पोकेमॉन गो खेळाने जगाला अगदी खेळवून का खिळवून ठेवले आहे. एखाद्या गाडीच्या स्टिअरिंग सारखा हातात मोबाईल धरून इकडून तिकडे घरभर झोम्बीसारखी फिरणारी ही माणसे मला जणूकाही मानवी गाड्या असल्या सारखे वाटते. या “मानवी गाड्या” आता बाजारात, मैदानात अन बागेत एकमेकाना ओव्हरटेक करताना बघायला कसेसे वाटते. उद्या या (?) गाड्यांची संख्या वाढली तर त्यांच्या या ट्राफिकसाठी सिग्नल्स, ट्राफिक पोलीस नेमायला लागतील का असा प्रश्न स्मार्टला उगीचच पडला. म्हणजे पोकेमॉन पकडायच्या नादात एकमेकाना धडकून अक्सिडेंट व्हायला नकोत म्हणून हे पोकोपोलीस चौकोचौकी उभे राहतील. अन कदाचित पोकोपावतीही फाडतील…असो. तर अश्या या जगाला वेठून अन वेडून टाकलेल्या खेळाच्या पाच अनोख्या गोष्टी.

1. एप्रिल फूल मधून जन्म :

रिलीज झाल्यापासून फक्त पाच तासात जगातील सर्वात जास्त डाउनलोड झालेला हा गो गेम जन्माला मात्र अगदी योगायोगाने आला हे वाचून आश्चर्य वाटेल. गुगल कंपनीत दर वर्षी एप्रिल फूल साजरा करण्याच्या नवनवीन आयडीया शोधल्या जातात. सन 2014 साली गुगलने जपानमधील “नियांटिक” व “पोकेमॉन कंपनी” ला एप्रिल फूलसाठी एक भन्नाट आयडिया शोधाचे काम दिले. या दोन कंपन्यांनी खास गुगलसाठी “गुगल मॅप” च वापर करून जगाच्या नकाशावर पोकेमॉन हुडकायचे एक दिवसाचे चॅलेंज तयार केले. गम्मत म्हणजे लोकाना ते फार आवडले. “पोकेमॉन” हा निनटेन्डो (Nintendo) कंपनीनचा एक व्हिडीओ उतरती कळा लागलेला गेम होता. 1995 च्या या खेळाला गुगलच्या “एप्रिल फूल” नंतर अचानक उभारी आली. अन दोनच वर्षात जुलै 2016 ला मोबाईलवर खेळला जाऊ शकेल असा “पोकेमॉन गो” जन्माला आला. पोकेमॉन गेम डेव्हलप करणाऱ्या “नियांटिक” कंपनीच्या प्रेसिडेंट सेत्सुतो मुराईनी एका मुलाखतीत सांगितलेली ही जन्म कहाणी….

2. तुमच्या कॅमेराचे बटन पोकेमॉनच्या हातात :

फ्रीमध्ये खेळता येईल अश्या या मोबिल गेममधून पोकेमॉन कंपनीला काय फायदा ? असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर थांबा. तुम्ही ज्याला फ्री समजत होता तो गेम तुमच्याबद्दलची माहिती कोणालाही विकून अगणित पैसे मिळवू शकते याची जाणीव तुम्हाला असायला हवी. गेम डाउनलोड करताना तुम्ही तुमच्या फोनमधील सर्व डाटा ज्यात तुमचे नाव, मोबाईल मध्ये तुम्ही स्टोअर केलेले नंबर्स ज्यात कदाचित तुमच्या ए.टी.एम. चे पासवर्ड, त्यांनी सांगितलेल्या लोकेशनचे तुम्ही काढलेले फोटो, तुमच्या मुव्ह्मेंटची डिटेल माहिती कंपनीने फुकटात वापरले तरी चालेल असे कबूल करता. इतकेच नव्हे तर जीमेल, गुगल डॉक्युमेंटही निनटेन्डो बघू शकते, वापरू शकते. करोडो पोकेवेड्या लोकांची ही माहिती जगातील हजोरो बिझीनेसेसना हवी आहे. अन त्यासाठी ते नीनतेन्डोला हवा तितका पैसा पुरुवायाला तयार आहेत.

