चहासाठी 240 फुटावरून उडी मारणाऱ्या सायमन बेरी नावाच्या इंग्लंडवासियाबद्दल जेव्हा वाचले तेव्हा चहासाठी इंग्रज काय काय करू शकतात याचा साक्षात्कार झाला. माहिती गोळा करत गेलो अन लक्षात आले की इंग्लंडमधील डॉ. ए. जी. मार्शल नावाच्या कौटुंबिक सल्ला देणाऱ्या डॉक्टरने नवरा बायकोने रात्री मधे मधे चहा घेण्यासाठी बेडमधून बाहेर यावे व परत बेड मध्ये जावे असा सल्ला द्यायला सुरु केले होते. चहाब्रेकमुळे थोडी विश्रांती मिळेल, झोप जाईल अन कामाची इफ़िसिअन्सि वाढेल. वा! काय सुपीक (?) आयडिया …

दोस्तहो, ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय चहाचे वेड ज्या इंग्रजाना लावले अन या वेडापायी इंग्रजांनी काय काय गुण उधळले याची लिस्ट म्हणूनच तयार करायचे मनात आले..

1. चारच्या चहाचा शोध :

संध्याकाळचे चार वाजले की चाहाबाजांना वेध लागतात ते चहाचे. घरोघरी अन ऑफिसो ऑफिसी चहाचा मंद सुगंध दरवळू लागतो अन जमले तर गप्पांचा फड. अनेक गप्पा होतात पण चार वाजताच चहा का पिला जातो याचे उत्तर शोधायच्या फंदात कोणी पडत नाही. दोस्तहो, याचे उत्तर इंग्लंडमधील बेडफोर्ड परगण्यातील तत्कालीन सरदारीण अॅना हिच्या वागण्यात आहे. गोष्ट 1840 सालची आहे. एका संध्याकाळी या अॅनाराणीला जोराची भूक लागली संध्याकाळचे फक्त चारच वाजले होते अन जेवणाला वेळ होता. भुकेल्या अॅनाला काही सुचत नव्हते म्हणून तिने खानसाम्याला थोडा चहा अन पावाचे तुकडे आणायला सांगितले. इतकेच..

पण गोष्ट इतक्यावरच थांबली नाही तर तिने रोज चार वाजता चहा पाव खायला सुरु केले अन मैत्रीणीनाही बोलवायला सुरु केले. ही अॅना राणी व्हिक्टोरियाची खास दोस्त होती. मग काय राणीने देखील “चारचा चहा” सिस्टीम चालू केली.

आज आपण जो चारचा चहा ढोसतो त्याचे मूळ अॅनाच्या पोटातले कावळे होय….

    2. चहाचे चक्क स्मगलिंग :

भारतीय चहाचे वेड इंग्रजाना अठराव्या शतकातच लागले. ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतातून चहा सप्लाय करायचे संपूर्ण हक्क होते. या ब्रिटीश कंपनीला काही दया माया नव्हती. तिने फक्त भारतालाच लुटले नाही तर ब्रिटीशांनादेखील लुटायला सुरु केले. अन इंग्रजाकडून अव्वाच्या सव्वा किंमत वसूल करायला सुरु केली. म्हणतात ना कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. त्यातच सरकारने फायदा मिळतो म्हणून चहावर कर लावायला सुरु केल्यावर मात्र चहावेड्या लोकांनी देशात चोरून चहा आणता येईल का याचा विचार सुरु केला. अन सुरु झाले चहाचे स्मगलिंग. एक वेळ अशी आली की ईस्ट इंडिया कंपनीला बोटीवर कामासाठी खलाशीदेखील मिळायचे बंद झाले कारण त्यांच्या सर्वच खलाश्यांनी चहा स्मगलिंगचा बिझिनेस सुरु केला होता.

