दोनजण एकत्र असले तर जोडी, तीन असतील तर तिकडी अन जास्त माणसे एकत्र आली तर घोळका असे आपण म्हणतो. पण जरा जास्तच माणसे एकत्र आली तर जमाव वा मोठा जमाव असेच काहीतर म्हणून आपण वर्णन करतो. परंतु एकाच वेळी एकाच ठिकाणी एक नव्हे, दोन नव्हे तर दहा कोटी माणसे एकत्र आली तर काय म्हणायचे? होय भारतात ठराविक वर्षांनी दहा दहा कोटी माणसे एकत्र येतात. तो जगातील एक सर्वात मोठा सामुहिक उत्सव असतो. जगाच्या पाठीवर कोठेही न साजरा केला जाणारा. जेव्हा हे दहा कोटी श्रद्धाळू एकाच स्पॉटला येतात तेव्हा अंतराळातून त्यांचे जे विहंगम चित्र दिसते ते असेच. दोस्तांनो पुण्याची लोकसंख्या 73 लाख आहे कल्पना करा 13-14 पुणे एकत्र आल्यावर काय होत असेल?? दोस्तांनो आज मी कुंभमेळ्याच्या 5 गोष्टी सांगणार आहे. जगभरातील संशोधक या घटनेकडे अभ्यासाच्या नजरेने बघतात तेव्हा परंपरा, श्रद्धा मानवाच्या जीवनात किती प्रभाव पडू शकतात हे खरोखरच विचार करण्यासारखे.

1. बारा दिवस अन बारा रात्रीचे युध्द :

परंपरा दुर्वास ऋषींच्या शापापासून सुरु झाली असे म्हणतात. दुर्वास ऋषींच्या शापामुळे देवांची शक्ती कमी झाली अन सुरु झाली शक्ती परत मिळवण्यासाठीची धडपड. त्यासाठी समुद्रमंथन करून अमृताचा कुंभ मिळवावा असा सल्ला विष्णूदेवानी दिला. परंतु त्यासाठी देवांना दानवाचीही मदत घ्यावी लागली. क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र हजारो वर्षे घुसळून जेव्हा अमृताचा घडा दृष्टीस आला तेव्हा मात्र त्या अमृतासाठी देव व दानव युध्द करू लागले जे चालले बारा दिवस अन बारा रात्री. पण देवांचे बारा दिवस व रात्री म्हणजे मनुष्याची बारा वर्षे. म्हणूनच कुंभ मेळा दर बारा वर्षांनी साजरा केला जातो.

2. गरुडभरारी अन अमृताचे चार थेंब :

जेव्हा देव अन दानव अमृतासाठी युध्द करू लागले तेव्हा विष्णूदेवाचे वाहन गरुड अमृताचा कुंभ पकडून उडून गेला. परंतु त्याच्या या प्रवासात त्याच्याकडून अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले. ती ठिकाणे म्हणजे प्रयाग (सध्याचे अलाहबाद), उज्जैन, हरिद्वार अन नाशिक. दर तीन वर्षांनी यापैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो कारण येथील नद्या या काळात अमृतासारख्या होतात असे समजले जाते. त्याचमुळे पवित्र दिवशी या नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी कोटी कोटी श्रद्धाळू येतात. याच बरोबर प्रयागला दर 144 वर्षांनी महाकुंभमेळाही भरवला जातो.

3. जगाचे आकर्षण : कुंभ

कुंभ मेळ्याचे आकर्षण फक्त भारतीयानांच असते असे नाही तर इतर देशवासियांनापण असते. राजा हर्षवर्धनच्या काळात म्हणजे सुमारे दीडहजार वर्षांपूर्वी चीनच्या हिएन संग (Hiuen Tsang) ने भारताला भेट दिली होती. त्यावेळीस भारताची लोकसंख्या सहा कोटीपर्यंत होती असे म्हणतात. तर या हिएन संगने आपल्या प्रवासवर्णनात त्यावेळच्या कुंभमेळ्याला 50,00,000 लोक आले होते असे लिहले आहे. अमेरिकेचा प्रसिध्द लेखक मार्क ट्वेनने कुंभमेळ्यात सहभागी होऊन कल्पनेच्या पलीकडे असलेली विश्वासाची शक्ती असे उत्स्फूर्त उद्गार काढले. आजही लाखो परदेशी या मेळ्याला नेमाने जातात.

4. साधूंचे आखाडे अन चढाओढ :

कुस्तीचा जसा अखाडा असतो तसा साधूंचा देखील. आखाडा म्हणजे साधना करण्याचे ठिकाण. संधूच्या एकूण 14 अखाड्यापैकी 11 आखाडे शैव तर तीन आखाडे वैष्णव. नाशिक मधील कुंभास सन 1838 ला शैव व वैष्णव एकाचवेळी त्रिंबकेश्वरला पवित्र स्नानाला जमले असता त्यांच्यामध्ये चढाओढ झाली अन त्याचे रुपांतर वादात झाले. पेशव्यांनी मध्यस्ती करून हा वाद मिटवला अन शैवांनी त्रिंबकेश्वरला तर वैष्णवांनी रामकुंडला स्नान करायचे ठरले. हजारोंनी येणारे हे साधू कुंभमेळ्याचे पावित्र अन आकर्षण वाढवतात.

5. रहस्यमय नागा साधू :

बहुतांशी हिमालयाच्या गुंफामध्ये राहणारे व क्वचितच दर्शन देणारे रहस्यमय साधू म्हणजे नागा साधू. त्याना नाग बाबा असेही म्हणतात. “नाग” म्हणजे विवस्त्र. कडाक्याच्या थंडीतसूद्धा अंगावर एकही कपडा न घालता राहणारे हे साधू संपूर्ण अंगावर भस्म लेपून हातात त्रिशूळ – तलवारी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून आपले लांबलचक केस फैलावून जेव्हा कुंभला येतात तेव्हा वातावरणात एक वेगळाच रंग चढतो. चिलीम ओढणाऱ्या नागांच्या एकेक सवयी त्यांच्या बद्दल रहस्य निर्माण करतात. जगातील कोणत्याच शक्तीची भीती न बाळगणारे हे नाग साधू अतिकठीण त्याचबरोबर विचित्र आसने, करामती करण्याबद्दल प्रसिध्द आहेत. झाडावर उलटे लटकणे, गुप्तांगाला दोरी बांधून अवजड गाडी ओढणे या सारख्या भयंकर कामांना हे नागा सहज अंजाम देतात हे पाहून कोणालाही भय वाटते.

831 total views, 1 views today