सर्वात उंच हिमालय अन स्पेसमधून दिसणारी चीनची भिंत – 5 खोट्या समजूती

समझ समझ के समझ को समझो… समझ समझना भी इक समझ है..समझ समझके जो ना समझे ..मेरी समझ मै वो नासमझ है …
“मर्द की जुबान” या धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, पूनम धिल्लोन स्टारर 87च्या बॉलीपटातला हा शब्दसमूह. बराच अर्थपूर्ण. खरेच ना आपण बऱ्याचवेळा समजून उमजून खोट्या सामजूतींना खऱ्या समजून चुकीचा समज करून घेतो. म्हणजे बघाना वटवाघळाला डोळे नसतात, तो अंधळा असतो असा समज असतो. लाल ड्रेस बघितला तर बैल चिडतो असेही लोक म्हणतात. हिमालय हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे असेही आपण म्हणतो. दोस्तहो या सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. कसे ते वाचा…

1. हिमालय जगातला सर्वात उंच पर्वत : चूक

समुद्रकिनारी पर्यटकांचा ग्रुप खेळत असतो. अचानक 6 फुट उंचीच्या अभिषेकला गंमत करावी वाटते अन तो वाळूत एक तीन फुटाचा खड्डा बनवतो व त्यात स्वतः उभे राहून आजूबाजूची वाळू स्वतः भोवती पसरून ठेवतो. त्याच्याकडे बघितल्यानंतर असे वाटत होते की तो जणू काही एक पाय नसलेल्या कंबरेवरचा माणूस आहे.
सांगा पाहू अभिषेकची उंची किती? माझ्या समजुतीने उंची तीन फुट. बरोबर ना? आता तुम्ही म्हणाल हे उत्तर चुकीचे आहे. जरी अभिषेक जमिनीवर तीन फुट असला तरी तो जमिनीखाली तीन फुट आहे हे तू विसरलास. तेव्हा अभिषेकची उंची 6 फुटच.
दोस्तहो हिमालयाच्या उंचीच्या बाबतीतही अशीच चुकीची समजूत आपल्यामध्ये आहे. हिमालयाची उंची 8848 मीटर आहे. पण हवाई बेटावर “मौना की” (Mauna Kea) नावाचा एक पर्वत आहे. त्याची दिसणारी उंची 4206 मीटर आहे. तुम्ही म्हणाल त्याचे काय? दोस्तहो.. हिमालयाची उंची समुद्रसपाटीपासून 8848 मीटर आहे तर “मौना की”ची उंची समुद्रतळापासून 10200 मीटर आहे. तो एक समुद्रात उभा असणार पर्वत आहे ज्याचा थोडा भागच तुम्हा आम्हाला वर दिसतो. चित्रात तुम्हाला समुद्रातील “मौना की” दिसतोय. हिमालयाचा एक इंचही समुद्रात नाही. आता सांगा कोण उंच?

2. पक्षांच्या पिलाना जर आपण हात लावला तर पिलाला त्याचे पालक वाळीत टाकतात : चूक

लहानपणी बागेतल्या झाडावरून एकदा चिमणीचे इत्तुसे पिल्लू टपकदिशी पडले. आम्ही सर्व मित्र त्याच्या भोवती जमा झालो. ते पिल्लू कदाचित उडायला शिकत होते पण सायकल शिकताना जे आपण पहिल्यांदा अनेकवेळा पडतो तसेच उडता न आल्यामुळे जमिनीवर पडले असावे. बिचारे शांत बसून होते. आमच्यातल्याच कोणालातरी त्या पिल्लाला हातात घ्यावे वाटले परंतु सर्वांनी त्या मित्राला तसे करू नको म्हणून सांगितले कारण जर आपल्या हाताचा वास त्या पिल्लाला लागला तर त्याचे पालक पक्षी पिल्लाला परत घेणार नाहीत ही आमची समजूत.
पण ही समजूत खोटी आहे. कारण जसे आपल्या आई वडिलांनी बरेच कष्ट घेवून आपल्याला वाढवले असते तसेच कष्ट पालक पक्ष्यांनी घेतले असते. त्यामुळे केवळ मानवाचा हात वा काहीही लागले म्हणून ते आपल्या पिल्लाना वाळीत टाकत नाहीत. दुसरे म्हणजे बहुतांशी पक्ष्यांना वासाचे ज्ञान नसते. त्यामुळे पिल्लाला वाचवण्यासाठी तुम्ही जर त्याला हात लावला तर त्याचे आई वडील कदाचित तुम्हाला धन्यवादच देतील.

