5 ऑगस्ट 1962….मर्लिन मन्रो तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. सोबतीला होती झोपेच्या गोळ्यांची बाटली. ड्रग ओव्हरडोसनं तिचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात आले जे आजही कोणी सिध्द करू शकले नाही. मर्लिननं आत्महत्या केली की तीचा खून झाला हे न उलगडलेले कोडेच आहे.
मर्लिन जिवंत होती तेव्हा तर तीनं सगळ्यांनाच झपाटून टाकलं होतचं. पण तीच्या मृत्यूनंतरही तीनं अनेकांना प्रेरणा दिली. मॅडोना, एल्टन जॉन, लेडी गागा अश्या अनेकांची प्रेरणा मार्लिन मृत्यूनंतरही न उलगडलेलं एक कोडंच राहिली. दोस्तहो आज मर्लिन मेन्रोबद्दल बोलणार आहोत. कारुण्याची छटा असलेले हे मादक आयुष्य खरोखरच जीव लावणारे अन जीवाला चटका देणारे.

 

1. ना बाप ना धड आई.. :

1 जून 1926 ता लॉसएंजेलिस सरकारी दवाखान्यातील जनरल वार्ड… एका वेडसर महिलेने मुलीला जन्म दिला. नार्मा जीन नावाच्या या मुलीचे वडिल कोण होते हे कोणाला शेवटपर्यंत कळलंच नाही. आईच्या वेडेपणामुळं नार्मा जीनची अनाथालयांमध्ये रवानगी कारण्यात आली. बालपणीचं तिच्या वाटयाला आलं शोषण आणि उपेक्षा. काही नातेवाईक होते पण त्यांनीही जबाबदारी झटकण्यासाठी सोळाव्या वर्षीचं तिच्या लग्नाचा घाट घातला. नवरा मर्चंट नेव्हीत. त्यामुळं तो बराच काळ समुद्रावरच असे. पैश्याच्या अडचणीमुळे एका विमान कंपनीच्या प्लॅन्टमध्ये नार्मा जिनने नोकरी धरली… नार्माचं बालपण म्हणजे होती एक दु:खाची कहाणी… पुढे ग्लॅमरस म्हणून गाजलेल्या नार्माच्या तेव्हापर्यंतच्या आयुष्यात चमकदार असं काहीच नव्हतं…

2. एक फोटो.. सिर्फ एक फोटोने नार्माको मर्लिन बना दिया :

कलाटणी मिळाली ती 1945 साली… एका फोटोग्राफरनं तिचा फोटो काढला आणि ती काही मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली. ट्वेन्टीथ सेन्चुरी फॉक्स या फेमस कंपनीनं कॅमे-याच्या प्रेमात पडण्याची तिची क्षमता ओळखली आणि मग जन्म झाला एका दंतकथेचा.
पुढे तिचं लग्न मोडलं आणि मग अभिनय हाच मर्लिनचा श्वास बनला. तिचा घटस्फोट झाला त्याच वर्षी म्हणजे 1946 ला तीनं पहिला चित्रपट साईन केला.. तिचं मुळ नावं नार्मा जीन टाकून तीनं मर्लिन मन्रो हे ग्लॅमरस नाव धारणं केलं ते याच काळात.

3. छत्तीस वर्षाच्या आयष्यात तेहतीस चित्रपट :

पुढच्या दशकभरात मन्रोनं कॉमेडी आणि नाट्यमय चित्रपटांमधून रसिकाचं मनोरंजन केलं… हाऊ टू मॅरी ए मिलिओनियर, सम लाईक इट ह़ॉट, डोन्ट बॉदर टू नॉक आणि नायगारा हे तिचे चित्रपट याच काळातले. तिच्या अभिनयाचंही कौतुक होऊ लागलं होतं. सम लाईक इट हॉट या चित्रपटासाठी तिला गोल्डन ग्लोब अर्वाड मिळालं. बस स्टॉप मधल्या तिच्या अभिनयाची न्यूयॉर्क टाईम्सनं स्तुती केली. ती इंटरनॅशनल स्टार बनली. हावर्ड हॉक्स, जॉन ह्यूस्टन, लॉरेन्स ऑलिव्हिए, बिली वाईल्डर अशा प्रतिभावंतांच्या साथीनं तीनं हॉलिवूडचा रुपेरी पडदा गाजवून सोडला.
ती जगली फक्त छत्तीस वर्ष. पण या 36 वर्षात मार्लिनच्या एकूण चित्रपटांची संख्या होती 33.

