पाण्याशी खेळायला कोणाला आवडत नाही? बाथरूममध्ये शॉवर खाली “थंडे थंडे पानीसे नहाना चाहिये…” असे गुणगुणत (अन पाणी खरेच गार असेल तर कुडकुडत) पाण्याची मजा तर आपण वर्षभर घेतोच पण या वर्षातील काही दिवस निसर्गाचा जो अतिसुंदर “शॉवर” आपले रूप दाखवतो त्याचे गुणगान काही औरच.

दोस्तहो, थोडासा वेळ काढावा अन मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जावे, निसर्गाच्या कुशीत रममाण व्हावे, सोबत कोणीतरी आपले असावे अन.. निसर्गाचे ते सुंदर रूप या देही अनुभवावे अशी सर्वांचीच इच्छा असते. मेघालयातील क्रांग सुरीचा धबधब्याचे चित्र पाहून तुम्हालाही असेच वाटले असेल. हो..ना?

तर आज आपण अश्याच नैसर्गिक देणग्यांची माहिती घेणार आहोत. जुलै ते ऑक्टोबर या काळात तुमच्यासाठी हात फैलावून उभे आहेत हे दोस्त. जरूर स्वतःसाठी वेळ काढा अन प्रत्यक्ष अनुभवा भारतातले हे 5 अतिसुंदर धबधबे.

1. जोग फॉल्स, कर्नाटक :

भारतातला उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा हा जोगचा धबधबा. 253 मीटर उंचीचा अन 290 मीटर रुंदीचा हा धबधबा पहायला जगभरातून पर्यटक येथे येतात. (मेघालयातील नोह्कालीकाई 335 मीटर उंचीने पहिल्या क्रमांकावर). शिमोगा जिल्ह्यातील शरावती नदीचे हे रूप सुंदर तर आहेच पण रौद्रही. कारण पूर्ण भरात आल्यावर या फॉल्समधून 34 लाख टन पाणी प्रचंड वेगाने पायथ्याला कोसळते. त्यामुळे जवळ जाण्याचे धाडस करणे अशक्य. परंतु काही अंतरावरून हे फेसाळणारे पाणी अन त्याच्या आजूबाजूला असणारी हिरवाई पाहणे म्हणजे स्वर्गाचाच अनुभव.

खरे पाहता शरावती नदी इतर वेळी पायथ्याशी येताना अनेक छोट्या छोट्या धबधब्याच्या स्वरूपात येत असते. परंतु ऐन पावसाळ्यात मात्र हे सर्व एकत्र येवून एकच मोठा धबधबा बनतो. जगातील 11व्या क्रमांकाचा धबधबा म्हणून याची नोंद. “गिरसप्पा” व “जोगडा गुंडी” या नावाने देखील याची ओळख.

2. अथिरापिल्ली वॉटरफॉल, केरळ : Athirappilly Waterfalls

केरळ तसे बॅक वॉटर ब्युटी, अन अमाप निसर्ग सौंदर्याने भरलेले. देवाचे राहण्याचे ठिकाण म्हणून ज्याची ओळख त्या केरळ मधील हा अथिरापिल्ली वॉटरफॉल. चाल्कुडी नदीवरील वाझाचाल जंगलातील निर्माण झालेला हा धबधबा. उंचीने फक्त 80 फुट असला तरी आजूबाजूच्या जंगलामुळे या धबधब्याला एक अनोखे सौंदर्य प्राप्त झाले आहे. यातच जंगलातील दुर्मिळ वनस्पती, फुले अन पक्षी तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेवून जातात. रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात आपल्याच लयीत वाहणारे पाणी, सभोवतालीचे रम्य वातावरण अन दूर कोठेतरी झोपडीतील दिवे.. नक्कीच भारावून जाल.

