म्हणतात ना लग्न पहावे करून.. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील खूप महत्वाचा निर्णय असतो. परंतु हा निर्णय भल्या भल्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो. अन जर तो चुकला तर सर्व काही होत्याचे नव्हते झाले असे वाटू शकते. लग्न ठरवताना अनेक लोक मुलीची उंची किती, जाडी किती वा मुलाचा पगार किती, घरी कोणकोण असते असल्या वर वर दिसणाऱ्या बाबींची चौकशी करतात अन लग्नाला होकार देतात. पण दोस्तहो, लग्न व पुढील आयुष्य जर सुखरूपपणे पार पाडायचे असेल तर इतर अनेक गोष्टी पहायला पाहिजेत अन त्यावर लग्नाआधीच चर्चा करायला पाहिजे असे सुखी संसाराच्या टिप्स देणारे म्हणतात. पाहुया तर कोणती चर्चा केल्यावर परिवार सुखी होऊ शकेल..

बऱ्याच वेळा हा निर्णय चुकण्यामागे दोन्ही कदाचित तुम्ही दोघे पुर्वीपासून डेटींग करत असाल अथवा एकमेकांना चांगले ओळखत देखील असाल.तरीही लग्न व एकमेकांसोबत रहाण्यापुर्वी तुम्ही काही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत.त्यामुळे लग्नाआधी एकमेकांसोबत बोलताना तुमच्या आयुष्याबद्दल अथवा करियरबद्दल मोकळेपणाने प्रश्न विचारण्यास अजिबात लाज बाळगू नका.

1. जॉईन्ट का सेपरेट :

तुमचे लव्हमॅरेज असो किंवा अरेंजमॅरेज तुम्ही लग्नाआधी एकमेकांसोबत वेळ खूप मोकळेपणे बोलणे अपेक्षित असते. विशेषतः मुलींचा लग्नानंतर सासरच्या मंडळीशी नेमके कसे वागावे याबाबत गोंधळ उडू शकतो. यासाठी लग्नानंतर जर काही महिने अथवा वर्षे तुम्ही सासरच्या मंडळीसोबत रहाणार असाल तर आधीच जोडीदाराबाबत याविषयी चर्चा करा. जर तुम्ही एकत्र कुटूंबात रहाणार असाल तर तुमच्या सासरच्या मंडळींना तुमचे आई-वडील तुम्हाला भेटण्यास अथवा तुमच्यासोबत रहाण्यास आलेले चालू शकते का? दोघांच्या आईवडीलांपैकी तुमच्या आईवडीलांना तुमच्यासोबत रहाण्याची व त्यांची काळजी घेण्याची स्थिती निर्माण झाल्यास तुम्ही काय कराल? या सर्व गोष्टींबाबत नीट एकत्र संवाद करुन आधीच चर्चा केली असेल तर तशी वेळ आल्यावर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.

2. करियर व आर्थिक व्यवहार :

तुम्ही दोघही जर करियर-ओरीएंटेड असाल तर कदाचित लग्नानंतर तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो.कौटूंबिक स्वास्थासाठी तुमच्यापैकी कोण करियरमध्ये तडजोड करण्यास तयार आहे? त्याने किंवा तिने किती प्रमाणात तडजोड करणे तुम्हाला अपेक्षित आहे? तुमच्या पैकी कोण एकमेकांसाठी दुस-या शहरात जॉब करण्यासाठी तडजोड करु शकतो? मुले व घरातील इतर जबाबदा-या सांभाळून तुम्ही दोघे कशाप्रकारे एकमेकांच्या करियरला प्रोत्साहन देऊ शकता? या अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाबाबत तुम्ही लग्नाआधीच चर्चा केलेली नेहमी योग्य असू शकते.

तसेच लग्नाआधी एकमेकांच्या आर्थिक मिळकतीबाबत चर्चा जरूर करा हे करणे स्वार्थीपणाचे लक्षण मूळीच नाही. लग्नाआधीच मोकळेपणाने तुम्ही एकमेकांच्या इंन्कम,वैयक्तिक खर्च,कर्ज,देणी याविषयी चर्चा करुन तुमच्या भविष्याचील आर्थिक गोष्टीबाबत नियोजन करु शकता. खर्च एकाच्याच मिळकतीतून करुन दुस-याने बचत करायची आहे की दोघांनी हा खर्च वाटून घ्यायचा आहे हे एकमेकांसोबत चर्चा करुन ठरवा.

