दूर उंचावर समुद्रापासून 7500 फुटावर एका डोंगरात जवळपास दोनशे फुटाचा स्त्रीचा चेहरा तोपण सोन्याने मढवलेला… असे जर कोणी सांगितले तर तुम्हाला कदाचित पटणार नाही. परंतु पेरू देशातील अॅडीयन पर्वतरांगामध्ये जर फेरफटका मारला तर इंका साम्राज्याच्या पाउलखुणा “माचू पिच्चू” नावाच्या ठिकाणी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. प्रगत अन संपन्न इंकानी कठीण कडे-कपारीत जी नागरी उभा केली ती पाहून मती गुंग झाली नाही तर नवलच. चित्रातील देवांच्या चेहऱ्याचा डोंगर ही फक्त सुरुवात आहे. दोस्तहो जगातील सात नवीन अश्चर्यामध्ये ज्याचा समावेश होतो त्या रहस्यमय माचू पिच्चूची गुपिते आज आपण बघणार आहोत.

1. अजस्त्र 50 टनी पायऱ्या :

“माचू पिच्चू” म्हणजे म्हातारा डोंगर. उंचावरील या डोंगरातील इंकांची ही वसाहत सुमारे 1450 च्या दशकात उभारली गेली. पेरू देशातील या शिखराच्या कड्यामध्ये 150 इमारती अन 100च्या वर जिने बांधले गेले. विशेष म्हणजे पायथ्याशी येणाऱ्या शत्रुला एकही इमारत दिसू नये अशीच रचना केली गेली. त्यामुळे 600 वर्षानंतर आजदेखील बऱ्याच इमारती अन जिने शाबूत आहेत. जीन्यासाठी वापरले गेलेल्या पायऱ्या 50 टनांच्या अजस्त्र शिळा कोरून तयार केले आहेत. एवढे वजनदार दगड कड्यावर कसे नेले अन बरोबर काटकोनात कसे बसवले हे आजच्या प्रगत तंत्रज्ञाला पडलेले कोडेच आहे. जे आजवर सुटले नाही.

2. निद्रित स्त्रीचा मुखवटा :

वसाहतीला लागून असलेल्या डोंगराचा आकार चेहऱ्यासारखा आहे हे पाहिलेच. परंतु वसाहतीत त्याहून अजब गोष्ट पहावयास मिळते ती म्हणजे निद्रित स्त्रीचा प्रचंड मोठा मुखवटा. सन 1911 च्या संशोधन व उत्खननानंतर तेथे सापडलेल्या वस्तू ज्यामध्ये दागिने, भांडी अन मृत पावलेल्या इंका लोकांचे अवशेष अमेरिकेत अभ्यासासाठी नेले गेले. सापडलेल्या हाडांचे परीक्षण केल्या नंतर जे समजले ते विचित्रच होते. बहुतांशी हाडे ही स्त्रियांचीच होती. जणू काही “माचू पिच्चू” ही स्त्रियांची वसाहत होती अशी शंका येते. जावळे एका टेकडावर दगडामध्ये तासलेला प्रचंड मोठा स्त्री मुखवटा असेच काही दर्शवतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या परीक्षणात या दगडावर सोन्याचा अंश सापडला. म्हणजे हा 200 फुटी मुखवटा सोन्याने मढवला होता तर. सूर्यकिरणात अवकाशातून चमकती दिसणारी ही स्त्री त्यावेळच्या मातृसत्ताक संस्कृतीची जाणीव करून देणारी असेल का?

3. ग्रह ताऱ्यांवर आधारित रचना :

इंकांना खगोल शास्त्राचे सखोल ज्ञान होते असे दिसते. कारण वर्षातील कोणत्या दोन दिवशी दिवस अन रात्र सारखे असतात हे त्यांना कोणत्याही आधुनिक उपकरणाशिवाय माहित होते. त्यादिवशी सूर्य माचू पिच्चू वरून कोणत्या ठिकाणवरून गेल्यावर आपली सावली अजिबात पडत नाही ते नेमके ठिकाण त्यांनी शोधून काढले होते. चित्रात दाखवलेला पवित्र खांब त्या ठिकाणची निशाणी आहे. 11 नोव्हेंबर व 30 जानेवारी या दोन दिवशी या खांबावरून सूर्य जात असताना सावली पडतच नाही.

4. सिमेंटशिवाय जुळलेले दगड :

माचू पिच्चूतील भिंती वास्तुकलेचे विलक्षण नमुने आहेत. इंका लोक किती प्रगत होते हे त्यावरून समजते. भिंतीना वापरलेल्या टना टनाच्या दगडी विटा एकावर एक कशा ठेवल्या हे तर समजतच नाही. पण त्या दगडाच्या जोडामध्ये कोणत्याही प्रकारचे सिमेंटवजा साहित्य वापरले नाही हे विशेष. कोरीव दगड फक्त एकमेकांवर ठेवले आहेत. पण ते अशा प्रकारे कोरले आहेत की दोन दगडामध्ये कागदासारखा पातळ पत्रादेखील आत जात नाही. म्हणजे अगदी परफेक्ट मॅच. आजदेखील दगड तसे तासणे महाकठीण काम आहे.

5. रजनीकांत अन इंका :

इंका संस्कृतीबद्दल फक्त संशोधकांना, प्रवाश्यांनाच आकर्षण आहे असे नाही तर हॉलीवूडसह तमाम पिक्चरवाल्यांना इंकाप्रेम झाले. 1954 ला “अ सिक्रेट ऑफ इंका”, 2004 ला “अ मोटरसायकल डायरी” असे अनेक चित्रपट माचू पिच्चुला चित्रित झाले. परंतु 2007 ला युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा ठिकाण म्हणून घोषित केले अन चित्रीकरणाला बंधन घालण्यात आले. परंतु 2010 च्या रजनीकांतच्या “एदिरण”चे (Ethiran) चित्रीकरण माचू पिच्चुला झालेच. प्रत्यक्ष भारतीय सरकारने परवानगीसाठी हस्तक्षेप केला. म्हणतात ना रजनीला सबकूछ माफ है.

554 total views, 2 views today