चीनी लोक काहीही करू शकतात असे आपण आत्तापर्यंत म्हणत होतो. परंतु दोस्तहो जपानी लोकांविषयी नेटवर वाचले अन जपानलापण तोड नाही हे कळाले. तसे पाहता प्रत्येक देशामध्ये दुकानदार ग्राहकांना नानावीध सेवा पुरवत असतातच पण जपानमध्ये ग्राहकाना ज्या सेवा पुरवल्या जाता त्या काही औरच. गावातील वाढदिवसाची होर्डिंग, वेगवेगळ्या मालाच्या जाहिराती बघून कंटाळाच येतो. पण त्याच जाहिराती मांडीवर चिकटवून तरुण मुली/मुले फिरू लागली तर कदाचित तुम्ही जाहिराती वाचाल. जपानमध्ये मांडीवर तुमची जाहिरात एखाद्या गोंदणासारखी लावायची अन जाहिरात दाखवत फिरायची सेवा पुरवली जाते… गम्मतच आहे.

1. एकट्याचे लग्न लावून मिळेल :

जपानमध्ये सगळेचजण बिझी असतात. म्हणजे काही काळ थांबून लग्न करावे अन संसार थाटावा, पार्टनरला घेऊन घासाघीस करत बाजार करावा, झोपताना दिवसांच्या खर्चाबद्दल चर्चा करून रात्रीची वाट लावावी, मुले बाळे वाढवत रिटायरमेंटची वाट बघावी असले नाद नाहीत. पण काहींना लग्नाची ती लगबग, ते विधी आयुष्यात एकदातरी अनुभवावे वाटतात. अन अशाच आसुसलेल्या लोकांसाठी एकट्याचे लग्न लावणारी दुकाने जपानमध्ये आहेत. ते तुम्हाला सजवतील, अग्नीभोवती सात फेऱ्या मारायला लावतील. हळद लावणे, मुंडावळ्या बांधणे अश्यासारख्या जपानमध्ये ज्या ज्या विधी असतील त्या करतील. अन ते सुद्धा विदाउट नवरा किंवा नवरी. फक्त एकट्याच्या लग्नाचे पॅकेज. लग्न झाले की तुम्ही तुमच्या कामाला मोकळे. ?????

2. एक्स लव्हरच्या भेटवस्तू सांभाळणे :

जीवनात मैत्री होती, प्रेमही कधीकधी होते अन प्रेमभंगही. मग त्या प्रेमात तुम्ही दिलेल्या गिफ्ट्सचे काय करायचे. म्हणजे तुम्हाला मिळालेली ती गुलाबी पत्रे अन ते टेडी बिअर नंतर अडगळ वाटू लागतात. मनाला त्रास देणाऱ्या या अश्या वस्तू सांभाळून ठेवण्यासाठीसुद्धा जपानमध्ये सेवा आहे. तुम्ही महिन्याला साधारण 100 रुपये भाडे भरायचे अन तेराडा नावाची कंपनी तुमचे हे प्रेमभंग सामान जतन करून ठेवेल. त्याची पावतीही तुम्हाला मिळते. प्रेमभंगाची पोहच पावती नंतर सांभाळून ठेवायची जबाबदारी तुमच्यावर….

3. चूक कबुल सर्व्हिस :

माणूस म्हणजे चुका आल्याच. तुम्ही जेव्हा चुका करता तेव्हा माफी मागायलाच पाहिजे. हो ना? परंतु बऱ्याच जणांना चूक कबूल करून माफी मागायला फार जड जाते. त्यांच्यासाठी चूक कबूल सेवा “ऐगा प्रो” कंपनी सेवा पुरवते. म्हणजे बघा तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा वाढदिवस विसरला ही चूक केली. आता ती तुमचे भरीत करेल असे तुम्हाला वाटते. काळजी नको, “ऐगा प्रो” है ना. पैसे भरा कंपनीची माणसे तुमचे आई वडील असल्याचे सोंग करतील अन तुमच्या रागावलेल्या मैत्रिणीकडे जावून माफी मागतील. तुम्ही खुश जान वाचली म्हणून अन मैत्रीण खुश सासू सासऱ्यांनी लग्नाआधीच माफी मागितली म्हणून. सगळीकडे खुशीचा माहोल. खोटा खोटा का असेना.

4. भाड्याने मित्र मिळतील :

लहानपणी आपण सायकल भाड्याने घेऊन गावात चक्कर मारून शायनिंग करायचो पण जपानमध्ये मित्र / मैत्रीण भाड्याने मिळतात ज्यांच्याबरोबर आपण गावभर फिरु शकतो…. म्हणजे बघा तुम्हाला कोणी फ्रेंड्स नाहीत अन फ्रेंड्स करता येत नाहीत. अगदी एकटे एकटे वाटते. तुम्हाला मित्र/ मैत्रीण नाहीत म्हणून गाववाले टिंगल करतात. टेन्शन नॉट. “पार्टनर के के” नावाची कंपनी काही काळासाठी तुम्हाला भाड्याने मित्र देतील. हे सारे कायदेशीर कामासाठीच व गैरकृत्य करणेस मनाई. अन हो! जास्त शायनिंगसाठी परदेशी मित्रही भाड्याने देणेची सोय आहे.

5. शाळेचा गृहपाठ करून मिळेल :

सुट्ट्या संपत आल्या की विद्यार्थ्याना अन त्यांच्या आई वडिलाना जड वाटणारे काम म्हणजे शाळेचा न केलेला गृहपाठ. या अपूर्ण गृहपाठामुळे झोप उडतेच पण राहिलेला सुट्टीचा दिवसपण खराब होतो. पण जर तुम्ही जपानच्या गृहपाठ सेवेचा लाभ घेतला तर ती कंपनी शाळा सुरु होण्यापूर्वीच मुलांचा गृहपाठ पूर्ण करून देते. अन ते सुद्धा मुलांच्या हस्ताक्षरात. म्हणजे डमी बसवलाय अशी शंकाही कोणाला येणार नाही. आहे का नाही शंकर शाळा?

511 total views, 1 views today