‘स्क्रीन शॉट’ च्या 5 उपयुक्त गोष्टी

समजा, तुम्ही कॉम्प्युटरवर काम करीत आहात आणि तुमच्या सॉफ्टवेअरनं अचानक एक मोठा तीन-चार ओळींचा एरर मेसेज देत काम थांबवलं तर अशा वेळी तुम्ही काय करता? तुम्ही कॉम्पुटर रिपेअरी करणाऱ्यांना तो एरर मेसेज वाचून दाखविता. मात्र तुम्ही वाचून दाखविलेले एक तर समोरच्याला कळला नाही किंवा तुम्ही एरर मेसेज वाचताना काही तरी गडबड केली तर लोचा होतो. अशा वेळी जर त्या एरर मेसेजचा स्क्रीन शॉट घेऊन जर तुम्ही पाठविला तर तो बघून नेमका कुठे प्रॉब्लेम आहे, हे त्यांना चटकन कळते व सोल्युशन लवकरात निघते. वा रे स्क्रिन शॉट! तर दोस्तहो याच स्क्रीन शॉट म्हणजे स्क्रीनचा घेतलेल्या फोटोबद्दलच्या 5 गोष्टी आज स्मार्ट दोस्तमध्ये आपण पहायच्या आहेत.

1. ऑनलाइन कामासाठी स्क्रिन शॉट :

ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन आयटी रिटर्न अशा अनेक गोष्टी आपण ऑनलाइन करतो. त्यातून एक ट्रान्झॅक्शन नंबर जनरेट होतो. त्याचा स्क्रीन शॉट घेऊन डिजिटल कॉपी ठेवली तर प्रिंटिंगचा खर्च वाचेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेवढीच मदत.

2. स्क्रिन शॉटचा पुरावा :

आजकाल स्मार्टफोनचा जमाना आहे. मोठमोठय़ा पर्चेस ऑर्डर ई-मेलऐवजी फक्त छोटासा एसएमएस किंवा व्हॉटस् अँपवरून देण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. तुम्हाला जर पुरावा म्हणून एसएमएस किंवा व्हॉटस् अँप ठेवायचे असतील तर स्मार्टफोनचा स्क्रीन शॉट घेऊन ठेवू शकता. तुमचा स्मार्टफोन खराब झाला तरी महत्त्वाच्या मेसेज स्क्रीन शॉटच्या रूपानं तुमच्याकडे बॅकअप असतो.

3. कॉम्प्युटरचा स्क्रीन शॉट :

स्क्रीन शॉट अथवा स्क्रीनचा फोटो घेण्यासाठी कुठल्याही कॅमेऱ्याची गरज पडत नाही. काही युक्त्या वापरून तुमच्या डिव्हाईसचा स्क्रीन शॉट घेता येऊ शकतो. कॉम्प्युटरचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील ‘प्रिंट स्क्रीन’ ही की दाबावी. त्यानंतर ‘पेंट’ ओपन करून त्यामध्ये ‘पेस्ट’ करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर त्याला ईमेज म्हणून ‘सेव्ह’ करावं. कॉम्प्युटर स्क्रीनवरील फक्त अँक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास ‘अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन’ दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.

4. ‘अँण्ड्रॉईड’ चा स्क्रीन शॉट :

अँण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम डाऊन आणि पॉवर हे दोन्ही बटण एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो. स्क्रीनशॉट घेतला की तो फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अँपमध्ये सेव्ह होतो.
जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अँण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.

5. स्क्रीन शॉट अँप्स :

जाता जाता हे माहित असुदे की गुगल प्ले स्टोरवर बरेच स्क्रीन शॉट अँप्स उपलब्ध आहेत. की बोर्ड शॉर्टकटऐवजी तुम्ही काही अँप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता. स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी जिंग, अँक्टिव्ह प्रझेंटर (विंडोज) वापरू शकता.

590 total views, 2 views today