झोम्बी पिक्चर्स आपण अनेक बघितले आहेत. मेलेली माणसांची डरावणी शरीरे एखाद्या रोबोसारखी इकडून तिकडे फिरतात, मधून तुमच्याकडे बघून तोंड वेडावतात हात पुढे करून त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करतात. भीतीदायक चित्र…असो.. झोम्बी म्हणजे मेलेली पण जिव(?) असलेली काल्पनिक माणसे. पण दोस्तहो, तुम्हाला जर खरोखरच्या झोम्बीसारख्या माणसाची अन झोम्बीसारख्या ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर ही यादी वाचायलाच लागेल. आपण जिवंत आहे हे प्रूव्ह करण्यासाठी भारतात एका माणसाने केलेल्या खटपटी बघून यमराज देखील दचकला असेल..

1. झोम्बिची कर्जाची मागणी :

उत्तर प्रदेश मधील आझमगडवासियांना 1977 भयंकर शॉक बसला जेव्हा एक मेलेला माणूस कर्ज पाहिजे म्हणून चक्क एका बँकेत पोहचला. 22 वर्षांच्या लाल बिहारीला ऑफिसमध्ये डोळ्यादेखत बघून तेथील कर्मचाऱ्यांना घामच फुटला. कारण तसेच होते. हा लाल बिहारी कधीच मेला होता. त्याच्या भावाने तयार केलेले मृत्यूचे सर्टिफिकेट सही शिक्क्यासह सरकारी खात्यात मौजूद होते. पण हा “लाल” पण सही सलामत समोर मौजूद होता. जीवात जीव घेवून बँक बाबूने कर्ज मिळणार नाही असे सांगितले अन लाल बिहारीला “जिवंत असण्याचे सर्टिफिकेट” आणायला सांगितले. नेहमीचा सोपा फॉर्म्युला. जिवंत असलेल्या माणसाला जिवंतपणाचे सर्टिफिकेट त्यावेळी भारतात मिळत नसल्यामुळे लाल बिहारीला पुढील 18 वर्षे झोम्बाझोम्बी करावी लागली. अन भारतवर्षातीलच नव्हे जगातील ती एक विचित्र घटना म्हणून ओळखली गेली.

2. मृत लालची “पुतण्या किडनॅप” आयडीया :

जिवंतपणाचा दाखला कोणीच देत नाही हे पाहून लाल बिहारीने आयडीयाज वर आयडीयाज शोधायला सुरु केल्या. त्यातीलच एक “पुतण्या किडनॅप” आयडीया. “मै जिंदा हू” हे प्रूव्ह करण्यासाठी त्याने चक्क आपल्या पुतण्याला पळवून नेले अन प्राण्याच्या रक्तात भिजवलेले त्याचे कपडे भावाला मिळतील अशी सोय केली. त्याला वाटले आता भाऊ पोलीस केस करेल अन त्यात आरोपी म्हणून “लाल” नाव नोंद करेल. मग काय पोलीस रेकॉर्डवर आपण जिवंत झालो तर आपण जिवंतच. पण तसे झाले नाही. कारण प्रॉपर्टीसाठी ज्या भावाने लाल मेला आहे अशी नोंद केली तो पण पोहचाहुआ आदमी था. त्याने केस केलीच नाही अन भोळ्या लालला पुतण्या परत करण्याशिवाय पर्याय राहिला नाही… हात चोळत त्याने मग दुसरी आयडीया शोधली.

3. जिवंत लालची विधवा पत्नी :

लालने आपण जिवंत आहे हे प्रूव्ह करण्यासाठी दुसरी आयडीया शोधली. लालने लग्न केले अन त्याच्या पत्नीला “विधवा पेन्शन” साठी अर्ज करायला लावला. दोस्तहो, हे सारे लिहिताना देखील स्मार्टला वाईट वाटतय पण हे सत्य आहे. नवरा जिवंत असताना बायकोने आपण विधवा झालोय हे सांगणे अन सरकारी बाबुंना विनवण्या करणे.. अगदी विदारक परिस्थिती. वाईट म्हणजे लाल बिहारी हे का करतोय हे सरकारी बाबू लोकांना माहित असल्यामुळे अन त्यांचे लागेबांधे असल्यामुळे कोणीच या केसमध्ये जिवंत लालला व त्याच्या विधवा पत्नीला मदत केली नाही. त्यामुळे कागदावर जिवंत होण्याचे लालचे स्वप्न अधुरेच राहिले.