3. पर्सनल/ सोशल स्पेस :

प्रत्येकाला नात्यामध्ये स्वत:ची स्पेस व स्वालंबन हवे असते. जर तुम्ही तुमच्या सहजीवनाला सुरुवात करणार असाल तर आधीच याबाबत बोलून घ्या. तुम्ही तुमच्या कुटूंब,मित्रमैत्रिणी यासाठी वेळ देत असतानाच स्वतःचे छंद, आवडी जोपासू शकता का ह्यावर चर्चा करा. नंतरच्या आयुष्यात तुमच्या आवडी निवडीच्या गोष्टी करता येत नाहीत म्हणून होणाऱ्या ताण तणावापासून आधीच सुटका होण्यासाठी हे आवश्यक.

असे म्हणतात की एकमेकांपेक्षा भिन्न स्वभावाच्या जोडीदारांचे चांगले जमते. पण लग्नानंतर अशा दोघांनी सुखाचा संसार करणे कदाचित फार कठीण असू शकते. कारण तुम्ही खूप बोलके, लोकांमध्ये पटकन मिसळणारे सोशल असाल व तुमचा जोडीदार शांत व एकलकोंडा स्वभावाचा असेल तर तुम्हाला पुढे खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे लग्नाआधीच पार्टनरला बाहेर फिरणे आवडते का? तो दर विकएन्डला काय करायचे वा करायचे नाही? किंवा दुसऱ्याच्या सतत बाहेर जाण्याच्या स्वभावामुळे तुम्ही घरी एकटे पडू शकता का? या अनेक शंकाबाबत लग्नाआधीच नीट चर्चा करा.

4. बच्चे :

“हम दो, हमारे दो” चा जमाना गेलाय. हल्ली मुलांच्या संगोपानाची जबाबदारी कोणी घ्यायची यावर खटके उडताना दिसत आहेत. म्हणूनच तुम्हाला दोघांना मुले हवी आहेत की नको आहेत? तुमच्या पैकी एकाला मुल दत्तक घेण्यात रस आहे का? तुमचा जोडीदार या गोष्टीसाठी मान्य आहे का? किंवा जर तुम्हाला मूल हवे असेल तर पहिले मूल होण्यासाठी तुम्ही किती काळ थांबू शकता ? तुम्हाला दोघांना किती मुले हवी आहेत? मुलांवर कसे संस्कार तुम्हाला करायचे आहेत? तुम्हाला मुलांना स्वच्छंदी की शिस्तीत वाढवायचे आहे? लग्नापूर्वी या सर्व गोष्टींबाबत तुमचे एक मत असणे गरजेचे.

5. आरोग्य :

सर्वात म्हणजे आरोग्य. ज्यावर फारच कमी चर्चा लग्नाआधी केली जाते. जे चुकीचे आहे. ब-याचदा जोडीदार आपली फॅमिली हेल्थ हिस्ट्री एकमेकांपासून लपवून ठेवतात.पण भविष्यातील समस्या आधीच टाळण्यासाठी लग्नाआधी या गोष्टीबाबत मोकळेपणाने चर्चा करा.जर तुम्हाला भुतकाळात एखादी शारीरिक अथवा मानसिक आरोग्य समस्या झाली असेल तर ती प्रामाणिकपणे सांगितल्यामुळे योग्य जोडीदार तुमचा मनापासून स्विकार करु शकतो.त्याचप्रमाणे आताही तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर त्या त्यांना सांगितल्यामुळे कदाचित त्याच्या प्रेमामुळे त्या समस्येवर मात करणे तुम्हाला अधिक सोपे जाईल.

तर दोस्तहो, लव्ह अॅट फर्स्ट साईट, आंखो आंखोमे प्यार ह्या गोष्टी असू द्याच परंतु लग्नाआधी डोळे उघडून डोळसपणे विचार अन चर्चा करा. नाहीतर लग्नानंतर डोळे पांढरे होण्याची शक्यता..

3,412 total views, 3 views today