चंद्र अन तारे याबद्दल मानवाला फार आकर्षण. लग्न झालेल्यांना नवपरिणीत जोडप्यांना चंद्राची आस तर लग्नांला आलेल्या मुलांना चांदण्याची ओढ. प्रेमाच्या आणाभाका ताऱ्यांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होणे अशक्यच. असो… अश्या या मानवप्राण्यांने जेव्हा खरोखरच अंतराळात जाण्याजोगे यंत्र तयार केले तेव्हा खुद चांदतारोंके पास जाने के बजाय प्राणीलोगोंको भेजके उनका प्यार कितना महान (?) है ये दुनियाको दिखा दिया. मानवाने अंतराळात झेप अंतराळवीर होण्याआधी अनेक प्राण्यांनी आपली हजेरी तेथे लावली आहे व अवकाशप्राणी बनायचा मान मिळवला आहे. दोस्तहो अंतराळात पाठवलेल्या गेलेल्या अशाच चतुश्पादाची माहिती येथे देतोय.. ज्यामध्ये आहे श्वान, बेडूक अन….?

1. मूषक स्वारी :

अंतराळात कोणाला पाठवायचे यावर शास्त्रज्ञांनी जेव्हा विचार सुरु केला तेव्हा त्यांनी बराच अभ्यास केला असावा असे वाटते. कारण त्यांनी ज्यांची निवड केली तो कोणी वाघ वा सिंह नव्हता तर आपला मूषकराज होता. बुद्धीदेव गणेशाने ज्याचे आपले वाहन म्हणून सिलेक्शन केले तो नक्कीच हुशार असणार हे जाणून, व कदाचित मुषकाला अंतराळातील रस्त्यांची माहिती असणार असे वाटून जगातील या बुद्धीवानांनी प्रथम मान मुषकालाच दिला असेल का…?

जगातील पहिला अंतराळवीर होण्याचे भाग्य “हेक्टर” नावाच्या एका उंदीरमामाला मिळाले हे सत्य आहे. सन 1961 साली फ्रेंच अंतराळयानातून या मुषकाने पृथ्वी कक्षेबाहेर चक्क 93 मैल उंचीची उडी मारली व परत सुरक्षितपणे आगमन केले.

2. बिचारी लायका :

हेक्टर या जिवंत परत आलेल्या उंदराच्या आधी स्पेसमध्ये लायका नावाच्या एका श्वानाला रशियाने अंतराळात पाठवण्याचा प्रयोग केला होता. 3 नोव्हेंबर 1957 साली स्पुटनिक – 2 या यानातून लायकाने आपला प्रवास केला. पृथ्वीकक्षा पार करणारा जगातील पहिला जीव “लायका” ठरली. परंतु घर्षणामुळे प्रचंड वाढलेल्या तापमानाला व स्ट्रेसला “लायका” सहन करू शकली नाही व त्यातच तिचा मृत्यू झाला.

3. मांजरा मांजरीचा गोंधळ :

फ्रेंच लोक कोणाला वर घालवायचे याबद्दल फार प्रयोगशील होते. म्हणजे बघा हेक्टर या उंदराला यानातून पाठवल्यावर आता उंदरानंतर मांजरालाच अंतराळात पाठवावे हे त्याना वाटले. ही गोष्ट सन 1963 ची. मग काय झाली मांजराचा शोधमोहीम. चार-पाच मार्जरातून “फेलिक्स” नावाच्या पुरुष मांजराची निवड करण्यात आली. “व्हेरोनिक ए.जी.आय.” नावाच्या रॉकेटला सज्ज करण्यात आले. अन दिले वर पाठवून मांजराला….

पण असे म्हणतात की फ्रेन्चाचा हा उंदीर मांजर खेळ “फेलिक्स”ला मुळीच आवडला नव्हता. अन ऐनवेळी त्याने कल्टी मारली अन “फेलीसेट” नावाच्या एका महिला मांजरीला प्रवासाचा भार उचलावा लागला….

4. कासवाची रेस अन विक्रमी प्रवास :

लहानपणी आपण गोष्ट वाचली होती ज्यात कासवाने आपल्या हुशारीने ससुल्याला हरवले होते. वाटले होते असे फक्त गोष्टीतच होते. पण अंतराळात जाण्याच्या रेसमध्ये खरोखरच कासावानी इतर प्राण्यांना हरवले होते. “झॉन्ड – 5” या रशियन यानातून दोन कासवांनी पहिल्यांदा स्पेसमध्ये प्रवेश केला अन थोडे थोडके अंतर नव्हे तर चक्क चंद्राला गोल चक्कर मारली. गम्मत म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्यांनी अगदी मजेत पूर्ण केला. थोडेसे वजन कमी होण्या पलीकडे त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

सन 1974 ला आणखी एका रशियन कासवाने 90 दिवस स्पेसमध्ये राहण्याचा विक्रम स्थापित करून सर्व प्राण्यांवर मात केली.

5. स्कायलॅबमधले कोळी अन जळमटे :

होय… 1973 ला स्कायलॅब – 3 या अंतराळयानातून “अनिता” अन “अराबेला” या दोन कोळ्यांनी प्रवास केला. प्रवासाच्या दरम्यान ह्या दोन्ही जीवांनी स्वतःच्या जातीशी प्रामाणिक राहून यानभर जाळ्या विणल्या. असे आढळून आले की या जाळ्या विणायला त्यांना जरा जास्तच वेळ लागला. पण जाळ्याची क्वालिटी सुपर्ब होती.
जळमटांनी भरलेले हे यान पृथ्वीवर पुनश्च अवतरले तेव्हा असे लक्षात आले की स्वतः विणलेल्या या जाळ्यात या दोन्ही जीवांनी आपल्या जीवनाची यात्रा संपवली होती. पृथ्वीवर जीव गेलेल्यांचे अंतराळात तारे होतात असे म्हणतात. अंतराळात गेलेल्यांचे काय होते हे माहित नाही. आज स्मिथसोनियन संग्रहालायात या दोन्ही कोळीजीवांचे देह जपून ठेवले आहेत.

708 total views, 1 views today