काहीतरी करून पोलिसांनी आपल्यावर केस करावी असे वाटणाऱ्या लाल बिहारीने मग पोलिसाला लाच देवून स्वतःवर दंगलीची केस करावी असे सुचवले. लालची पोलिसाने लालकडून लाच तर घेतली पण केस मात्र केली नाही.

4. दोन पंतप्रधानांविरुध्द निवडणूक :

1988 ला काहीच होत नाही हे पाहून लालने आपली संपत्ती विकली अन लोकसभा निवडणुकीत व्ही. पी. सिंग यांच्याविरुध्द उमेदवारी अर्ज भरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत त्याला 1600 मते पडली असे सर्टिफिकेट मिळाले. पण जिवंतपणाचे सर्टिफिकेट मात्र नाही. म्हणून त्याने परत अमेठी मतदारसंघात राजीव गांधी यांच्या विरुध्द निवडणूक लढवली. इतकेच नव्हे तर निवडणूक झाल्यावर निवडणूक रद्द करण्यासाठी आयोगाकडे तक्रारही केली. मेलेल्या माणसाविरुध्द निवडणूक लढवता येणार नाही म्हणून. पण काही उपयोग झाला नाही. कदाचित तशी सोय कायद्यात नसेलही.

चिडलेल्या लाल बिहारीने मग उत्तर प्रदेश विधानसभेवर हल्लाबोल करायचे ठरवले. व्हीझीटर पास मिळवून ते असेम्ब्लीमध्ये पोहचले. अन मग “मुझे जिंदा करो..मुझे जिंदा करो..” असा नारा करत गोंधळ घालायला सुरुवात केली.

पण थंड डोक्यांनी मार्शल्सनी मृत लालचे जिवंत शरीर त्याच्या आवाजासाहित बाहेर फेकले.

5. लाल बिहारीचा “मृतक संघ” :

आझमगडमध्ये लाल बिहारी आता सर्वांना माहित झाला. आधी लोक कदाचित घाबरत असतील पण आता लोक त्याची थट्टा करू लागले. जिवंत असूनसुद्धा स्वतःची आयडेंटीटी नसलेल्या लाल बिहारीला मग शामलाल नावाचा एक पॉलीटीकल गुरु भेटला. त्याने लालला अश्या “ओळख” नसलेल्या “मृतक” लोकांची संघटना काढायला सांगितले. हताश लालने तसे केलेही. जगातील पहिली, मृत्यू पावलेल्या लोकांची जिवंत संघटना म्हणून “मृतक संघाची” आगवेगळी स्थापना भारताने तेव्हा बघितली. आरटीआय खाली लालने त्याच्या सारख्या किती लोकांची सरकारने फसवणूक केली आहे त्याचा शोध घातला. तेव्हा असे समजले की त्याच्या सारखे 335 मृत लोक अजूनही उत्तरप्रदेशात जिवंत आहेत. लालने त्यांच्यासाठीही काम केले. कोर्ट कचेऱ्याच्या हजारो फेऱ्या झाल्या. “तारीख पे तारीख” पडल्यानंतर 18 वर्षांनी लाल बिहारीला कोर्टाने जिवंत घोषित केले..जिवंत लाल कागदावरसुद्धा जिवंत झाला…

दोस्तहो, लाल बिहारीची ही सत्य कथा मनाला सुन्न करणारी आहे. जगण्यासाठी माणूस काहीही करतो. पण जिवंत आहे हे दाखवण्यासाठीसुद्धा इतके सारे करावे लागले.. मेलेल्या माणुसकीचे हे एक उदाहरणच नव्हे काय? तुमचे काय मत आहे?

737 total views, 2 views today