अकराशे कोटी … होय अकराशे कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून तयार केलेला “जंगल बुक” हा वॉल्ट डिस्नेचा चित्रपट अॅनिमेशन तंत्राचा अफलातून नमुना होय. चित्रपटातील नील सेठी या बालकलाकाराची या एकमेव सजीव कलाकाराची (बाकीचे सर्व कॉम्प्युटर जनरेटेड निर्जीव कलाकार) फार चर्चा होत असताना या सर्वांचा करता करविता “वॉल्ट डिस्ने” नावाच्या अवलियाबद्दल फारच थोड्या लोकांना माहित आहे. मिकी माउस, डोनाल्ड डक या तुमच्या आमच्या आवडत्या कार्टून्स बरोबरच जगप्रसिध्द “डिस्ने वर्ल्ड” पार्कच्या या निर्मात्याचे नाव चक्क एका लघु ग्रहाला (4017 Disneya) दिले आहे हे खरोखरच अफलातून…

1. मॉर्टीमेरचा मिकी :

धडपड्या आर्टिस्ट वाल्टरने करीअरच्या सुरुवातीस अनेक अपयशे सहन केली. त्याने सुरु केलेली लाफ – ओ – ग्राम नावाची स्टोरीटेलिंग कंपनी फार धंदा करू शकली नाही. असे म्हणतात की 1928 मध्ये घरात विमनस्क अवस्थेत बसला असताना वॉल्टला तेथेच बघितलेल्या उंदराच्या चिमुकल्या पिल्लावरून मिकी माउस हे कॉमिक कार्टून करावे वाटले. दोस्तहो, या कार्टूनचे नाव त्याने “मॉर्टीमेर” असे ठेवले होते पण त्याच्या पत्नीला म्हणजे लिलियनला हे नाव मुळीच आवडले नाही अन “मॉर्टीमेरचा’ चा “मिकी” झाला. वॉल्टने मिकीला नुसता जन्मच दिला नाही तर 1947 पर्यंत त्याला स्वतःचा आवाजही दिला. नंतर शोमधील एका व्हिलन उंदराला नंतर मॉर्टीमेर नाव देण्यात आले. मिकीने जगात नाव कमावले हे तूम्हाला माहितच….

“हर एक कामयाब उंदीर के पिछे एक समझदार औरत होती है” असे म्हणायला हरकत नाही…..

2. वेड्या डिस्नेची सुंदर राजकन्या :

वॉल्टला काहीतरी जागावेगळे करावे असे सतत वाटायचे. त्यातूनच एक पूर्ण लांबीचा कार्टूनपट “स्नो व्हाईट” या नावाने तयार करायच्या मागे तो लागला. डिस्नेने तयार केलेल्या पाच राजकन्येपैकी स्नो व्हाईट ही सर्वात लहान म्हणजे फक्त 14 वर्षाची राजकन्या. जेव्हा डिस्नेने असा चित्रपट तयार करायला सुरुवात केली तेव्हा सारे हॉलीवूड त्याला वेड्यात काढू लागले. कार्टून्सना साथीला घेवून एक अख्खा पिक्चर काढणे म्हणजे त्याकाळी एक वेडेपणाच होता. म्हणूनच कोणी अतरंगी वागू लागले तर त्या वागण्याला “डिस्ने वेडेपणा” या नावाने पुकारण्यापर्यंत लोकांची मजल गेली. पण वॉल्ट खरोखरीच वेडा होता. अगदी कर्ज काढून त्याने हा “स्नो व्हाईट” चित्रपट जगापुढे आणला..

वेड्या डिस्नेच्या या सुंदर राजकन्येने मग जगाला वेड लावले. इतके वेड लावले की 1987 ला हॉलीवूड “वॉक ऑफ द फेम” (ज्यामध्ये फक्त सजीव सेलेब्रिटी स्टार्सचा समावेश होता) “स्नो व्हाईट” सामाविष्ट झाली.

