इंटरनेटचा वापर करण्यात भारत आता जगात दोन नंबरला आहे. फेसबुक अन व्हॉटस अॅपने तर लाखोंना वेड लावले आहे. काही खरोखर वेडे पेशंट झाले आहेत तर याच व्हॉटस अॅपचा चांगला उपयोग करून डॉक्टर्स मेडिकल ट्रीटमेंटचा स्पीड व क्वालिटी वाढवत आहेत. पण याच बरोबर आणखी एका गोष्टीसाठी नेटचा वापर वाढत आहे ती म्हणजे नेट खरेदी. तर ऑनलाइन शॉपिंगचा वेग जगभरात वाढला आहे आणि भारतीयांनीदेखील याला जवळ केले आहे. ऑनलाइन खरेदीसंदर्भात नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले. या सर्वेक्षणाच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन शॉपिंग करण्याचा भारतीयांचा सहभाग वाढला आहे. हे एक चांगले साईन आहे. पण समोरासमोर खरेदी करताना फसवणुकीचे जेवढे धोके असतात तितकेच किंबहुना जास्त धोके ऑनलाइन खरेदीला असतात. जर चूक झाली तर होणारी डोकेदुखी त्रासदायक असते. म्हणजे मोबाईल मागवायचा अन पोस्टाने विटच घरी आली तर त्या विटेचे काय करायचे… ? म्हणूनच ऑनलाइन खरेदी करताना कोणती काळजी बाळगायची याबद्दल स्मार्टदोस्तने 5 टिप्स दिल्या आहेत. ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना नक्की मदत होईल.

1. मोह की गरज :

कोणत्याही वेबसाइट आणि सॉफ्टवेअरचं डिझाईन ग्राहकाची आवड निवड लक्षात घेऊनच केलं जातं. आकर्षक ऑफर्स आणि आणि भरमसाट पर्यायांच्या भडीमार तुमच्यावर केला जातो. अशा परिस्थितीत मोहाला आवरून आपल्या नेमक्या गरजांना ओळखून मगच खरेदी करण्याचा शहाणा निर्णय आपल्याला घेता यायला हवा. तुम्ही तुमचे फेसबुकचे अकाउंट चेक करत आहात तर तुम्हाला एका बाजूला ड्रेस किंवा विविध वस्तूंच्या काहीच्या काही ऑफर्स पाहायला मिळतात. अगदी मोह होईल अशा. परंतु चमकते ते सर्व सोने नसते हे लक्षात असू द्या. तेव्हा जाणकार व्यक्तीकडून त्या वस्तूबद्दल माहित घ्या. काही वेबसाइटसवर वस्तूंबद्दलची ग्राहकांची मतं वाचायला मिळतात. ती माहिती वाचून आपण लोकांचे रिव्ह्यूज समजावून घेतले पाहिजेत. अर्थात त्या माहितीचीदेखील खरेपणा पडताळून पाहणं हे देखील आवश्यक आहे.

2. वेबसाइट सुरक्षित आहे का ते पहा :

तुमची ऑनलाइन खरेदी तेव्हाच सुरक्षित असते जेव्हा तुम्ही खरेदीसाठी निवडलेली वेबसाइट सुरक्षित असते. खरेदीसाठी क्लिक करण्याआधी पूर्ण वेबसाइटवर फिरून यावं. अनेक वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते. आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का हे वस्तूची मागणी करण्याआधी आधी तपासायला हवं. ऑनलाइन खरेदीच्या ज्या चांगल्या साइटस् उपलब्ध आहेत त्यावर खरेदीच्या मूल्यमापनाचे अहवालही उपलब्ध असतात.