4. सौदर्यामध्ये अनेकांना रस :

अशा सौंदर्यवतीच्या आयुष्यात अनेक पुरुष आले नसते तरच नवल. पहिले लग्न मोडल्यावर आर्थर मिलर या प्रतिभावंत लेखकासोबत तीनं लग्नाचा पुन्हा डाव मांडला. पण तो फारसा रंगला नाही. नंतर बेसबॉलपटू ज्यो, सर लॉरेन्स ऑलिव्हिए, फ्रँक सिनात्रा ते अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी मार्लीनच्या आयुष्यात आले. हॉलिवूडचं ग्लॅमर म्हणजे मर्लिन मन्रो, सौंदर्याचा मापदंड म्हणजे मर्लिन मन्रो, अभिनयाचा मानदंड म्हणजे मर्लिन मन्रो, फॅशन आणि स्टाईलचा आयकॉन म्हणजे मर्लिन मन्रो असे समीकरणच त्याकाळी सर्वमान्य होते. मर्लिनच्या रुपानं सगळ्यांनाच भूरळ घातली होती परंतु वैयक्तिक जीवनात मार्लिनचे सूर कोणाशीच जुळले नाही. कदाचित सर्वांना तिच्यामध्ये नव्हे तर तिच्या सौदर्यामध्येच रस होतां. प्रतिभावंत कालाकारची ही एक शोकांतिकाच. यामुळे आलेल्या एकाकीपणामुळे व आपले सतत शोषण होत आहे या जाणीवेतून मर्लिनचे जग पुन्हा पुन्हा उध्वस्त होत होत पण पुन्हा पुन्हा सावरणं मर्लिनच्या रक्तातच होते. म्हणून तर लिव्हिंग लिजंड म्हणजे मर्लिन मन्रो असे म्हटले जाते.

5. शापित अप्सरा मर्लिन मन्रो :

आयुष्यातील उलथापालथीमुळं तिची महत्वाकांक्षा, हेकेखोरपणा, लहरीपणा वाढू लागला. यातच तीने व्यसनांना जवळ केलं. 1961 ला आलेला द मिसफिटस् हा तिचा शेवटचा पूर्ण झालेला चित्रपट ठरला. 1962 मध्ये समथिंग्स गॉट टू गिव्हमधून तिची हकालपट्टी झाली. अनेक दिवस चित्रपटाच्या शूटिंगला तीनं दांडी मारली होती. मग तो चित्रपटही बाळगळला. शेवटचे दोन चित्रपट लेट्स् मेक लव्ह आणि द मिसफिट्स् बॉक्स ऑफिसवर आदळले. एकीकडे एकाकीपणा आणि दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरचं अपयश मार्लिनला व्यसनाच्या अधिक जवळ घेऊन गेले असे म्हणतात. परंतु अपयश कसे पचवायचे हे मार्लिनला खास माहित होते. ते तिच्या रक्तातच होते. 1962 मध्ये मर्लिन मन्रोनं ब्रेंटवूडमध्ये एक आलिशान घर घेतलं. हे घर सजवण्यासाठी खास खरेदीही केली. आपल्या या आलिशान घरात उर्वरित आयुष्य सामाधानात घालवण्याची स्वप्न ती पाहू लागली. परंतु थोड्याच दिवसात म्हणजे 5 ऑगस्ट 1962 ला ती बेडवर रहस्यमयपणे मरून पडलेली जगाला दिसली. ड्रगचा ओव्हरडोस घेवून तिने स्वतः मृत्यूला मिठी मारली असे सरकारतर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षदर्शी पुराव्यावरून ते सिध्द होऊ शकले नाही. त्याउलट तिने आत्महत्या केली नाही याचे पुरावे जास्त होते.लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेन्टचा गुप्तहेर जॅक क्लेमेन घटनास्थळी पहिल्यांदा पोहचला. त्याच्या मते मार्लिनला इंजेक्शनद्वारा झोपेचा प्रचंड मोठा डोस देण्यात आला असावा. असे त्याने जाहीर रीत्या कबुलही केले.

मार्लिनचे जिवंत असणे काहींना तापदायक ठरू शकत होते. मार्लिनला सरकारने, केनडींनी मारवले का? का घरगड्याकडून कोणी मार्लिनची हत्या करवली? हा प्रश्न आजही अनुत्तरीत राहिला अन मार्लिन एक जिवंत दंतकथा बनली.

577 total views, 1 views today