एकेकाळी पुण्यात शिकणाऱ्या चित्रातील ह्याच साध्यासुध्या भारतीय मातेने, भारतातून पूर्वेकडील चीनवर ते पश्चिमेकडील युरोपवर थेट मारा करू शकणारे, अगदी 5000 किलोमीटरमधील पट्ट्यात येणाऱ्या कोणत्याही देशावर अणुबॉम्ब टाकू शकणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवले असेल असे कोणत्याही बाजूने वाटत नाही. होय ना?

परंतु सत्य हेच आहे की याच “मिसाईल मॅन” अब्दुल कलाम यांच्या शिष्येने “अग्नी 5” हे मिसाईल तयार करून जगाला भारताच्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. आज स्मार्ट याच “मिसाईल वूमन” डॉ. टेसी थॉमस यांच्याबद्दल बोलणार आहे. त्यांच्या माहित नसणाऱ्या 5 बाजू दाखवणार आहे.

1. सास बहु अन टेसी :

भारताच्या डिफेन्स रिसर्च आणी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या “अग्नी” या मिसाईलला डेव्हलप करायची जबाबदारी जेव्हा टेसींच्या काबील खांद्यावर टाकली तेव्हा टेसीवर नेव्हल कमांडर सरोजकुमार पटेल यांची पत्नी, तेजस या इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलाची आई, तर स्वतः एक संशोधक या नात्याने तिहेरी जबाबदाऱ्या होत्या. दिवसाला 16 – 16 तास काम करून आल्यावर घारातील जबाबदाऱ्या तितक्याच तन्मयतेने पार पाडणाऱ्या या टेसी “सास बहु..” सारख्या टीव्ही सिरियल्सही जमेलतश्या पहायला विसरत नाहीत. “तू हे सर्व कसेकाय बघू शकतेस असे त्यांच्या पतीने विचारल्यावर “मला त्या हिरोइन्स कशा निटनेटक्या राहतात ते बघायला आवडते….” ही त्यांची वाक्ये त्यांच्यात दडलेलं भारतीय स्त्रीचं एक रूप दाखवत असतील. (कदाचित देशाला जगात मानाचे स्थान मिळवून देत असताना त्यांनी गमावलेले काही क्षणदेखील त्या हुडकत असतील…)

2. पुण्यात पाया अन पती :

भारताच्या मिसाईल वूमनचे पुण्याशी फार घनिष्ट संबंध आहेत. टेसीनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन, (एम.टेक.) पुण्याच्या डिफेन्स इन्स्टीट्युट ऑफ आर्मामेंट टेक्नोलॉजी मधून पूर्ण केले. खरेतर त्या आय एस एस पण होऊ शकल्या असत्या. ती परीक्षापण त्यांनी दिली होती. परंतू आपल्या सुदैवाने त्यांनी पुण्यातल्या डीआरडीओमधून शिक्षण पूर्ण करायचे ठरवले. पुण्यातच त्यांनी भविष्यातील त्यांच्या वाटचालीचा “पाया” रोवला हे म्हणायला हरकत नाही. कालांतराने स्वतः अब्दुल कलाम यांनी टेसी यांचे सिलेक्शन अग्नी मिसाईल प्रोग्रॅमसाठी केले.

अन हो… पुण्यातच त्यांच्या आयुष्यात सरोजकुमार आले. सरोजकुमार अन टेसी पुण्यातील डीआरडीओमध्ये एकत्र शिकत होते. कालांतराने दोघांनी एकमेकांचे सिलेक्शन भविष्यासाठी केले.

3. “अग्निपुत्री” ला आवडती वेरोनिका :

टेसी “अग्निपुत्री” या नावानेसुद्धा ओळखल्या जातात. भारताच्या एक अतिमहत्वाच्या व्यक्ती म्हणून त्याना सतत सुरक्षेखाली राहावे लागते. 24 तास त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो. भारताला सुपर पॉवर बनवण्याचे तुमचे आमचे स्वप्न साकार करत असताना त्यांना स्वतःसाठी फारच थोडा वेळ देता येतो. रोज 16-16 तास काम करून त्या जेव्हा घरी परततात तेव्हा त्यांचे हे सायंटीस्ट रूप रॉकेटसारखे झूम करून उडून जाते अन त्यांच्यातील गृहिणी प्रकट होती. अग्निमधील 5000 किलोमिटर लांबीच्या वायरींचा विचार सोडून त्या किचनमध्ये टोमॅटो आम्लेट करायचे का उत्तप्पा याचा विचारही करू शकतात. एकेकाळी बॅडमिंटनच्या चॅम्पियन असणाऱ्या टेसींना अर्चिजची कॉमिक्स वाचायचे वेड होते. त्यातील सरळ स्वभावाची “बेट्टी” आवडते का फॅशनेबल “वेरोनिका” असे विचारल्यावर बिनदिक्कत “वेरोनिका” हे उत्तर देवून त्या आपली “नॉटी” बाजू दाखवायला विसरत नाहीत.

4. टेसी, कलाम अँड टेरेसा :

केरळ मधील अलाप्पुझा गावातील IFS ऑफिसरला जेव्हा मुलगी झाली तेव्हा बाळाचे नाव काय ठेवायचे यावर सगळीकडे जशी चर्चा होते तशी चर्चा झाली. आई बाबांना मुलीने मोठे होवून जगाला सुख अन शांती द्यावी असे वाटले. अन मुलीचे नाव मानवतेसाठी झटणाऱ्या “मदर टेरेसा” यांच्या नावावरून “टेसी” असे ठेवण्यात आले. मोठी होवून मुलगी अब्दुल कलामांच्या पाऊलावर पाउल टाकून अतिसंहारक क्षेपणास्त्रे तयार करेल असे त्याना आजीबात वाटले नसेल. परंतु टेसींना आपल्या या कृत्यावर गर्वच आहे. त्या म्हणतात “मी जे अस्त्र तयार केले आहे ते फक्त बॉम्ब नाही तर फुलांना देखील वाहून नेवू शकते”, “आणी मी ते अशा देशासाठी बनवले आहे  जो शांतीचा पुरस्कर्ता आहे”

5. अभी तो पिक्चर बाकी है :

अंतरखंडीय क्षेपणास्त्र तयार करून भारताला अमेरिका, रशिया, फ्रांसच्या पंगतीत बसवणाऱ्या टेसी थॉमस अत्यंत क्रियाशील आहेत. त्यांची संशोधक वृत्ती सतत नाविन्याच्या शोधात असते. म्हणूनच एकाच वेळी 1000 किलो वजनाचे अणुबॉम्ब शत्रू देशावर टाकू शकणाऱ्या अस्त्राच्या निर्मिती नंतरसुद्धा त्या शांत नाहीत. आता दहा हजार किलोमीटरवर मारा करू शकणारी अन एकाच वेळी अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ला करू शकणारी (MIRV) सिस्टम असलेले अग्नी 6 तयार करण्याचे वेध त्यांना लागले आहेत.

लगता है, भारत की ये मिसाईल वूमन दुनियाको इशारा कर राही के “दोस्त …अभी तो पार्टी शुरू हुई है, असली पिक्चर अभी बाकी है”

1,967 total views, 3 views today