वाचायला विचित्र वाटेल पण जगाला फास्ट फूडचे वेड लावणाऱ्या मॅक डोनाल्ड कंपनीला 1994 पर्यंत इंटरनेट काय आहे हे माहितच नव्हते. “वायर्ड मॅगझिन”च्या (Joshua Quittner) जोशुआ नावाच्या लेखकाने ही गोष्ट जगासमोर आणलीय. झाले असे की जोशुआला जगामध्ये इंटरनेट क्रांती येणार अन सर्व जग नेट गुलाम होणार याची खात्री होती. हजारो कंपन्या त्यांच्या त्यांच्या नावाने वेब साईट काढायला लागल्या होत्या अन वेब साईटचे डोमेन नेम (नाव) मिळवण्यासाठी गडबड सुरु होती. यातच www.macdonald.com हे नाव अजूनही कोणी रजिस्टर केले नाही हे जोशुआच्या लक्षात आले. म्हणूनच त्याने मॅक डोनाल्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या नावाचे रजिस्ट्रेशन करावे असे चांगल्या हेतूने सुचवले. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीला त्याचे म्हणणे पटले तर नाहीच पण “इन्टरनेट म्हणजे काय?” असा उलटा प्रश्न केला.

नंतर गम्मत म्हणून जोशुआने स्वतः डब्लू. डब्लू. डब्लू. मॅकडोनाल्ड डॉट कॉम ही वेबसाईट सुरु केली. त्या साईटला रोज शेकडो लोक भेट देवू लागल्यावर त्याने परत कंपनीला ही बाब सांगितली तरी सुद्धा त्याला कोणीही दाद दिली नाही. आपण साईटवर मॅक डोनाल्डचे बर्गरबद्दल चुकीची खोटी माहिती दिली तर कंपनीचे नुकसान होऊ शकते हे त्याने सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु नेट ही काय चीज आहे ते चिज बर्गर करण्यात मश्गुल असणाऱ्या कंपनीला समजलेच नाही. जगद्विख्यात कंपनीचा हे अजाणतेपण लोकाना कळावे म्हणून त्याने मासिकात लेखच लिहिला. अन मग कंपनी जागी झाली. त्यांचे अधिकारी जोशुआला भेटले अन त्यांनी www.macdonald.com हे नाव विकत देण्याची विनंती केली व किंमत देण्याचे कबूल केले. खरे म्हणजे जोशुआने यामध्ये भरपूर कमाई केली असती. परंतु न्यूयॉर्क मधील सरकारी शाळेला संगणक विकत घेण्यासाठी साडेतीन हजार डॉलर्स कंपनीने द्यावेत असे सांगून जोशुआने विषय संपवला.

301 total views, 1 views today