गोंधळलात ना? म्हणजे जीवनात स्वतः कोणालाही अपयशी व्हावे असे वाटत नसताना स्मार्टदोस्त उपाय कसले सुचवतोय असेही तुम्हाला वाटत असेल. मित्रांनो यश तुमच्यापासून दूर जावे असे खरेच मालाही वाटत नाही. परंतु “व्हाट्सअॅपवर सर्क्युलेट झालेले 12 वी परीक्षेचे चुकीचे टाईमटेबल खरे मानून अनेक विद्यार्थी परीक्षा संपल्यावर परीक्षेस गेले…” हे बघून अपयश, इतके का सोपे आहे ? असे सहानभूतीयुक्त वाटले. परीक्षेत पास होणे म्हणजे अत्युच्च यश असे म्हणायचे नाही परंतु जे झाले ते टाळता आले असते असे मनात आले. असो जरा लाईट मूडमध्ये जावूया अन पाहुया जर खरोखरच एखाद्याला जाणून बुजून यशाला लाथ मारायची असेल तर त्याने काय करायला पाहिजे. वाचा तर 5 उपाय जे अपयशाला जवळ करते…

1. दोन कानांमध्ये काहीच नाही असे समजा :

आपल्या दोन कानाच्या मधल्या भागात निर्वात पोकळी आहे, तेथे डोकेबिके काही नाही हे समजायला सुरु करा. मी जगात काहीच चांगले करू शकणार नाही ही स्वतःची वाक्ये स्वतः ऐकायला लागलात की अपोआपच तुम्हाला पटायला लागेल की तुम्ही अगदी युजलेस आहात. पुढचे काम सोपे आहे. तुम्ही हमखास अपयशी व्हाल. मग काय मज्जाच.. पण यशस्वी माणसाना ते पटत नाही. ऑस्कर पिस्टोरीयस नावाच्या साउथ आफ्रिकन माणसाला गुढग्याखाली दोन्ही पाय नव्हते. त्यामुळे चालायचा काही प्रश्नच नव्हता. परंतु कानांमधील डोक्यात सारखा एकच आवाज की आपण चालू नाही तर पळूपण शकतो. अन हेच स्वविचार एैकून व गुढग्याला कृत्रिम पाय लावून तो पळू लागला. त्याने 2011च्या 400 मीटरच्या जागतिक शर्यतीमध्ये गोल्ड मेडलपण मिळवले.

2. स्वतःला अतिबिझी समजा :

यशस्वी माणसाकडे वेळच वेळ असतो. न्यूटन साहेबांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तो कसा हे माहीतच आहे. ते निवांतपणे झाडाखाली बसले असताना सफरचंद डोक्यावर पडले अन… मग काय एका मागून एक शोध. सर्व आयुष्य त्यातच. एकदा निवांतपणा दाखवल्यामुळे लागलेली ही झगझग. एकदा का कामची सवय लागली की कामच करत बसावे लागते. कलाम सरांचे तेच झाले. लहानपणी पेपर वाटायचे काम, मोठेपणी मिसाईलचे काम, मग राष्ट्र्पतीचे, नंतर लोकांना शहाणे करायचे काम, कामच काम. त्यापेक्षा टीव्ही, मग फेसबुक, मग व्हाट्सअॅप, मग इन्स्टाग्राम यात बिझी रहा. किती वेळ हे सर्व करतोय हे घड्याळात अगदीच बघू नका. कोणीतरी म्हटलेय की आपण दिवसातले दोन ते तीन तास यामध्ये घालवतो. असू दे. यशस्वी होऊन काम करत कोम्यात जाण्यापेक्षा हे बरे..

3. दुसऱ्यांनी नावे ठेवली तर विश्वास ठेवा :

अपयशी होण्यासाठीचा सोपा उपाय. एखादे काम तुम्हाला जमणारच नाही असे ते म्हणाले तर लगेचच त्यावर विश्वास ठेवा. अन हातात घेतलेलं काम बाजूला ठेवा. ऐन जवानीमध्ये कपाळावर आठ्याचे जाळे असणारा सहा फुट चार इंचाचा, उतरते खांदे असणारा अब्राहम आपल्या बारकुळ्या पायावर लोकांसमोर जेव्हा भाषणासाठी उभारला तेव्हा डोक्यावर नळ्याप्रमाणे दिसणारी उंच हॅट अन लांब कोट घातलेला तो एक विदूषक दिसत होता. समोरच्या समुदायाला बघून तो एकदम भूतकाळात गेला. प्रमाणापेक्षा मोठे असणाऱ्या कपाळावर आलेले दवबिंदू प्रमाणापेक्षा लांब असणाऱ्या त्याच्याच काडीदार हाताने त्याने नकळत पुसले. लोकांनी अनेक वेळा त्याला तू एक अपयशी म्हणून हिणवले होते, त्याच्या अवताराला नावे ठेवली होती. पण अब्राहमने ते कधीही मनावर घेतले नव्हते. तसे असते तर आज त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेताच आली नसती. परंतु या प्रवासात तो आठ वेळा निवडणुकीत व दोन वेळा बिझीनेसमध्ये आपटला होता… (काय हे? जेव्हा पहिल्यांदा लोकांनी तुझ्यात क्षमता नाही हे सांगितले होते तेव्हाच थांबला असता तर पुठचा त्रास तरी वाचला असता.)

4. कामढकल करा .. :

केल्याने होत आहे रे.. असे म्हटलंय. म्हणजे काम केले तर कधी ना कधी यश मिळतेच. याचा अर्थ अपयशी होण्यासाठी काम टाळायला पाहिजे. त्यासाठी कारणे हुडकायला पाहिजेत. चिमणी कावळ्याच्या गोष्टीतल्या चिमणीसारखे “काजळ लावते, पावडर लावते” अशी अतिमहत्वाची कारणे हुडकायला शिका. बाजारात “काम टाळण्यासाठीची 1001 कारणे” अशी पुस्तके आली आहेत म्हणे. बहुतेक एखाद्या राजकीय पुढाऱ्याने लिहिले असणार. त्यातले एखादे छोटेसेच पुस्तक मिळवा म्हणजे वेळ वाचेल. कारणे सांगत काम टाळा. काम नाही यश नाही… मज्जाच.

5. फसवा … स्वतःला. :

“मला वेळ नाही, मला जमणार नाही, मी फार बिझी आहे..” असा सारखा जप करा. यश दूर पळेल. कदाचित मधूनच मी हे करू शकतो, माझ्यात क्षमता आहे असा विचार डोक्यात येईल. पण लगेचच त्या विचाराला मारा. मनाला फसवायला शिका. नाहीतर उगाचच बुद्धी वापरायला लागाल, काम करायला लागाल. काम केले तर यश मिळेल. यश मिळाले की अधिक काम करावे वाटेल. अधिक यश – अधिक काम अश्या मायाजालात अडकाल. वर वर जाल तर पडण्याचे चान्सेस जास्त. त्यापेक्षा खालीच राहिले तर पडण्याचा धोका कमी.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. होय ना?
ता. क. : स्मार्टला खरोखरच कोणी अपयशी व्हावे असे वाटत नाही. परंतु यशस्वी व्हायचे पाच उपाय कोणीही सांगेल म्हणून असा लेख लिहला. यशस्वी भव..

3,727 total views, 3 views today