सन 1951 – चंडीगडमधील पी.डब्लू.डी. मध्ये रोड इन्स्पेक्टर म्हणून काम करणाऱ्या नेकचंदनी शहरात जमा होणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून एक सुंदरशी मूर्ती तयार केली. त्या वस्तूमध्ये फुटलेल्या कपबश्या, वायर्स, तुटलेल्या टाइल्स, सायकलच्या फ्रेम्स अश्या तुम्हा आम्हाला नको असलेल्या वस्तू होत्या. अगदीच टाकाऊ. परंतु याच टाकाऊ वास्तूमध्ये नेकचंदना सुंदरता दिसली. हळू हळू त्यांनी टाकाऊ वस्तूपासून वेग वेगळ्या मुर्त्या, कलात्मक आकृत्या करायला सुरु केल्या. अन कोणालाही न कळू देता गावातील सुखना तालावाच्या बाजूला त्या वस्तू मांडून ठेवायला सुरु केल्या. हळू हळू या वस्तू जगाचे लक्ष वेधून घ्यायला लागल्या. आता कचरा म्हणून टाकलेल्या वस्तूंपासून तयार झालेल्या या कलाकृती पहायला दरवर्षी सुमारे आडिच लाख लोक देशोदेशीतून चंदीगडला भेट देतात. जगात कोण काय करेल अन कशाचे संग्रहालय तयार होईल हे सांगता येत नाही. 12 जून 2015 ला नेकचंद वारले परतू त्यांचे हे प्रेक्षणीय रॉक गार्डन त्यांची आठवण जगाला सदोदित देत राहील. दोस्तहो आज आपण जगातील अशाच विलक्षण संग्रहालायांची माहिती घेणार…

1. परग्रहवासियांचे संग्रहालय :

उडत्या तबकड्या होत्या का नव्हत्या हे कोणालाच माहित नाही. परंतु त्यांच्याबद्दल जगाला फार आकर्षण. जुलै 1947 ला न्यू मेक्सिकोच्या उत्तरेस रोझवेल या गावी एक विलक्षण घटना झाली. वादळी वारा असताना आकाशात विचित्र वस्तू फिरताना हजारो लोकांनी पाहिले. त्या वस्तू काय होत्या हे कोणालाच सांगता आले नाही. या घटनेमुळे रोझवेल अचानक प्रसिध्द झाले व माहित घ्यायला संशोधका बरोबरच हौशे नवशेही या गावी येवू लागले. त्यामुळेच कदाचित ग्लेन डेनिस या पृथ्वीवरील माणसाने येथे परग्रहवासियांचे संग्रहालय सुरु केले. उडत्या तबकड्यांचा इतिहास, त्याची ठिकाणे व माहिती, इतकेच नव्हे परग्रहवासियांबद्दल जी जी माहिती, वस्तू या संग्रहालायात सापडतात. परग्रहवासियांनी या संग्रहालायाला भेट दिल्याचे वृत्त नाही.

2. कानकून पाण्याखालचे संग्रहालय :

वस्तू संग्रहालय बघायला जायचे म्हणजे ठीक ठाक ड्रेस घालून एखादी गाडी पकडायची, त्या ठिकाणाला जायचे मग तिकीट काढून रांगेत त्या वस्तू बघायच्या असा एक कार्यक्रम. यात वस्तू बघताना कपडे काढायचे अन दुसराच ड्रेस घालून वस्तू बघायच्या असा प्रकार नाही. पण मेक्सिकोतच आणखीन एक विचित्र संग्रहालय आहे जेथे तुम्हाला पाण्यात डुबकी मारायला लागते. तेव्हा तुमचे ठीक ठाक कपडे काढायचे, पोहण्याचा ड्रेस घालायचा अन पाण्याखाली केलेल्या या खास संग्रहालयातील कलाकृती पहायच्या. कानकून या ठिकाणाच्या या अनोख्या संग्रहालयात तुम्हाला 500 वर मुर्त्या व कलाकृती पहायाला मिळतात. आहात तयार डुबायला?

3. टॉयलेटचे संग्रहालय :

स्वच्छ भारत अभियान सुरु झाले अन घरो घरी टॉयलेट आहे का याचा शोध सुरु झाला. नसेल तर काय काय करायचे हे सरकारने ठरवून दिले. त्याप्रमाणे काम सुरु आहे. परंतु याच टॉयलेटचे संग्रहालय असू शकेल का असा जर कोणाला प्रश्न असेल तर उत्तर हो आहे. होय अन ते टॉयलेटचे संग्रहालय इतर कोणत्या देशात नाही तर भारतातच आहे. दिल्लीमधल्या सुलभ इंटरनॅशनल संग्रहालयात आपल्याला वेग वेगळ्या पद्धती अन प्रगतीची माहिती व उपकरणे बघायला मिळतात. व्हाट अॅन इंटरनॅशनल आयडीया सरजी….

4. घाणेरड्या कलाकृतीचे संग्रहालय :

आपण संग्रहालयात जातो कारण आपलाल्या वेग वेगळ्या प्रतीथशय कलाकारांच्या कलाकृती पहायला मिळतात. परंतु जे कलाकार फेमस नसतील अन त्यांच्या कलाकृतीही फेमस नसतील तर त्याना कोण विचारणार? मग त्यांना सामाजात काहीच स्थान नाही? मग काय त्यांनी तसेच दिवस काढायचे? असाच काहीसा विचार असणाऱ्यानी मॅसॅच्यूसेट्स, अमेरिका येथे म्युझियम ऑफ बॅड आर्ट या नावाचे संग्रहालय सुरु केले आहे. कालाकारांना चांगले दिवस आले असे समजायचे की बघणाऱ्यांना वाईट हे काय कळत नाही. पण दिवस बदललेत हे नक्की.

5. मोडलेल्या रिलेशनशिपचे संग्रहालय :

यादीतील हे शेवटचे संग्रहालय. वाचल्यावर स्मार्टला खरोखरच वेगळे वाटले म्हणून येथे समावेश. प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते. त्याचमुळे कदाचित अनेक प्रेमिकांच्या आठवणीत अन कदाचित संग्रहातसूद्धा एखादे मोरपीस, वहीत सांभाळून ठेवलेलं अन त्याने/तिने दिलेले फुल असतेच. पत्रे अन ग्रीटिंग कार्ड्स तर अगदी निट बांधून ठेवली असतात. हा! पण हे झाले हॅपी एंडिंगवाल्या प्रेमाचे. मग मोडलेल्या प्रेमात काय करायचे. ते दिलेले फुल अन त्या गिफ्ट्स नदीत फेकून स्वाहा म्हणायचे की पिक्चरमध्ये दाखवले म्हणून प्रेम दाखवण्यासाठी तिच्या/त्याच्या मागे बदला घेण्यासाठी फिरायचे? साफ चूक… हे दोन्ही उपाय उपयोगाचे नाहीत. त्याने झालातर तोटाच होतो. क्रोएशियामध्ये मोडलेल्या प्रेमाचे एक अनोखे संग्रहालय आहे जिथे काही कारणांनी जर प्रेम भंगले असेल अश्यानी आपल्या प्रेमाच्या आठवणी, गिफ्ट्स, जमा करायचे. प्रेमिकांच्या भाव भावनाना मोकळे करायचा हा एक अनोखा प्रयत्न. उगाच बदलेकी आग ओकत फिरण्यापेक्षा मोकळे झालेले बरे..

505 total views, 1 views today