सुमारे नऊशे वर्षापुर्वी वाईन पिण्याचा शौक जगात अनेक ठिकाणी फॉर्मात होता. डिमांडमध्ये असलेली खचाखच भरलेली वाईनची पिम्पं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना व्यापाऱ्यांना वजनाचा त्रास व्हायचा. यावर उपाय म्हणून त्यांनी वाहतुकीपूर्वी वाईन उकळायची जेणेकरून त्यातल्या पाण्याची वाफ होईल व वजन कमी होईल अशी शक्कल लढवली. असेच एके दिवशी वाईन उकळत असताना जमलेल्या वाफेच्या पाण्याची चव एका दमलेल्या व्यापाऱ्याने चाखली अन जन्माला आली एक नवीन ड्रिंक.. ब्रँडी नावाची… वाइनपेक्षा वेगळी अन असरदार… दोस्तहो करायला गेलो एक अन झाले दुसरेच असे अनेकवेळा होते. आज असेच 5 प्रॉडक्ट्स, ज्याचा जन्म दुसऱ्याच कारणासाठी झाला होता ते बघणार आहोत. मजा येईल.

1. कोका कोला :

अफूचे व्यसन कमी करायला उपयोगी पडणारे ड्रिंक म्हणून सुरु झालेला कोका कोलाचा प्रवास खरेच आश्चर्य करणारा. अमेरिकेतील यादवी युद्धात सहभागी झालेला जॉन पेम्बरटन युद्धानंतर व्यसनी झालेला होता. तसे युद्धानंतर काम नसल्यामुळे बरेच सैनिक अफूच्या गर्तेत अडकले होते. जॉनने अफुपासून सुटका मिळण्यासाठी स्वतःच्या नावाची एक अनोखी वाईन तयार केली ज्यामध्ये त्याने कोला अन कोक बिया घातल्या होत्या. ही “पेम्बरटन वाईन कोला” ड्रिंक अफूची सवय मोडायला अनेकांना उपयोगी पडत होती पण सन 1886 सरकारने अल्कोहोलवर बंदी घातली अन वाईन कोलामधून नशाच निघून गेली. पेम्बरटनने वाईनच्या ऐवजी साखरेचा वापर करून नशा न येणारे हे ड्रिंक औषधी म्हणून विकण्याचा काही काळ प्रयत्न केला. जमले नाही म्हणून नंतर ती कंपनीच दुसऱ्याला विकली. नशीब बघा नवीन मालकाने फॉर्मूला तोच ठेवून फक्त नाव बदलले अन “कोका कोला” नावाचे जगप्रसिद्ध ड्रिंक जन्माला आले.

2. बबल रॅप :

पॅकिंगमध्ये वस्तूभोवती गुंडाळला जाणारी हवेचे बुडबुडे असणारी चित्रातली हा “बबल रॅप” सुरुवातीला एका वेगळ्याच कारणासाठी निर्माण झाला होता. 1957 ला आल्फ्रेड फिल्डिंग आणी मार्क चावान्नेसनी दोन प्लास्टिकच्या पडद्याना एकावर ठेवून शिवून एक नवीनच गोधडीवजा पडदा तयार केला ज्यावर मधे मधे हवा अडकल्याने फुगीरपणा आला होता. असे हे फुगवट पडदे लोक भिंतीवर वॉलपेपर म्हणून चिकटवतील ह्या भ्रमात त्यांनी विक्री सुरु केली पण त्यांचा भ्रमाचा फुगा फटकन फुटला. आता काय करायचे या विचारात असतानाच फ्रेडरिक नावाच्या सेल्समनने हवेच्या बुडबुड्याच्या पडद्याची ही आयडीया आय. बी. एम. (IBM) कंपनीला पटवली. नंतरचा इतिहास तुम्हा आम्हाला माहीतच आहे. काम नसताना हे फुगे फोडताना किती मज्जा येते ना….. ?

