भारत एक संस्कारी देश आहे. जगाच्या निर्मात्यावर अपरंपार श्रद्धा असणाऱ्या भारतीयाची अनेक श्रद्धास्थाने आहेत. परंतू जेव्हा तामिळनाडू मध्ये खुशबू नावाच्या नटीचे मंदिर आहे असे जेव्हा स्मार्टदोस्तला समजले तेव्हा भारतात कोणा कोणाचे मंदिर आहे याचा शोध घेतल्यावर तयार झाली ही अनोखी अन विलक्षण मंदिरांची यादी.

1. रॉयल एन्फिल्ड बुलेटचे मंदिर : राजस्थान

पाली जोधपुर हायवेवर प्रवास करत असताना जर तुम्हाला हॉर्न्सचा गोंगाट एैकू आला तर तुम्ही बुलेटबाबाच्या मंदिराजवळ आला आहात हे जरूर समजा. होय.. चक्क रॉयल एन्फिल्ड ३५० सीसी बुलेटचे मंदिर राजस्थान मध्ये आहे. बुलेटच्या फुटरेस्टवर माथे टेकून मग बुलेटला प्रदक्षिणा घालणारे हजारो भाविक तुम्हाला येथे दिसतील. घंटेऐवजी होर्न वाजवूनच देवाला तुमच्या मनोकामना तुम्ही सांगायच्या आहेत. अन हो प्रसाद म्हणून बिअरचं ते पण बुलेट ब्रँड बिअर वाटायची जगावेगळी पद्धत पहावयास मिळेल. या मंदिराला बन्ने बाबाचे मंदिर या नावानेदेखील ओळखतात. ओम बन्ने नावाच्या बुलेटप्रेमी युवकाच्या अपघाती मृत्यु व त्यानंतर त्याच्या बुलेटने दाखवलेल्या चमत्कारामूळे हे मंदिर प्रसिद्धीस आले.

2. बाबा निहालसिंग गुरुद्वारा अन विमानांचा चढावा : पंजाब

वाचायला ऑड वाटेल पण डोअबा भागातील संत बाबा निहालसिंग गुरुद्वाऱ्यामध्ये खेळण्यातली विमाने चढावा म्हणून अर्पण केली जातात. हातात प्लॅस्टिकची विमाने घेवून भक्तिभावाने येणारे भाविक गुरूकडे, परमेश्वराकडे काय मागणी करत असतील असे तुम्हाला वाटते? येथे चक्क परदेशवारीची मागणी असते. परदेशात चांगल्या नोकरीची व बेटर लाईफची स्वप्ने बघणारे भाविक वेगवेगळ्या रंगाची, आकाराची विमाने या गुरुद्वाऱ्याला भेट देतात. विशेष म्हणजे या गुरुद्वाऱ्याच्या इमारतीवर एका मोठ्या विमानची प्रतीकृतीच उभी केली आहे. आजूबाजूला खेळण्याची विमाने विकणारी अनेक दुकाने तुम्हाला दिसतील.

संदर्भ:http://www.mirror.co.uk

3. चायनीज काली मंदिर : कोलकत्ता

नुडल्स, चायनिज चॉप्सी, आणी चायनीज राईस प्रसाद म्हणून मिळणारे एखादे मंदिर भारतात असेल असे स्मार्टदोस्तलादेखील वाटले नव्हते. परंतू हे सत्य आहे. कलकत्त्यातील तान्ग्रा चायना टाऊनमधील चायनीज रहिवासी कालीमातेचे भक्त आहेत. मुळात ते बुद्ध वा ख्रिश्चन आहेत परंतु अनेक वर्षांच्या कलकत्त्यामधील वास्तव्याने ते कालीभक्तपण झाले आहेत. सकाळ व संध्याकाळच्या आरतीला ते आवर्जून हजर राहतात व वर सांगितल्या प्रमाणे नुडल्स, चायनिज चॉप्सी, आणी चायनीज राईस प्रसाद म्हणून वाटतात.

4. ममी (मृत शरीर ) मंदिर : हिमाचल प्रदेश

बुद्ध साधू तेन्झीन यांचे नीटपणे टिकवून ठेवलेलं मृत शरीर (ममी) असलेले एक मंदिर हिमाचल प्रदेशात आहे. असे म्हणतात की गुये गावात एकदा साथीने थैमान घातले असताना साधू तेन्झीन यांनी तप केला अन ती साथ आटोक्यात आली. पण तप करताना तेन्झीन यांनी स्वतःचे शरीर अर्पण परमेश्वराला अर्पण करायचे कबूल केले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या शरीराची ममी करण्यात आली. कालांतराने भक्तांनी ती ममी हिमालयात एका मंदिरात दर्शनास ठेवली. सध्या हे मंदिर इंडोतिबेट पोलिसांच्या कक्षेत सर्वासाठी खुले आहे.

संदर्भ: www.atlasobscura.com

5. उंदरांचा मुक्त वावर असणारे कर्णी मातेचे मंदिर : उदयपुर, राजस्थान

कार्निजी या हिंदू साध्वीच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेले हे मंदिर एका अनोख्या कारणाने प्रसिध्द आहे. देष्णोक गावातील या मंदिरात उंदराचा मुक्त संचार असतो. भाविक उंदरांसाठी दुध व इतर प्रसाद अर्पण करतात. उंदरांचे शिकारी पक्षांपासून रक्षण करण्यासाठी जागोजागी तारेची जाळी लावली आहे. तसेच उंदरांना राहण्यासाठी जमिनीवर, भिंतीत भोके पडली आहेत. जोधपुर व बिकानेरच्या राजघराण्याची देवी म्हणून कर्णी देवीला फार महत्व आहे. संदर्भ : www.tripadvisor.in

555 total views, 1 views today