क्रिकेटचा बारमाही सिझन सुरु झाला आहे अन हातभर गोंदून घेतलेले वा मिशी शेंडी असलेले क्रिकेटपटू कम मॉडेल्स जाहिरातीतून दर्शन होतेय. सध्या दाढी मिशीची चलती आहे अन महिनों महिने दाढी उतरवून घ्यायला कोणच येत नाही अशी केश कर्तनकारांची खंत आहे असे म्हणतात. “गजनी” नंतर गंजेपणाची कशी फॅशन होती तेव्हा कर्तन करून घ्यायला कशी रांग लागायची अन गर्दी दूर करायला पोलिसांना बोलवायला लागायचे हे सांगत, हल्लीच्या फॅशन्स कश्या बिनडोक आहेत हे एका हेअर डिझायनरने मला कचकचीत आवाजात पटवून दिले. तो कचकचीत आवाज सांधे सैल झालेल्या त्याच्या कात्रीचा होता हे मला नंतर उमजले. असो, फॅशन्स बिनडोक असतात हे ऐकून बिनडोक फॅशन्सची माहित घेतली अन समजले की एकेकाळी गाढवाच्या दुधात अंघोळ करायची फॅशन होती.. चला तर दुनियाभर ज्या फॅशन्सनी काही काल धुमाकूळ घातला होता त्या एैतिहासिक फॅशन्स बघुया.

1. कपाळावरच्या जखमांची फॅशन :

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जर्मनमध्ये आलेले हे खूळ. तत्कालीन स्त्रियांना त्यांचा पुरुष कसा उंचापुरा देखणा असावा असे वाटायचेच. हे काही अजब नाही. पण त्याच्या अंगावर एखादीतरी युद्धाची निशाणी असावी असेही त्यांना वाटायचे. (हे मात्र अजब आहे) मर्दाने कोणतीतरी लढाई मारली असायला पाहिजे अन शत्रूचा वार कोठेतरी झेलला असला पाहिजे. कपाळावर झेलला असेल तर उत्तमच कारण तो ठळकपाने दिसतो या उद्देशाने अनेक तरुणी तश्या वीराच्या शोधात असत. झाले तर मग.. युरोपमध्ये कपाळावर कृत्रिम जखम करून त्याचे घाव ठसठ्सित दिसवून देणाऱ्या दवाखान्यांची चलती सुरु झाली. कपाळावरच्या जखमांची फॅशन नंतर बंद झाली. कदाचित युध्द नसतानाही कपाळावर जखम आहे म्हणजे गडी चोरीमारीतला दिसतोय असे स्त्रियांनी म्हणायला सुरु केले असेल…

2. लांबूटक्या मानेची फॅशन :

बर्मा आणी थायलंडच्या महिलांनी ऐतिहासिक काळात एका अनोख्याच फॅशनला गळ्याशी घेतले होते. गळ्याभोवती मेटल रिंग्ज एखाद्या पाईपसारख्या वापरून मान लांबूटकी करायची ही फॅशन. मुलगी लहान असताना पासूनच ही प्रक्रिया सुरु व्हायची. ब्रासच्या अनेक कड्या गळ्याभोवती एकावर एक घालायच्या अन त्यावर चेहरा टेकवायचा. कासाराकडील बांगड्यामध्ये अडकलेल्या नळीसारखी मानेची गत. जस जशी मुलगी मोठी होत जाईल तश्या कड्या वाढवत जायच्या जेणेकरून मान लांब होईल. हे असे का केले गेले त्याबद्दल एक ठाम कारण नाही. काहींच्या मते हे वाघांच्यापासून वाचायसाठी तर काहींच्या मते हे ब्युटीसाठी… ???

3. नाच मॅरेथॉन :

हल्ली नाचेचे वर्ग जोमात आहेत. फिटनेससाठी नाच चांगला असे आजकाल म्हणणे आहे. मध्ये पोट जोर जोरात आत बाहेर करणे फिटनेससाठी चांगले म्हणत होते. तेव्हा त्याचे वर्ग जोरात होते. वर्गात जायला जमत नसेल तर कोणा एका बॉलीवूड तारकेच्या चित्रतबकड्या बघत घरच्याघरी फिटनेस वाढवा असे म्हणत सीडी विक्रेत्यांनीपण बक्कळ कमाई केली. तर आता नाचाचे वर्ग. (“नाच रे मोरा आंब्याच्या ….” या गाण्यावर झुम्बा नाच करता येईल का अशी उगाचच शंका आली ) 1920 साली सतत 20 – 25 तास नाचायची लाट आली. या लाटेला डान्स मॅरेथॉन म्हणायचे. अल्मा कमिन्स या अमेरिकन महिलेने 27 तासाचे रेकॉर्डही केले. 1930 ला ही लाट ओसरली.

4. रेल्वेची धड्काधडकी :

लहानपणी खेळण्यातील गाड्या एकमेकांवर धडकवून तोंडाने “या..हू..” असे आवाज काढत खेळायचो. त्या धड्काधडकीतही एक नजाकत होती. तोंडाचा आवाजच जोरात होता पण धडक हळूवारच असायची. (खेळणी पुरवून पुरवून वापरायला लागायची) पण टेक्सास रेल्वेच्या विल्यम जॉर्ज क्रश नावाच्या अधिकाऱ्याने एक अजबच फंडा मॅनेजमेंटपुढे मांडला. अन तो मान्यही झाला. नावातच क्रश असणाऱ्या क्रशने दोन रेल्वेंची समोरासमोर धडक मारवायचा फंडा काढला. ती बघायला येणाऱ्या लोकांकडून तिकीट लावून पैसे मिळवायचे असे सांगणाऱ्या क्रशला जगाने वेड्यात काढले असेल असे तुम्हा आम्हाला वाटेल. पण तत्कालीन जगाने ही फॅशन मान्य केली. इतकेच नव्हे तर 1896 ते 1932 पर्यंत शंभरपेक्षा जास्त धड्काधडक्या झाल्या. जागतिक मंदिनंतर ही लाट लुप्त झाली. सोबतच्या चित्रात मागे प्रेक्षक, समोरासमोर उभ्या ट्रेन्स अशी तयारी दिसत आहे.

5. गाढवाच्या दुधात अंघोळ :

फार फार पूर्वी हिप्पोक्रेटस नावाचे एक भौतिक शास्त्रज्ञ कम पदार्थ वैज्ञानिक होते. अनेक शोधाच्या ह्या जनकाने गाढवाच्या दुधावरही रिसर्च केला होता. त्यांच्या मते गाढविणीच्या दुधात अनेक रोग दूर करण्याची शक्ती होती. हे ऐकल्यावर ग्रीस देशात त्या दुधात अंघोळ करण्याची फॅशन सुरु झाली. क्लिओपात्रा राणी रोज या दुधाने स्नान करायची. त्यासाठी व तिच्यासाठी 500 गधर्भिणींची खास सोय करण्यात आली होती. अन मित्रांनो क्लिओपात्रा ही एकटीच फॅशन कॉन्शस नव्हती तर रोमन राजा नेरोची दुसरी भार्या पोपी सबिना, नेपोलियन बोनापार्टची भगिनी पओलीना या दोघींही “गा” दुधात नहायच्या.

649 total views, 1 views today