दोस्तहो, हैद्राबादच्या निझाम अन त्याच्या अमाप संपत्ती याबद्दल आपण अनेकवेळा काही न काही वाचत आलो आहोत. 1930 ते 1940 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून सातवा निझाम, मीर ओस्मान अली खान ओळखला जायचा. परंतु नुसती श्रीमंती नव्हे तर त्यांच्या विचित्र वागण्यामुळे सुद्धा निझाम प्रसिध्द होता. जगातील पाचवा मोठा हिरा, ज्याला जेकब डायमंड म्हणून ओळखले जाते, त्या 50 मिलियन ब्रिटीश पाउंड म्हणजे साधारणपणे 440 कोटी रुपयांच्या Jacob Diamond हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर करणारे निझाम. पण त्याच बरोबर पैसे वाचवायला विझलेल्या सिगारेटचे थोटूक परत पेटवून ओढणारे, स्वतःचे पायमोजे स्वतः शिवणारेही निझामच…

खरे म्हणजे निझाम यांच्या अमाप संपत्तीबद्दल लिहायचे म्हणून वाचन सुरु केले अन समोर आली निझाम राजाची हटकी बाजू. वाचा तर 36 रोल्स रॉईसच्या हेकट व चेंगट मालकाच्या या 5 हटक्या गोष्टी.

1. पायमोजे विणणारा चेंगट निझाम :

चित्रात तुम्हाला निझाम दिसतात. भरजरी शेरवानी, डोक्यावर हिरेजडीत पगडी घातलेला तरुण. अन त्याच्या शेजारी गरीबासारखे उभारलेले निझाम. होय तेच हे जगातील श्रीमंतापैकी एक असलेले निझाम. अमाप संपत्तीचा राजा…परंतु अत्यंत हटका निझाम..

जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखले जाणारा हा निझाम स्वतःसाठीच्या खर्चाबाबत अत्यंत चेंगट होता. दिवसाकाठी फक्त 1 पाउंडच्या आसपास म्हणजे 80 – 90 रुपये तो खर्च करायचा. त्याकाळची स्वस्तातील स्वस्त बिडी सिगारेट ओढायचा. इतकेच नव्हे तर सिगारेटच थोटूक पुन्हा पेटवून पण ओढायचा. दुसऱ्यांकडे सिगारेट उसनी मागायला त्याला अजिबात संकोच वाटायचा नाही. एकदा तर राजवाड्यात आलेल्या व्हीझीटर कडून सिगारेट मागून त्याचे दोन भाग त्याने केले होते. एक तुकडा परत देवून अर्धी सिगारेट ओढतच त्याने बातचीत केली.

अंगावर पांघरायला एक चादर विकत आणायला त्याने एकदा नोकराला कमी पैसे देवून बाजारात पाठवले. परंतु तितक्या कमी पैश्यात चादर मिळाली नाही म्हणून अंगावर स्वस्तातले घोंगडे घेवून झोपायाला पण त्याने कमी केले नाही. असा हा निझाम.

2. 5000 किलो सोने देणारा दानशूर निझाम :

भारताच्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धानंतर भारतीय सरकारला पैश्याची तंगी जाणवू लागली. त्यातच चीनकडून आक्रमण होण्याची चिन्हे दिसू लागली. अश्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संरक्षण मंत्री लाल बहादूर शास्त्रीनी निझामाची भेट घ्यायचे ठरवले. सरकारने सुरु केलेल्या डिफेन्स फंडासाठी निझामांनी काही पैसे द्यावेत हा हेतू. लाल बहादूर शास्त्रींना निझाम निराश करणार नाही हे माहित होते. परंतु निझाम किती मदत करेल याची कोणालाच जाणीव नव्हती. अन झालेही तसेच. निझामांनी चक्क 5000 किलो सोने Indian Defense Fund ला भेट दिले. 5000 किलो….एका माणसाकडून जगातील कोणत्याही देशाच्या डिफेन्स फंडाला मिळालेली आजतागायतची ही सर्वात मोठी मदत. ज्याचा हा जागतिक विक्रम अजूनही शाबूत आहे.

पण सोन्याने भरलेले ट्रक्स पाठवत असताना निझामांनी आपला चेंगटपणा विनोदाने दाखवून दिलाच. ते म्हणाले मी सोने दिले आहे ट्रक्स नव्हे. तेव्हा ट्रक्स परत द्यावेत ही विनंती.

विरोधाभास म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा याच निझामाने हैद्राबाद राज्य भारतात विलीन केले नव्हते. 1948 ला बळजबरीने त्यांना तसे करायला भाग पाडण्यात आले होते. परंतु म्हणून काही त्यांनी राग मनात ठेवला नव्हता. मदत ही केलीच.

