एप्रिल 14, सन 1912, म्हणजे 105 वर्षांपूर्वी रात्री 10.40मिनिटांनी टायटॅनिक जहाज बुडाले याबद्दल आपणास माहितच आहे. म्हणजे अनेकांनी तो पिक्चर बघितला असेल, काहींना त्यातील हिरो हिरॉईनची  ती बाहे फैलावून डेकवर उभे रहायची अदाकारी आवडली असेल अन त्यामुळे टायटॅनिक माहित असेल. कारण काही असो त्या महा जहाजाबाद्द्ल अनेकांंना माहिती आहे. परंतु आज स्मार्ट जी माहिती तुम्हाला देणार आहे ती कदाचित नविन असेल.

882 फुट लांबीचे ते धूड त्याकाळचे जगातील सर्वात मोठे मनुष्य निर्मित जहाज म्हणून ओळखले गेले. लेगेचच ते गेले ती गोष्ट वेगळी. परंतु एका दिवसात 600 टन कोळसा जाळणारे ते तरंगते जहाज म्हणजे एक आश्चर्यच होते. खोऱ्याने कोळसा सतत बॉयलरमध्ये टाकायलाच 176 जणांची टीम काम करायची.

वाचा तर दिवसात 100 टन राख समुद्रातून टाकणाऱ्या या टायटॅनिकला समुद्राने टाटा केला तेव्हाच्या गोष्टी..

१) नांव : आर.एम.एस. टायटॅनिक

टायटॅनिक एक रॉयल मेल सर्विस जहाज होते. म्हणून नावामागे आर. एम. एस. अशी बिरुदावली लावून हे फिरायचे. ब्रिटीश सरकारची पोस्टाची सेवा पुरवण्याचेही काम टायटॅनिककडे होते. त्यामुळे जहाजावर पोस्ट ऑफिस होते. ज्यामध्ये 3 क्लार्क काम करत होते. बोट बुडाली तेव्हा त्यावर अमेरिकेला पाठवलेली 70 लाख पोस्टाची पत्रे होती जी आजतागायत सापडली नाहीत.

परंतु जहाजावरील एवा हर्ट या सात वर्षाच्या मुलीने तिच्या आईला उद्देशून लिहिलेलं पत्र फार आश्चर्यरीत्या वाचले. जे नंतर दुर्दैवी जहाजावरील एकमेव पत्र म्हणून फार गाजले. त्याला लिलावात एक कोटीपेक्षा जास्त किंमत मिळाली.

 २) फक्त दोन स्नानगृहे

टायटॅनिक फार मोठी जहाज. हजारोंनी प्रवासी परंतु स्नानगृहे मात्र फार थोडी होती. फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी दोन प्रायव्हेट व जनरल लोकांसाठी फक्त म्हणजे फक्त दोन बाथटब होते. सातशेवर प्रवाशांसाठी दोन स्नानगृहे? म्हणजे लोक अंघोळकरायचे की नाही असा प्रश्न जर येत असेल तर ऐका.. जहाजावर  वीस हजार बिअर बाटल्या, दीड हजार वाईन बॉटल, आठ हजारवर सिगार पाकिटे असा इतर जामानिमा असल्यामुळे प्रवाशी तसे खुश होते.

 ३) एक लाइफबोट – बारा माणसे

टायटॅनिक वर जीव वाचवण्यासाठी अपूऱ्या लाइफबोट होत्या हे तर आपणास माहीतच आहे. परंतु त्या लाइफबोटींचा देखील पुरेपूर वापर केला गेला नाही. कपॅसिटीपेक्षा कमी लोकांना घेवून लाइफबोटी अक्षरश: पळवून नेल्या गेल्या. लाइफबोट नं.7 ची कपॅसिटी 65 लोकांना न्यायची होती ती फक्त 25 लोकांनी वापरली तर लाइफबोट नं.1 मध्ये तर फक्त 12 लोक बसले. त्यापैकी सात तर जहाजाचे कर्मचारीच होते. ज्या दुर्घटनेत पंधराशेवर लोक मृत्यू पावले अन फारच थोडे वाचले. जे वाचले त्यांचे त्यांच्या त्यांच्या गावात कौतुक झाले. परंतु मासाबुमी होसोनो नावाच्या वाचलेल्या जपानी प्रवाशाला तो मृत्युला धाडसाने सामोरा गेला नाही म्हणून जपानमध्ये कामावरून काढून टाकण्यात आले.

जगाचा उलटा न्याय म्हणतात तो हाच का?

 ४) रद्द केलेला सुरक्षा सराव

 लाइफबोटींचा चूकीचा वापर तर आपण पाहिलाच. वाईट म्हणजे त्याच दुर्दैवी दिवशी म्हणजे 14 एप्रिल रोजी सकाळी लाइफबोटी कशा वापरायच्या याचा सुरक्षा सराव-ड्रिल आयोजित केले होते. परंतु टायटॅनिक कधीच बुडणार नाही अश्या गैर समजुतीमुळे  कॅप्टन स्मिथने तो सराव रद्द केला. म्हणतात ना संकटे एकटी येत नसतात. तसेच यावेळीसुद्धा  झाले. कॅलीफोर्निया नावाचे जहाज हादसा घडत असताना टायटॅनिक जवळून जात होते. परंतु टायटॅनिकची SOS (सेव्ह आवर सोल) तार  कॅलीफोर्नियाच्या ऑपरेटरने पहिलीच नाही. कारण झोपला होता.

थोडक्यात टायटॅनिकचे नशीब त्या दिवशी झोपले होते.

परंतु दोस्तहो, जहाजाचा कप्तान एडवर्ड स्मिथ शेवटपर्यंत जहाजावर काम करत होता. इतकेच नाही तर जहाजावरील संगीतकार शेवटपर्यंत त्याची साथ देत मनोभावे संगीत वाजवत होते. सुमारे दोन तास पाच मिनिटापर्यंत  संगीत वाजत होते अन मृत्यूबरोबर जहाजाची झुंज चालू होती. स्मिथने जहाज बुडताना शेवटचा संदेश त्यांच्यासाठी दिला तो असा “ मित्रांनो तुम्ही तुमची ड्युटी केली आहे अन आता मी तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही. मी तुम्हाला कामातून मुक्त करतो..”

 ५) टायटॅनिकचे स्वतःचे वर्तमानपत्र

 टायटॅनिक भयंकर मोठे होते. हजारो प्रवाशांना घेवून महिनोंमहिने प्रवास करण्याची क्षमता असणाऱ्या  या जहाजाचे स्वत:चे “अॅटलांटीक डेली बुलेटीन’’ नावाचे वर्तमानपत्रही होते. समुद्रात तरंगत असतानासूद्धा किनाऱ्यावरून तारेद्वारे लेटेस्ट बातम्या बोटीवरील प्रवाश्यांना पोहचवण्याची प्रगत सोय टायटॅनिकवर होती. जेव्हा जहाज डुबले तेव्हा सहाजिकच “अॅटलांटीक डेली बुलेटीन’’ छापला गेला नव्हता.

दुर्दैवाची बाब म्हणजे जहाज बुडाल्याची बातमी जेव्हा “लंडन डेली” ब्रिटीश वर्तमानपत्राने 16 एप्रिलला छापली तेव्हा  “टायटॅनिक बुडालीपण काही जीवित हानी झाली नाही” अशी बातमी छापली होती.

तसेच न्यूयॉर्क टाईम्सने एका आठवड्यानंतर 75 पानाची टायटॅनिकबद्दल बातमी देणारे पुरवणी छापली होती.

568 total views, 1 views today