3. मृत्यूदाता चहा :

चहाचा अन मृत्यूचा काय संबंध असे काहींना वाटेलही पण हे खरे आहे. म्हणजे चहा जास्त पिवून इंग्लंडमध्ये कोणी मेलं बिलं नाही पण विषारी चहाने मात्र नक्की….

चहाच्या जोरदार स्मगलिंगच्या जमान्यातील ही गोष्ट. भारतातून चहापत्ती इंग्लंड मध्ये नेताना स्मगलर खलाशी ती चहापत्ती ओळखू येवू नये म्हणून इतर मिळेल त्या सटर फटर पानांच्या आत लपवून नेत होते. त्यातलीच काही भारतीय पाने सटर फटर नसून विषारी आहेत हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. म्हणूनच या विषारी पानांच्या संगतीने तयार झालेल्या चहामुळे अनेक इंग्रजांना मृत्युला ओठाशी घ्यावे लागले.

4. थंड इंग्लंडमधील थंड चहा :

इंग्लंड तसा थंड देश. म्हणजे तिथले क्लायमेट थंड असते. लोकसंख्या जेमतेम 6 कोटीच्या आसपास. परंतु गरमगरम वाफाळलेला चहा पिण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही हे मात्र सत्य. कारण दिसाकाठी सुमारे 17 कोटी कप चहा ढोसून इंग्रज पक्के चहाबाज आहेत हे जगाला जाणवून देतात.

याच इंग्रजांनी चहाचे विविध प्रकार शोधून काढले अन “कोल्ड टी” त्यातलेच. थंड इंग्लंडने गार चहा का शोधला त्याचे कारण 1904 उन्हाळा. तो पण अमेरिकेतला उन्हाळा. झाले असे की अमेरिकेतील मिसुरी राज्यात त्यावेळी जागतिक ट्रेड फेअर सुरु होते. इंग्लंडतर्फे टी कमिशनर व पॅव्हेलीयन मॅनेजर रिचर्ड ब्लेचीन्डेन (Richard Blechynden) चहाचे प्रमोशन करण्यासाठी गरम गरम चहा फुकट वाटत होता. परंतु उन्हात गरम चहा प्यायची आईडिया अमेरिकन्सना आवडली नाही. मग काय.. काहीतरी करून अमेरिकन्सच्या गळ्यात चहा उतरवायचाच या हेतूने रिचर्डने काळ्या चहात बर्फाचे काप टाकले अन झाला तयार “कोल्ड चहा”.

5. इंग्रज म्हणजे इंग्रजच… चहासाठी वाट्टेल ते…

दोस्तहो, लिस्टची सुरुवात ज्या सायमनमुळे झाली त्या सायमन नावाच्या इंग्रजाला चहाचे पक्के व्यसन होते. चहाच्या कपात बिस्कीट बुडवून बिस्कीट चहामध्ये गळून पडायच्या आत गप्पदिशी खायला त्याला आवडायचे. एक दिवस त्याने हातात बिस्कीट घेवून, उंचावरून बंगी जंप मारून, खाली ठेवलेल्या चहाच्या कपातील चहामध्ये बिस्कीट बुडवून खायचे ठरवले. 2016 ला गिनीज बुकच्या अधिकाऱ्या समोर 240 फुटावरून पायाला दोरी बांधून खाली ठेवलेल्या चहाकडे यशस्वी झेप घेतली. चहात बुडवलेले बिस्कीट खातखात तो परत वर गेला. त्याचा हा विश्व विक्रम आज गिनीज बुकात आहे. चित्रात उलटा सायमन, हातातील बिस्कीट अन गिनीज अधिकारी दिसत आहेत. जय  हो सायमन बाबा की..

तर दोस्तहो, हे सारे पाहिल्यावर चहाच्या कपात नुसता चहा नसून बरेच काही दडलेले आहे ज्याचा इतिहास चहासारखाच चवदार  आहे हे खरे. हो ना ?

 

675 total views, 3 views today