3. असंख्य मुलाबाळांचा पिता निझाम :

निझाम हा राजा होता. त्यांच्या सात पिढयांंनी हैद्राबाद राज्यावर सत्ता गाजवली होती. इंग्लंड व स्कॉटलंड पेक्षाही त्यांचे हे राज्य मोठे होते. अमाप संपप्ती तर होतीच. पण याच शेवटच्या निझामाचे कुटुंबही प्रचंड मोठे होते.

सातवा निझाम मीर ओस्मान अली खानच्या पत्नींची संख्या अन त्याला असणाऱ्या मुलांची संख्या हा शेवटपर्यंत संशोधनाचा विषय ठरला. काहींच्या मते त्याला 86 बायका तर 149 कायदेशीर मुले होते. किती स्त्रियांचा निझाम पती होता अन शेवटची पत्नी कोण होती याचा वाद अजूनही चालू आहे. पण सर्वात पहिली पत्नी अझामुन्निसा बेगम होती हे नक्की. 14 एप्रिल 1906 साली त्यांचे लग्न झाले. अन त्याच्या अनोख्या अंदाजात निझामाने त्यावेळचे एक लाख रुपये अन 128 किलो सोने पत्नीला गिफ्ट केले.

(नुकतेच वाचले 10 ग्राम सोन्याचा भाव तीस हजार रुपयांच्या वर आहे….ह..)


4. गाड्यांचा शौकीन निझाम :

निझामाच्या वेगळेपणाचे आता पर्यंत तुम्हाला दर्शन झालेच असेल. त्यांच्या अनेक शौकांमध्ये त्याना असणारा कार्स बद्दलचा शौकही वेगळेपणाचा. 1900 ते 1950 पर्यंत भारतात आयात झालेल्या 166 रोल्स रॉईस या महागड्या कार्सपैकी 36 रोल्स रॉईस हैदराबाद राज्यांकडे होत्या. इतकेच नव्हे तर नापिअर, फोर्ड टुरर, पॅकार्ड 2000 डिलक्स, ब्युईक कन्व्हर्ट यासारख्या लक्झरीयस महागड्या गाड्यांचा ताफाच निझामाकडे होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सातव्या निझामाच्या मृत्युनंतर निझामाच्या प्रचंड संपत्तीचा वारस कोण होणार याचा वाद सुरु झाला. अनेक लग्ने व त्यापेक्षाही जास्त मुले यांच्यातील वादाच्या काळातच निझामाचे दाग दागिने, सोने नाणे सरकार जमा झाले.

या सर्व काळात निझामाच्या अतिसुंदर महागड्या गाड्यांचा खजिना गंजत गेला. आज यापैकी हातावर मोजण्या इतक्याच कार्स शिल्लक आहेत. त्यापैकी चित्रात दिसणाऱ्या 1912 मेकच्या रोल्स रॉईस सिल्व्हर घोस्ट डोम रुफ लिमोझिन (1912 Rolls Royce Silver Ghost Dome Roof Limousine) नव्याने मलमपट्टी करून अलीकडेच विकण्यात आली. संपूर्ण आयुष्यात केवळ 356 मैल धावलेल्या या सुंदरीला आपलेसे करायला एका प्रेमीने 20 कोटी रुपये मोजले..

(दोस्तहो, निझामाने रोल्स रॉईसचा वापर रस्ते झाडायला केला असे ऐकले होते परंतु नेटवर तसा कोठेही ठोस पुरावा मिळाला नाही)

5. निझामाचे शूज अन बनारस हिंदू युनिव्हर्सिटी :

आता जरा आणि हटके निझाम गोष्ट. भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी मेहनत केलेल्या पैकी पंडित मदन मोहन मालवीय एक. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची 1916 सालची ही खरी गोष्ट. पंडितजींना बनारसमध्ये प्रगत शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी सुरु करावी असे वाटत होते. पण त्यासाठी लागणारा पैसा कोठून मिळणार याची त्याना भ्रांत होती. म्हणूनच जगातील एक श्रीमंत माणूस असलेल्या निझामाला भेटण्यास ते हैदराबादला पोहचले. निझामाला युनिव्हर्सिटीबद्दल माहिती सांगून त्यांनी पैसारूपी मदतीची मागणी केली. का कोणास ठावूक हे ऐकताच निझामाला फार राग आला अन त्याने रागाने पंडित मदन मोहन मालवीय यांच्याकडे स्वतःचा शु (पादत्राण) फेकला. एका राजाचे असे वागणे नक्कीच बरोबर नव्हते.

पण हुशार पंडितजींनी ते पादत्राण आनंदाने घेतले. अन नंतर त्याचा बाजारात चक्क  लिलाव सुरु केला. साहजिकच निझामाचे चप्पल विकत मिळतंय म्हणून अनेकांनी पैसे देण्याचे काबुल केल. ही गोष्ट निझामाला कळल्यानंतर निझामाने स्वतःच नोकराला पाठवून भरपूर किंमत देवून खरेदी केली.

त्याच पैश्याचा नंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी सुरु करण्यात वापर करण्यात आला.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

2,166 total views, 1 views today