3. मालामाल नीनटेन्डो :

पोकेमॉन मोबाईल गेमच्याआधी “नीनटेन्डो” कंपनी व्हिडीओ गेमिंग कॉन्सोल तयार करत होती. परंतु मायक्रोसॉफ्टच्या “एक्स बॉक्स” आणी सोनीच्या “प्लेस्टेशन” मुळे नीनटेन्डो डबघाईला आली होती. परंतु पोकेमॉन गोच्या पहिल्या सहा दिवसांच्या कमाईने नीनटेन्डो मालामाल झाली आहे. कारण त्यांच्याकडे “पोकेमॉन” कंपनीचे व गेम डेव्हलपर “नियांटिक” (Niantic) कंपनीचे 32 टक्के शेअर्स नीनटेन्डोकडे आहेत. पोकेमॉनमुळे सहा दिवसातच कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 पटीने वाढली अन जुलैअखेर कंपनीची व्हॅल्यू 12,000,000,000 (बारा बिलियन) डॉलर्सच्या पलीकडे गेली.

4. मृत शरीरावर बसलेला पोकेमॉन :

सारे जगच माझे कुटुंब ही भावना पोकेप्राण्यांमध्ये अतीव आहे. पिकाचू, जीगलीपफ अन बलबासोर अश्या नावच्या या प्राण्यांचे वास्तव्य कोठे असू शकेल याचा नेम नाही. अमेरिकेत 19 वर्षे वय असलेल्या शायला विन्गीस नावाची कन्या वॉटर पोकेमॉन हुडकत नदी किनारी गेली असता कॅमेऱ्यात खेळण्यातील खोटा खोटा पोकेप्राणी सापडण्यापेक्षा चक्क माणसाचे खरोखरचे मृत शरीर तरंगताना दिसले. कॅमेऱ्यात दिसलेले हे शरीर कोणत्याही पोकेचे नाही हे लक्षात आल्यावर तिची काय अवस्था झाली असेल हे सांगायला नको…. हो ना?

5. पोके पकडायला “उबेरची” खास टॅक्सी :

पोकेप्राणी पकडताना तेव्हडाच चालण्याचा व्यायाम होईल असा गोड गैरसमज बाळगणाऱ्या अमेरिकन्सना उबेर नावाच्या टॅक्सी सेवेने जेव्हा खास पोके शिकाऱ्यासाठी “उबेर गो” सेवा सुरु केली तेव्हा शॉकच लागला/बसला. तुम्ही जर अमेरिकेत असाल अन तुम्हाला पिकाचू बिकाचू पकडायचे असतील पण त्यासाठी चालत फिरायचे नसेल तर फक्त एक कॉल करा अन उबेरची गाडी ड्रायव्हरसहित दारी येईल. गाडीत बसा स्टिअरिंग सारखा हातात मोबाईल धरा. बघा दिसतो का एखादा पोके स्क्रीनवर… नसेल तर गाडी वळवायला सांगा … तुम्ही सांगेल तसे तो ड्रायव्हर गाडी वळवेल.. वळवत राहील… एखादा पोके दिसला तर गाडी थांबवा, बाहेर पडा पोके मोबाईलमध्ये पकडा अन करा सुरु पुढचा प्रवास.

हा खेळ कधी थांबवायचा, याच्या किती लेव्हल्स आहेत असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर सांगतो एकूण 151 पोकेप्राण्यांपैकी अनेक प्राणी उदा. श्री. माईम (पोके क्रमांक 122), दित्तो (क्रमांक 132) आज अखेर (सप्टेंबर 2016) कोणाला दिसलेही नाहीत. टाउरस नावाचा प्राणी तर उत्तर अमेरिकेतच असतो म्हणे. गल्ली बोळातून गेले तीन महिने जगभर फिरल्यावर जर ही परिस्थिती तर गेम संपण्यापूर्वी बाप्पा आपली गेम करेल हे सांगणे नको…

जय पोके….

756 total views, 1 views today