3. इरुप्पू फॉल्स, कुर्ग : Iruppu Falls, Coorg

कुर्ग अन तिथले कॉफीचे मळे, मसाल्याची झाडे अन ते धुके. अनेकांनी तुम्हाल याबद्दल सांगितलेच असेल. कुर्ग मधील जगप्रसिध्द नागरहोले जंगलानजीकचा इरुप्पू धबधबा निसर्गरूपी चित्रकाराने साकारलेले विलक्षण चित्र. जंगलातील घळीमधून अनेक टप्प्यांना पार करत वेगाने खाली येणारे पाणी मन रोमांचित करते. एकदम सेफ असा हा धबधबा तुम्हाला कुशीत घेवून सर्वांगावर पाण्याच्या नाजूक थेंबात चिंब करतो. कुर्गला भेट दिली तर हा मायेचा ओलावा नक्की अनुभवा. अन हो नुसते प्रेक्षणीय स्थळ म्हणून नव्हे तर तुमचे पाप बीप धुवायचे असेल तरी डुबकी मारा कारण गंगेप्रमाणेच दक्षिणेत पापक्षालन करायचे काम या पाण्याकडे दिले आहे. असे मानले जाते.

4. दुधसागर, गोवा :

गोवा म्हटले की फेसाणारी … असे जवळपास आपणा सर्वांचे मत. पण याच गोव्यामध्ये दुधासारखे शूभ्र जलही प्रसिध्द आहे हे ही खरे. दोस्तहो, दुधसागर फॉल्सबद्दल मी जास्त सांगण गरजेचे नाही. कारण अनेक चित्रपटात या नयनरम्य नजाऱ्याने जान आणली आहे. चेन्नाई एक्प्रेसमध्ये आपण हे पाहिलेच. भारतातील 5 व्या क्रमांकाचा प्रसिध्द दुधसागर 310 मीटरवरून फोर्सने खाली येतो तेव्हा मध्यांनंतर चार भागात विभागतो. वेगाने खाली येणारे पाणी कड्या कपारीतून उड्या मारत जेव्हा खाली येत असते तेव्हा त्याचा दुधी रंग किंचितसा बदलून निळसर होतो.

एखाद्या परीकथेत सांगतात तसा एक पूल अन त्यावरून धावणारी ट्रेन दुधसागरच्या कहाणीला एक वेगळाच टच देतो. दोस्तहो, पुलाखालून प्रचंड वेगाने पुढे जाणारा दुधसागर, अन ट्रेन पुलावर आल्यावर बोगीत अंगावर येणारे ते कोटी कोटी तुषार..
निसर्गा.. गोव्याला मानवाने प्रसिध्द करायच्या आधी तू मानवासाठी येथे जे केलयस त्या बद्दल तुझे शतशः आभार.

5. चित्रकोट फॉल्स, छत्तीसगड :

भारतातला नायगारा म्हणून प्रसिध्द असा हा चित्रकोट. अमेरिका अन कॅनडाच्या बोर्डरवरील नायगारा आपल्या रुंदीमुळे जगात प्रसिध्द तसाच चित्रकोट भारतातला सर्वात रुंद धबधबा. उंची 29 मीटर. बस्तर जिल्ह्यातल जगदलपुर पासून 38 किलोमीटरवर हा धबधबा. विन्ध्य पर्वतातील इंद्रावती नदीने गोदावरी नदीत संगम करण्यापूर्वी केलेली ही करामत. ओरीजीनल नायगारा प्रमाणेच ह्या धबधब्याचा आकार हॉर्स शु म्हणजे घोड्याच्या नालीप्रमाणे. रुंदीला 300 मीटर इतका जास्त असल्यामुळे या धबधब्याचे आकर्षण जास्तच वाढले आहे. इतक्या रुंदीची पाण्याची चादर उंचावरून जेव्हा पायथ्याशी असलेल्या तळ्यात पडते तेव्हा ते दृश्य नयनरम्य असते. लोकल बोट्स तळ्यातून अगदी धबधब्यापाशी तुम्हाला घेवून जातात. सूर्यास्तावेळी चित्रकोटभोवती तयार झालेल्या बाष्पाच्या ढगावर पडणारी सूर्यकिरणे नक्कीच तुम्हाला मोहवतात.

दोस्तहो, स्मार्टला आयुष्यात अश्या अनेक लोभस अन लुभावाणाऱ्या ठिकाणांना भेट द्यावी वाटते. ही माहिती वाचल्यावर तुम्हालाही तसेच वाटत असेल. धकाधकीच्या लाईफमधून थोडा वेळ मिळवा, थोडे रुमानी व्हा अन पहा निसर्गाचे हे अनोखे लेणे…

979 total views, 1 views today