3. हाय हिल चप्पल :

हाय हिल पादत्रानात पाय घालून लेडीज कशा चालत असतील याचे कोडे अनेकाना असते. नुसते चालत नाहीत तर नाचतातसुद्धा. (अन कधी कधी जेन्ट्सनापण नाचवतात… कोण बोलाले ते…?) जोक्स अपार्ट, पण खरोखरच हाय हिलचा शोध लेडीजसाठी लावला गेला नाही तर चक्क सैनिक माणसांसाठी लावला गेला हे वाचून आश्चर्य वाटेल. सोळाव्या शतकात पर्शियन घोडदळासाठी सैनिक घोड्यावरून पडू नयेत व धनुष्यातून बाण सोडताना बैठक (मांड) निट बसावी म्हणून हाय हिल्स तयार करण्यात आले. जेणेकरून रिकिबीमध्ये पाय निट बसेल. पुढे युद्धे संपली पण स्टेटस म्हणून सैनिक हाय हिल्समध्ये पाय घालून फिरू लागली. मग त्यांच्या पत्नीज स्टेटस म्हणून. ते बघून सैनिकांनी हिल्स सोडले पण लेडीज आजदेखील हिल्स पहनतात…

4. लिस्टरीन :

लिस्टरीन जगात एक माउथवॉश म्हणून प्रसिध्द आहे. तोंडातून येणारा दुर्गंध कमी व्हावा म्हणून लिस्टरीनचा वापर खुपजण करतात. परंतु लिस्टरीनचा जन्म यासाठी झालाच नाही. जॉन्सन भावांनी शस्त्रक्रिया करताना किटाणूनाशक म्हणून एक द्रव्य तयार केले. इंग्लंडमधील लिस्टर नावाच्या वैद्याचे नाव या द्रव्यांला देण्यात आले. पण हे द्रव्य दावाखान्यांनी नाकरले म्हणून जॉन्सनच्या डोक्यात एक आयडीया आली व डोक्यातील कोंडा काढायला ह्या द्रव्याचा वापर करा असे सांगत जाहिरात केली. हे पण फेल झाले म्हणून डोक्याचा कीस काढत त्यांनी हे द्रव्य पायाच्या भेगा कमी करायला, मग जखमा कमी करायला, हे करायला, ते करायला विकायचा सपाटाच लावला. शेवटी एका जोर्डन नावाच्या औषधविक्रेत्याने लिस्टरीन आताचे लिस्टरीन जे कार्य करतय ते करायला विका म्हणून उपदेश दिला अन लिस्टरीनचा जन्म झाला…… हुश्श… नाहीतर उंची वाढवायला लिस्टरीन उपयोगी पडतंय असेही त्यांनी सांगायला कमी केले नसते. हो ना..?

5. कॉर्न फ्लेक :

आता या केलॉग भावांनी तयार केलेल्या फ्लेकबद्दल. गम्मतच आहे येथे भाऊ भाऊ भांडतात अन तेथे भाऊ भाऊ वेगळेच करतात. जाउदे खाण्याच्या विषयात विषयांतर नको. अन हो ह्या फ्लेक्सचा विषय जरा सिरीयसच आहे. केलॉग कुटुंब धार्मिक होतेच पण जॉनभाऊ वैद्य तर होताच पण जरा अतिधार्मिकही होता. स्वतः लग्न होऊन सुद्धा एखाद्या ब्रम्हचार्याचे आयुष्य जगताना मानवाच्या उज्वल भविष्याचा सतत विचार करणारे हा भाऊ मासे, मटन, दारू, तंबाखू याचा तिरस्कार करायचा. एवढेच नव्हे तर याच्या सेवनाने मनुष्य रानटी होतो व शरीरसुखाच्या मागे लागतो हे त्याचे मत. म्हणूनच असा सात्विक आहार तयार करायचा जेणेकरून त्याच्या खाण्याने माणूस शरीरसुखाचा विचार सोडून देईल असे ठरवून त्यांनी प्रयोगांती कॉर्न फ्लेक औषधी तयार केला. आपल्या पेशंट्सचे शरीर क्लीन अन मन शुध्द करून त्यांच्यातली “xxx” भावना घालवायला त्याने कॉर्न फ्लेक द्यायला सुरु केले. लोकाना खाऊ आवडला पण “xxx” काय कमी झाले नाही. म्हणतात ना स्वभावाला औषध नाही…

2,618 total views, 2 views today