“रवंथ करणे अन बॉलडान्समध्ये साम्य आहे” असे कोणीतरी स्मार्टला सांगितले. “बॉलडान्समध्ये हात वर करून उभा जोडीदार, अन त्याच्या हाताला धरून स्वतःभोवती एका तालात गिरक्या मारणारी ती तरुणी… तर रवंथ करताना एक निश्चल असलेली वरील दंतपंक्ती अन त्याला जोडून स्वतःभोवती लयीत फेऱ्या मारणारी खालची पंक्ती…” वा काय साम्य. सांगणाऱ्याने आपले खायचे दात अन विचार करायचे दात वेगळे आहेत हे दाखवून दिले. असे म्हणावे वाटले की बाबारे डान्स बघायला मजा येते पण रगडून रगडून अन्नांला ब्रम्हांड दाखवायच्या रवंथ क्रिया पहायला मुळीच मजा येत नाही.

रवंथ हा शब्द बहुतेकवेळा गाय, बैल या प्राणीमात्रांशी उद्देशून वापरला जातो.. पण माणसातले काही कॉपीकॅटसुद्धा पब्लिकमध्ये बैलोबासारखे तोंड उघडे ठेवून रवंथ करताना दिसतात. जे बघणे अनबेअरेबल असते… आज आपण अश्या पाच सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या पब्लिकमध्ये वाईट दिसतात.

1. पर्सनल हायजीन :

सतत कामामध्ये अडकून असलेल्या लोकांना काही काहीवेळा पर्सनल हायजीनकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मग घरी करायची कामे ते वेळ मिळेल त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. मग काय घरी स्नान करून, वेळ नसल्यामुळे केस वाळवायला ऑफिसकडे धावणाऱ्या भगिनी मुंबईमध्ये लोकलो-लोकली (घरो घरीसारखे) दिसतात. तसेच काही पुरुषाबाबतही घडते. लिफ्टमध्ये बुटाची नाडी बांधणारे हे गडी कधी कधी पब्लिकमध्ये नखे कापतानासुद्धा दिसतात. दोस्तहो पब्लिकमध्ये नखे कापणे वा इतर पर्सनल हायजीनची कामे करणे दिसताना एकदम वाईट दिसते अन तुमच्या बद्दल चुकीचा समज पसरवू शकते.

2. बोटे मोडणे :

आळसावलेल्या तनाला रिफ्रेश करण्यासाठी काही काही बहाद्दर बोटे मोडतात. म्हणजे असेच काहीतरी कारण ते सांगतात. लोक बोटे का मोडतात याचे करेक्ट अॅन्सर अजूनही कोणी सांगू शकले नाही. सांध्यामध्ये साठलेला वायू रिलीज करण्यासाठी बोटे मोडण्याचा प्रकार केला जातो असे काही डॉक्टर सांगतात. एखाद्याबद्दलची नापसंती दर्शवण्यासाठीही बोटे मोडली जातात हे माहित आहेच. कारण काहीही असो ही सवय वाईटच. पब्लिकमध्ये तुमच्या शरीराचा हा आवाज इरीटेट करू शकतो. तेव्हा हा आवाज कोणाचा?… माझ्या बोटांचा…असे करू नका.

3. घसरलेली भाषागाडी :

कामानसे निकाला तीर और जुबांसे निकाली बात कभी वापस नाही आती…. दोस्त हो.. “गनमास्टर G-9” मिथुनदाच्या तोंडी दिलेला हा डायलॉग. चित्रपटाचे नाव आठवत नाही पण वाक्य मात्र अर्थपूर्ण. पब्लिकमध्ये वागताना भाषेवर लगाम ठेवणे फार आवश्यक. काही “रहिवासी” भागात सर्रास वापरले जाणारे “आयला.. मायला” सारखे रांगडे शब्द इतर ठिकाणी लोकाना “जंगली” वाटू शकतात व हर्ट करू शकतात. अन तुमच्याबद्दल चुकीचे इम्रेशन तयार होते हे सांगणे नको.. अशा या शब्दामुळे कधी कधी तुमच्या प्रोग्रेसची संधीही गुल होते. तेव्हा “माइं…ड युअर लँग्वेज”… अन हो! “यल्ला रास्कला……….” म्हणू नका.

4. नो टूमच “मच.. मच” :

“होटोंमे ऐसी बात दबाके मै आयी.. खुलजाये वही बात…..” कर्त्याने ओठांची रचना अनेक कारणासाठी केली आहे. लिपस्टिकचा खप वाढावा म्हणून किवां अतिमहत्वाचे सिक्रेट्स जे लपवण्यासाठी ओठांचा उपयोग करताना अनेकाना आपण पाहतो. असो.. पब्लिकमध्ये खाणे खाताना ओठ बंद करून घास चर्वण करणे हा मॅनर्सचा पार्ट आहे. जसे सिक्रेट्स सर्वापुढे ठेवायचे नसतात तसे घासही लपवायचे असतात. पब्लिकला तुमचे हे रूप बघणे फार ऑड वाटते. अन हो खाताना उघड्या तोंडामुळे होणारी मच मच त्रासदायक वाटू शकते. तेव्हा खाताना ओठांचा उपयोग तोंड बंद करण्यासाठीही करा..

5. चालता बोलता टेक्स्टींग :

दुर्भ्रमण ध्वनियंत्र असेच काहीतरी मोबाईलला आपण म्हणतो. तर अश्या या ध्वनियंत्राचा वापर पब्लिकमध्ये करताना काही नियम पाळणे अगदी जरुरीचे. तारस्वरात केकलत (ओरडत) मोबाईलमध्ये बोलणे हे वाईटच. तुमच्या पाहिजे-नकोत्या भावना आजूबाजूस असणाऱ्या जनसागारास कळाल्यामुळे तुमची अंदरकी बात तर इतरांना कळतीच पण नको असताना तुमचा तो आवाज त्याना सहन करावा लागतो. तेव्हा पब्लिकमध्ये मोबाईल वापरताना काळजी घ्यावी हे उत्तम.

काही काही लोक एखाद्याशी तोंडाने बोलत असताना दुसऱ्याशी बोटाने बोलत असतात. त्यांची बोटे सदानकदा मोबाईलच्या बटणाशी खेळत दूर असणाऱ्यां कोणाशी टचमध्ये असतात. याला टेक्स्टींग असे म्हणतात. काहींचे हे टेक्स्टींग मिटिंग चालू असतानाही चालू असते. असे दोन्ही दगडावर पाय ठेवणे ज्याच्याशी तुम्ही प्रत्यक्ष बोलत असता त्यांचा अपमान करण्यासारखे होते. तेव्हा हे टाळावेच..

786 total views, 2 views today