3. जिभेचे वेग वेगळे भाग वेगवेगळ्या चवी सांगतात : चूक

बऱ्याच जणांना असे वाटत असते की जिभेच्या टोकाने गोड चव कळते, खारटपणा जिभेच्या दोन्ही बाजूना समजतो, जिभेचा मध्यभागी आंबटपणा जास्त तर कडवटपणा जिभेच्या मागीलभागी. दोस्तहो ही ही एक चुकीची समजूत आहे कारण जिभेची वा जिभेवरील टेस्ट बड्सची रचना सर्व चवी सर्व ठिकाणी समजण्यासाठी केलेली असते. समजा तुम्ही एक लाकडी चमचा जिभेच्या टोकावर ठेवला तर जी चव तुम्हाला येते तीच चव तुम्हाला तो चमचा जिभेच्या कोणत्याही भागावर ठेवला तर येतेच ना? मग हा सारा माजरा काय आहे? कोणी ही जिभेची चवीनुसार विभागणी केली?याचे उत्तर पूर्वी कोणीतरी लावलेल्या शोधामुळे जगाला असे वाटले की जगात फक्त चारच बेसिक चवी आहेत. त्याम्हणजे गोड, आंबट, खारट व कडू. याच लोकांच्या कडवट समजुतीने नंतर जिभेची चक्क चार भागात विभागणी केली गेली व प्रत्येक भागाला एकेका चवीची मालकी दिली गेली. मग सुरु झाला चुकीच्या समजूत. काह्रे पाहता चवी या फक्त चारच नाहीत तर “फिफ्त टेस्ट” म्हणून ज्या चवीने साऱ्या जगाला वेड लावले अशी एक वेगळी चव पण जगात आहे जी ग्लॅूटेमाईन अॅसिडपासून तयार होते. अजिनोमोटो माहित आहे ना?

4. चीनची भिंत अवकाशातूनही दिसते : चूक

लहानपणापासून आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो की चीनची भिंत इतकी मोठी आहे की ती अवकाशातूनसूद्धा दिसते. हे साफ खोटे आहे कारण ती भिंत ज्या दगड मातीने बांधली आहे ते दगड व माती त्यांनी आजूबाजूच्या जागेतूनच मिळवले आहेत त्यामुळे भिंतीचा रंग आणि आजूबाजूच्या परिसराचा रंग आगदी मिळताजुळता आहे. साहजिकच जसे मिलिटरी रंगाच्या गाड्या जंगलातून जाताना विमानातून दिसत नाहीत कारण त्यांचा रंग जंगलाच्या रंगात मिसळून जातो तसेच चीनच्या भिंतीच्या बाबतीत होते. हा.. चिन्यांनी आपल्याकडचे हौसी कलाकार जसे बघेल ते किल्ले, प्राचीन देवळे विनाकारण आपल्या रंगात रंगवतात तसे काही केले तर ती भिंत अवकाशातून दिसू शकेल. पण त्यासाठीसूद्धा जास्त ताकदीचा कॅमेरा लागेल. नुसत्या उघड्या डोळ्याने भिंतच काय इतर कोणतीच मानव निर्मित वास्तू अवकाशातून दिसत नाही. हे आपण डोळे उघडे ठेवून जाणायला पाहिजे.

5. सरडा आजुबाजुच्या जागेनुसार आपला रंग बदलतो : चूक

सरडा जेथे जाईल त्या जागेप्रमाणे आपला रंग बदलतो अशी अनेकजणांची समजूत आहे. सरडा काही प्रमाणात आपल्या कातडीवरील रंग बदलू शकतो हे जरी खरे असले तरी सरड्याच्या या रंग बदलण्याचे कारण त्या जागेत लपण्यास मदत होणे वा शत्रूला दिसू नये असे बदलणे हे नाही आहे. त्यासाठी निसर्गाने त्याला जो मूळ रंग बहाल केला आहे तो पुरेसा आहे. मग सरडा रंग बदलतो कधी?
सरड्याचा रंग बदलण्याचे कारण म्हणजे त्याच्या मधील शारीरिक, भावनिक बदल. तो चिडला वा गोंधळला तरी त्याच्या कातडीत पॉलीक्रोमॅटिक अॅक्शन होते व रंग बदलतो. अन हो तो रोमँटिक झाला तर इम्प्रेशन मारायलादेखील रंग दाखवतो. आपण कसे वेग वेगळे कपडे घालून शायनिंग करतो तसे..

1,559 total views, 3 views today