3. सदतीस वर्षात 81 अवार्ड्स :

वॉल्टला जगातील कोणत्याही कलाकाराला मिळाले नसतील इतके अवार्ड्स मिळाले. 1932 ते 1969 या सदतीस वर्षाच्या काळात 22 ऑस्कर, 59 नॉमिनेशन्स मिळवणाऱ्या डिस्नेचे हे जागतिक रेकॉर्ड आहे. मिकीच्या निर्मितीबद्दल, अॅनिमेशन मुव्हीच्या संगीतासाठी…. असे अनेक अवार्ड डिस्नेने मिळवले. याउप्पर “स्नो व्हाईट अँड सेव्हन ड्वार्फ” साठी एक स्पेशल ऑस्कर ज्यामध्ये ऑस्करच्या सात मिनिचर (छोट्या) बाहुल्या सामील होत्या.

4. ट्रेनदिवाना वॉल्ट :

वॉल्टला लहानपणापासून रेल्वेचे आकर्षण होते. त्याचे वडील व काका रेलरोड चे काम करायचे. अन लहानपणी वॉल्ट स्वतः कन्सास रेल्वेस्टेशनवर वर्तमानपत्र व स्नॅक्स विकायचा. कदाचित ह्याचमुळे त्याला रेल्वेचे आकर्षण. काही लोकांच्या मते वॉल्टने “मिकी” हे कॅरक्टर न्यूयॉर्क ते लॉस एंजेलीस या एका रेल्वे प्रवासात तयार केले. असो. रेल्वेच्या या वेडापायी, मोठा माणूस झाल्यावरही वॉल्टने वाफेच्या इंजिनाच्या रेल्वेचे एक लहान (एक अष्टमौंश आकारचे) मॉडेल तयार केले होते. मानसिक तणाव घालवण्यासाठी या खेळातल्या रेल्वेचा त्याला उपयोग व्हायचा. वॉल्ट जेव्हा आणखीन मोठा व फेमस झाला तेव्हा 1950 साली त्याने स्वतःसाठी बंगला घातला तेव्हा त्या बंगल्या भोवती छोते रेल्वेरूळ व त्यावर खरोखर धावणारी मिनीट्रेन करवून घेतली. वॉल्टच्या मनातील स्वच्छंदी बाळ मग वॉल्टला त्या रेल्वेची सफर करायला उद्युक्त करायचे.

5. मृत्यूकाळातील रहस्य :

वयाच्या 65व्या वर्षी वॉल्टला मृत्यूने गाठले. मृत्युपूर्वी त्याने पाहिलेला शेवटचा चित्रपट “जंगल बुक” च (पहिला) होता. 1966 ला मृत्युशय्येवर असताना त्याने एका कागदावर त्याचे शेवटचे शब्द लिहिले. “कर्ट रसेल” (Kurt Russell) हे ते शब्द. कर्ट रसेल हा एक नावाजलेला हिरो. परंतु नंतरच्या काळातला. कारण डिस्नेच्या मृत्यूसमयी तो एक चाईल्ड आर्टिस्टच होता. एका अननोन बाल कलाकाराचे वॉल्टने नाव का लिहिले असावे हे रहस्यच राहिले.

अफवांनी वॉल्ट डिस्नेना मृत्युनंतरही सोडले नाही. त्याच्या मृत शरीराचे क्रायोगेनिक तंत्राने गोठवून ठेवून जतन करण्यात आले आहे जेणेकरून भविष्यातील आधुनिक मेडिसिन्सने त्याचा पुनर्जन्म करण्यात येईल अशी अफवातर अनेक काळ टिकून होती. वॉल्टने कमावलेल्या अमाप पैश्यामुळे लोकाना तसे वाटत होते की खरोखरच कोणाची तरी तशी इच्छा होती…. हे रहस्यच.

752 total views, 4 views today