हौशी मालकांच्या महालात विसावल्या. यापैकीच पाच अनोख्या कार्सची माहिती आज आपण बघायचीय…

1. स्टाउट स्कॅरब (1936 Stout Scarab) :

डिझायनर विल्यम स्टाउटच्या भन्नाट डोक्यातून तयार झालेली ही लक्झरीयस कार. पंख नसलेल्या विमानासारखी… मूळचा एअरक्राफ्ट इंजिनिअर असलेल्या या पठ्ठ्याने सुखकर विमान प्रवासाठी हवाईसुंदरी व खाणे पुरवावे ही कल्पना जगासमोर पहिल्यांदा मांडली. भले थोडे पैसे जास्त गेले तरी सामाजिक हित लक्षात घेऊन ती प्रवाश्यांनी हे योजना मान्यही केली. हाच विचार मनात ठेवून सुंदरी नसली तरी कारमधून प्रवास करताना खाणेतरी खाता यावे अशी विमानासारखी रचना असलेली ही “स्कॅरब” रस्त्यावर उतरवली. गाडीत चक्क झोपता ते पण आडवे होऊन येईल इतकी जागा, डायनिंग टेबल, इतर दोन चेअर्स असा जामानिमा. रोडवरील ही श्रीमंती डिनर कारला पॉवरफूल फोर्ड व्ही 8 रिअर इंजिन होते. दोन्ही बाजूला वक्राकार असणारी ही अल्युमिनिअमची ही बॉडी जास्त विकली गेली नाही परंतु एक अनोखे डिझाईन म्हणून आजही कार लव्हर्सच्या मनात टिकली आहे. (विकली..टिकली..हा.. हा)

2. उफ इलेक्ट्रिक (1942 Oeuf electrique) :

“उफ” ह्या फ्रेंच शब्दाचा उच्चार हुडकायला अन कळायला वेळ लागला. अर्थ मात्र कळाला अन तो म्हणजे “एक अंडे”. असो. पेट्रोल, डीझेल अशा इंधनाचा पुरेपूर साठा असताना चाळीशीत पॉल अर्झेन नावाच्या पॅरीसवासियाने हे “इलेक्ट्रिक अंडे” रस्त्यावर आणले. मूळचा पेंटर नंतर रेल्वे बोगी डिझायनर अशी कामे करणार हा कलाकार पॉल. काचेला गोलाकार आकार देऊन त्याने अल्युमिनिमचा जास्त वापर करून ही अनोखी तीन चाकी कार तयार केली. विद्युतघटांचा वापर करून वाहनाला गती द्यायची स्वप्नवत कल्पना त्याकाळी…?

उफ पॉल तू तो ग्रेट निकाला..

3. नॉर्मन टिंब स्पेशल (1947 Norman Timbs Special) :

दोस्तहो चित्रातील नॉर्मन टिंबची “स्पेशल” बघूनच तुम्हाला कार मालकाचा हेवा वाटत असेल. अविश्वसनीय अशी ही नॉर्मनची अफलातून निर्मिती. उजवीकडे दिसणारे फ्रंट माउंटेड कॉकपिट, वळणदार शेपटीसारखी मागील बाजू, अन त्याच बाजूला ब्यूक 8 इंजिन. अहाहा.. क्या बात है. नॉर्मन स्वतः रेसिंग इंजिनिअर. त्यामुळे स्पेशल एक रेसिंग कारचा फील अन लुक देते. हो..ना?

4. फायरबर्ड (1953 Firebird 1 XP-21) :

एअरो डायनॅमिक डिझाईन, अलॉय व्हील असे शब्द अलीकडचे. पण पन्नाशीत जनरल मोटर्सनी ते शब्द सत्यात उतरवले होते ते फायरबर्ड कारद्वारे. खरोखरच्या जेट फायटर प्लेनचे इंजिन, मागील बाजूस निमुळती होणारे पंख अन विमानासारखा टेल फिन, पुढील बाजूस टोकदार नाक, चालकासाठी बबल कॉकपिट, सारे काही हवाई. 26000 रिव्होल्युशन एका मिनिटाला अन त्याकाळी 370 अश्वशक्ती निर्माण करणारे शक्तिशाली इंजिन डोळ्यासमोरून कधी झूम करून जायचे ते कळायचेच नाही. जनरल मोटर्सची ही नॉट सो जनरल कार.

5. बुगाटी एअरोलाईट (1935 Bugatti Type 57S Aerolithe) :

पॅरीस एअरशो मध्ये 1935 ला जगासमोर आलेली ही एअरोलाईट केवळ प्रदर्शनातच दिसली हे सांगितले तर आश्चर्य वाटेल. बुगाटी कंपनीने काही कारणामुळे ही सुंदर कार रोडवर आणलीच नाही. संपूर्ण तयारी असूनसुद्धा कंपनीने उचललेले हे पाउल लोकाना बुचकळ्यात टाकून गेले. काहींच्या मते याच कारचे पार्टस वापरून नंतर बुगटीने टाईप 57 कार तयार केली अन विकली. चित्रात दिसणारी कार 2007 साली मुळचे डिझाईन, तैल रंग, अन पार्टस वापरून तयार केलेले मॉडेल आहे. आज अश्या मोजक्याच सुंदर बुगाटी जगात लाइव्ह आहेत.

633 total views, 1 views today