3. वस्तूची पूर्ण माहिती घ्या :

वस्तूची खरेदी ऑनलाइन करण्याआधी वस्तूची पूर्ण माहिती घ्यावी. नेहमीची खरेदी करताना जसं चार दुकानं फिरून आल्याशिवाय आपण साधा रुमालपण घेत नाही तसंच एखाद्या साइटवरची वस्तू जरी आपल्याला आवडली असली तरी त्यासंबंधीच्या आणखी दोन चार साइटवरही माहिती काढून तिथे फेरफटका मारून यावा. वस्तू खरेदी करतांना त्या वस्तूची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. वस्तूमधले घटक, ती वापरण्याबद्दलच्या सूचना, वस्तूची डिलिव्हरी, खराब व सदोष वस्तू मिळाल्यास आपल्या तक्रारी कशा रीतीनं सोडवल्या जाणार आहेत याची माहिती अशा अनेक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. कपडे, ज्वेलरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेटस् यांची मागणी ऑनलाइन करण्याआधी जमले तर जवळच्या दुकानात जाऊन त्या हाताळून पाहायला हव्यात.

4. ऑनलाइन पेमेंट करताना काळजी बाळगा :

ऑनलाइन खरेदी करणं म्हणजे ऑनलाइन पेमेंट करणं आलंच. खरेदीचं पेमेंट जर आपल्या क्रेडिट कार्डवरून होणार असेल तर पेमेंटची माहिती स्वत:च्या हातानं भरावी. इतरांना ती भरू देऊ नये. यामुळे आपल्या क्रेडिट कार्डची सुरक्षा धोक्यात येते. तुमचा पिन क्रमांक इतरांना समजू देवू नये. आपण ऊठसूट जरी ऑनलाइन खरेदी करत नसलो तरी आपलं इंटरनेट बँकिंगचं अकाउंट ऊठसूट चेक करावं. नेट चालू केल्यावर एकदा आणि बंद करण्याआधी एकदा अकाउंट चेक करणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचे असतं. क्रेडिट कार्डनं खरेदीचं पेमेंट करताना पुरेशी काळजी घेतली नाही तर तुमचं ऑनलाइन खरेदीचं अकाउंट हँग होऊ शकतं. आपल्या बँकखात्यावर भलत्या कुणीतरी व्यवहार करू नये आणि आपले खात्यावरचे पैसे सुरिक्षत रहावेत यासाठी बँका अनेक प्रकारची काळजी घेत असतात तरीसुद्धा आपण पण त्याला आवश्यक तो प्रतिसाद दिला पाहिजे.

5. सायबर कॅफे, इतरांचं नेट असुरक्षितच :

ऑनलाइन खरेदी ही शक्यतो स्वत:च्या कॉम्प्युटरवरून स्वत:च्या नेटवरून करावी. सायबर कॅफेचा पर्याय सुरक्षित नाही. अगदीच नाईलाज असल्यास कॅफेचा पर्याय योग्य. पण तेव्हा आपण वापरत असलेल्या कॉम्प्युटरवर अँटीव्हायरस अँक्टिव्ह आहे की नाही हे आधी पाहावं. फिशिंग, हॅकिंग यामुळे नेहमीच आपली खरेदी धोकादायक होऊ शकते आणि त्याद्वारे होणारे पैशाचे व्यवहार असुरिक्षत ठरू शकतात. आपण इंटरनेटवर केलेले व्यवहार हे गोपनीय राहत नसतात. ब्राऊजरमध्ये खरेदीसाठी निवडलेल्या साइटची नोंद झालेलीच असते. त्यामुळे हे व्यवहार इतरांना माहीत होण्याची शक्यता जास्त बळावते. त्यामुळे खरेदीसाठी शक्यतो आपलाच कॉम्प्युटर अन् आपलंच नेट वापरावं. आपल्या संगणकासाठी / मोबाईलसाठी चांगले अँटी व्हायरस सॉफ्टवेअर असणं अत्यावश्यक आहे. तसेच हे सॉफ्टवेअर सतत अपडेट व्हायला हवं. हे सर्व करूनसूद्धा खरेदीत आपली फसवणूक झाली किंवा आपल्याला खरेदी करतांना काही समस्या निर्माण झाली तर त्याबद्दल आपण संबंधित विक्रेत्यानं निर्माण केलेल्या यंत्रणेकडे किंवा इतर मार्गांनी आपली तक्रार मांडली पाहिजे. सरकारने अशा व्यवहारांसाठी कायदा केलेला आहे. त्यातल्या महत्वाच्या तरतुदींची प्राथमिक माहिती आपल्याला असायलाच हवी हे लक्षात घेतलं पाहिजे.

541 total views, 1 views today