जिंदगी ना मिले दोबारा या चित्रपटात स्पेनमध्ये कॅटरिना व इतर टोमॅटीनो फेस्टीवलला जातात व एकमेकंवर टोमॅटो फेकत मजा करतात हे आपण पाहिलेच. भारतातसुध्दा रंगपंचमीला एकमेकांना रंगात रंगवून फुल टू धमाल केली जाते. जगभरात असे अनेक सण आहेत की ज्यामध्ये एकमेकांना कशाने तरी भिजवले जाते अगदी इंच इंच. स्मार्ट दोस्तने अशाच पाच राडा फेस्टीवलची यादी तयार केली आहे. मग होऊन जावू दे राडा:

१) चिखल गुट्टा

दक्षिण कोरीयामध्ये एकमेकांना चिखलाने माखून काढायचा ’’बोरीयॉंग’’ मड फेस्टीवल साजरा केला जातो. मातीचा औषधी उपयोग सांगण्यासाठी चालू केलेला हा सण नंतर मुख्य उद्देश सोडूनच गेला. सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या या सणामध्ये सुमारे २० लाख हौशी भाग घेतात. चिखलाचे तळे, घसरगुंडी असे अनोखे प्रकार येथे पहावयास मिळतात. आहे का नाही राडा?

२) संत्र्यांचे युध्द

उत्तरी इटलीमध्ये फेब्रुवारी महिन्यात खेळले जाणारे संत्र्यांचे युध्द. हा टोमॅटीनोसारखेच परंतु सावधगिरी म्हणून डोक्याला शिरस्त्राण घालून ठराविक संघामध्ये खेळला जाणारा हा राडा. भारतातही “इटली”शी रिलेटेड खेळ खेळला जातो.  संत्री नव्हे तर मंत्री हा खेळ खेळतात अन तेव्हा “मंत्र्यांचा सदनात गोंधळ , खुर्ची फेकून मारामारी.. ” असली वाक्ये   सहज ऐकू येतात.

३) पिठाची धुळवड का पिठवड?

दरवर्षी २८ डिसेंबरला स्पेनमधील इबी गावात लॉस इंडियनो नावाची एक अनोखी धुळवड खेळली जाते. रंग, फळे इत्यादिचा वापर न करता फक्त एकच गोष्ट एकमेकांवर फेकली जाते ती म्हणजे “टाल्कम पावडर ’’ म्हणजे मुखकमालाला  लावायचे मऊ  मुलायम पांढरे पीठ. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्पेनमधील अनेक रहिवासी लॅटीन  अमेरिकेत स्थलांतरीत झाले होते. ते जेव्हा स्पेनमध्ये परत आले तेव्हा त्यांच्या अंगावर अौषधी पावडर टाकली गेली जेणेकरून परदेशी रोग राई स्पेनमध्ये पसरू नये.

काय ते दिवस होते … अन काय ते डिसीज … आता तसे दिवस राहिले नाहीत. पण खेळ हा झालाच पाहिजे म्हणून अौषधी पावडर ऐवजी टाल्कम पावडर टाकून माणसे  समाधान मानून घेतात.

४) चीज रोलींग

चीज सँडवीच आपण खातो पण चीजची फेकाफेकी? क्या चीज है? दोस्तांनो कुपरहिल चीज रोलींगमध्ये चीज फेकले जात नाही परंतु छोटया छोटया टेकड्यांना चीजने माखून मग कोलांटया उड्या मारत गडगडत, घसरत खाली येण्याचा आणि चीजने सर्व अंग माखून घ्यायचा राडा खेळ “ग्लुसेस्टर’’ या इंग्लंडमधील ठिकाणी खेळला जातो. हा चीज चाखायला सुध्दा मूभा आहे.

“तू चीज बडी है मस्त मस्त” असे म्हणायला हरकत नाही.

५) वाइन ओताओती

उत्तर स्पेन मधील ’’हाटो ’’ गावी हा सण बॅटल ऑफ वाइन म्हणून ओळखला जातो. दिवसाची सुरवात देवाची प्रार्थना मग ’’बॉटल ऑफ वाइन’’ म्हणजे भरपूर दारु ढोसणे मग नंतर ’”बॉटल ऑफ वाइन’’ म्हणजे एकमेकांवर लाल वाइन ओताओती. अन परत एकदा बॉटल…काय काय राडा फेस्टीवल्स असतात बाबा!

अन हो! या सर्वांसाठी ड्रेस कोड एकच म्हणजे पांढरे शुभ्र कपडे. नवीन करकरीत. म्हणजे पक्का राडा…

616 total views, 1 views today