कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
हाताच्या बोटांच्या टोकांवर लक्ष्मी, तळव्यामध्ये सरस्वती, मनगटात गोविंद असल्यामुळे सुप्रभाती म्हणजे सकाळी सकाळी जागे झाल्यावर हाताचे दर्शन घ्यावे, नामस्मरण करावे व दिवसाची सुरुवात करावे. असा प्रघात होता. काही घरांमध्ये असेलही. परंतु जागे झाल्यावर बेडमध्येच “करमध्ये मोबाईल” घेवून “प्रभाते व्हॉटसअॅप, फेसबुक दर्शनम” करणारे अनेक. असो. परंतु हे करण्याने वा “प्रभाते परत लोळनम” केल्याने दिवसाची वाट लागू शकते हे अनेकाना पटले आहे. म्हणूनच जागे झाल्यावर कोणत्या 5 गोष्टी नक्की करायचच्या नाहीत याची नेटवरून गोळा केलेली माहिती तुमच्या समोर ठेवत आहे. दिवस नक्की चांगला जाईल.

1. बेडवरून जिममध्ये :

अनेक वीरांना जागे झाल्या झाल्या जिममध्ये दाखल व्हावे वाटते. परंतु हे लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी गडबडीत स्नायूंचा व्यायाम करणे कधीही वाईट. जागे झाल्यावर काही काळ शांततेत घालवा, शरीराला पूर्णपणे जागे व्हायला वेळ द्या. दीर्घ श्वास घ्या, एक ग्लास रेग्यूलर पाणी प्या अन मगच दिवसाची सुरुवात करा. असे म्हणतात की उठताना उजव्या अंगावर वळा अन हळुवारपणे उठा. एकदम जर्क देवून उठू नका. जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे स्नायू विशेषतः पाठीचा कण्यामध्ये ताठरता असते. अचानक जागे होऊन कामाला लागल्यावर ही ताठरता दिवसभरातील तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. तेव्हा एक सिम्पल उपाय करा. उठल्यावर हळूवारपणे हात, पाय 3-4 वेळा स्ट्रेच करा अन मगच कामाला लागा.

2. फोनवरचे हजारो मूड्स :

जागे झाल्यावर जणू काही जगाचे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हालाच सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जागे केले आहे अन त्यामुळेच फोनमधले मेसेजेस वाचायलाच पाहिजेत या अविर्भावात वागू नका. त्यामुळे सकाळच्यावेळी आपली एनर्जी महत्वाच्या कामावर खर्च करुया. 20:20:20 चा रूल सकाळी वापरूया. 20 मिनिटे एक्झरसाईज 20 मिनिटे मेडीटेशन अन 20 मिनिटे मन उत्साहित करणारे अन पुढे नेणारे वाचन. मेसेजेस वाचण्यासाठी ठराविकच वेळ अन तोही दुपारचा द्या.

3. ब्रेकफास्टला दांडी :

भारतीयांपैकी 70 टक्के पेक्षा जास्त लोक ब्रेकफास्टला दांडी मारतात असा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला. कामाची गडबड, वेळ नसणे अश्या अनेक कारणामुळे भारतीय ब्रेकफास्ट करू शकत नाहीत. परंतु ब्रेकफास्ट चुकवणे महागात पडू शकते. सकाळच्या वेळी ब्लड शुगर लेव्हल कमी झाली असते कारण रात्रीचे जेवणानंतर बराच काळ झाला असतो. जागे झाल्यावर पहिल्या अर्धा एक तासात जर तुम्ही काही खाले नाही तर ही लेव्हल आणखीन खाली जाते अन तुम्हाला आळशी बनवते. तेव्हा जमले तर एखादे फळ खा जेणे करून दिवस चांगला जाईल. रिकाम्या पोटी कडक कॉफी वा चहा सारखी अॅसीडिक पेये पिण्यापेक्षा (जी तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम करतात) लिंबू पाण्यासारखे अल्कलाईन पेय प्या. ग्लासभर पाणी नक्कीच परिणाम करेल.

4. दिवसाचा विस्कळीत प्लॅन :

जरासे हटके वाटेल पण हे सत्य आहे. जर तुम्ही दुसऱ्या दिवसाचा प्लॅन आधल्या दिवशी केला असेल व त्यात सकाळी काय करायचे हे ठरवले असेल तर दिवस नक्कीच मनासारखा जाईल. सकाळी उठून आता काय करायचे असा विचार करत वेळ वाया घालवाल तर पुढचा दिवस कूचकामी ठरेल तेव्हा ठरवा अन ठरवल्याप्रमाणे वागा.

5. सकाळची सुरुवात किरकिरी :

काही काही जणांना सकाळी सकाळी उगाचच कम्प्लेंट करावी वाटते व लागते. म्हणजे बघा वर्तमानपत्र जरा उशिरा पोहचले तर किरकिर, चहा मिळाला पण बशी मिळाली नाही तरी किरकिर. ट्राफिक जाम झाला तर xxx. किरकिर झाली म्हणून परत किरकिर. लक्षात ठेवा ही किरकिर तुमची पॉझीटीव्ह एनर्जी कमी करू शकते. शक्यतो सकाळचा वेळी आपल्या कंट्रोलमध्ये नसलेल्या गोष्टीबद्दल राग व्यक्त करू नका त्याने आपलेच नुकसान होते.

1,668 total views, 1 views today