भुतांबद्दल अनेकांना भिती तर काहींना भीतीयुक्त आकर्षण. असे म्हणतात की भूतांचा वावर प्राचीन पडक्या वाड्यामध्ये, अंधाऱ्या खोल विहिरीमध्ये तसेच ओसाड ठिकाणी असतो. स्मार्टदोस्तने अशाच ओसाड ठिकाणची यादी बनवली आहे जिथे तुम्हाला भुते सापडण्याची किंवा भुतांच्या तावडीत तुम्ही सापडण्याची शक्यता आहे. ही सारी ठिकाणे भारतातील आहेत. इतिहासातील अनेक स्थितंतरात अनेक लोकांना अक्षरशः आपली घरेदारे, साहित्य मागे ठेवून गाव सोडून पळून जावे लागले. मग कारण परकीयांचे आक्रमण असो वा साथीचे आजार. कालांतराने मनुष्याचा वावर नसल्याने ही ठिकाणे भकास अन अफवांची आगारे बनू लागली. अफवा…. भुतांच्या….
भारतात अशी अनेक ओसाड ठिकाणे आहेत जिथे भुतांच्या असण्याच्या, दिसण्याच्या कहाण्यांमुळे अगदी चिटपाखरूदेखील पहावयास मिळत नाही. जाणवतो फक्त अंगावर काटे आणणारा भूतांचा सहवास….

1. रॉस आयलंड, अंदमान

सुमारे 250 वर्षांपूर्वी परकीयांनी अंदमानवर आक्रमण केले. तिथल्या आदिवासींवर अत्याचार करून त्यांनी काही बेटे आपल्या ताब्यात घेतली. परंतू पुढे काय भयंक गोष्टी वाढून ठेवले आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही अन आले तेव्हा फार उशीर झाला होता. निहत्यां आदिवासिंना घालवून या ब्रिटीशांनी बेटावर घरे, रस्ते, बंकर्स बांधली. परंतू असे म्हणतात की निसर्गाच्या कोपामुळे अत्याचारी ब्रिटीश मृत्यू पावू लागले अन ब्रिटीशांना रॉस बेट 1789 सालीच सोडून पळून जावे लागले. तेथून पुढे जवळ जवळ अर्धा शतक रॉस बेट ओसाड पडून राहिले. बेटावर फक्त सुनसान रस्ते, पडके बँकर्स अन दगडी बांधकामे राहिली. जागतिक युद्धात थोडा काल जापनीज सैनिकांनी तेथे वावर केला.

2. भानघर, राजस्थान

ट्रीप टू भानघर या नावाचा हॉरर चित्रपट ज्या गावावर आधारित होता ते हे राजस्थान मधील अलवार जिल्ह्यातील रहस्यमय खेडे. भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात जास्त झपाटलेले ठिकाण म्हणून भानघर कुप्रसिध्द आहे. आज या गावामध्ये कोणी चीटपाखरुही रहात नाही. सुनसान अशा या पडीक ठिकाणी सूर्य मावळत असताना पासून उगवेपर्यंत तर प्रवाश्यानापण जायला बंदी आहे. या काळात अनेक अतिमानवी शक्ती गावात फिरत असतात असा समज आहे. वाट चुकलेल्या वाटसरूच्या गायब होण्याच्या अनेक कथा भानघरला अधिकच भयानक करतात.

सन 1573 मध्ये वसवलेल्या या गावाचा 1630 पासून ऱ्हास सुरु झाला. त्याची सुरुवात एका गुरुच्या शापामुळे झाली असे म्हणतात. तत्कालीन एका राजाला राजवाडा बांधायचा होता परंतु ते ठिकाण एका गुरुच्या मठाजवळ होते. म्हणून गुरुंनी एक अट घातली. त्यांने राजाला वाडा बांधताना त्याची सावली माठावर पडू देवू नको असे सांगितले. परंतु राजाने त्याचे ऐकले नाही. ज्यादिवशी वाड्याची सावली माठावर पडली त्यादिवसापासून भयंकर खेळ सुरु झाला. गावातील कोणत्याही वास्तूंच्या सावली अंगावर पडताच लोकाना भुताटकीची जाणीव होवू लागली. आज भानघरमध्ये फक्त मोडकी घरे आणि गूढ पडके वाडे आहेत.

3. धनुषकोडी – रामेश्वरम (तामिळनाडू)

रामेश्वरमच्या उत्तरेस 18 किलोमीटरवर असलेले भारताचे टोक. रामेश्वरमवरून धनुषकोडीकडे निघालेली ट्रेन नंबर 653 स्टेशनच्या अगदीजवळ आली होती. बोगीतून दूरवर दिसणारा समुद्र काहीसा विचित्र वागत होता पण रेल्वेतील 110 प्रवासी आणी 5 स्टाफला घरी जायचे वेध लागल्यामुळे काहीच लक्षात आले नाही. घड्याळाचा काटा रात्रीचे 12 वाजत असल्याचे दाखवत होता. अन अचानक समुद्र वर आला. 20 फुटापेक्षा उंच असणाऱ्या भयंकर लाटांनी रेल्वेला खेळणे बनवले अन क्षणात गायब केले. श्रीलंकेस जवळ असणाऱ्या या गावाने 22 डिसेंबर 1964 च्या एकाच रात्री 1800 लोकांचे मृत्यू पाहिले. तेव्हापासून उजाड झालेल्या या गावकडे भीतीमुळे नंतर कोणीच रहायला गेले नाही. आज धनुषकोडीची एक ओळख भूतांचे गाव म्हणून होते.

4. फतेहपुर शिक्री – उत्तरप्रदेश

सन 1569 ला अकबर बादशहाने मुद्दाम वसवलेल्या या गावाने एकेकाळी मुघल साम्राज्याच्या राजधानीचे वैभव पाहिले आहे. सुमारे 177 फुट उंचीचा बुलंद दरवाजा, अनेक सुंदर इमारती, बागा असलेल्या या गावाचे राजधानी असण्याचा सुख फक्त एक दशकच टिकले. सन 1585 ला संपूर्ण तटबंदीने वेढलेले हे गाव अचानकच रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. बादशहा परत कधीच या सुंदर ठिकाणी परतला नाही. बिरबलचे राहण्याचे ठिकाण, जामा मशीद, पाच महाल इ. लक्षणीय वास्तू तश्याच मागे ठेवून सर्वजण निघून गेले. सुमारे 400 वर्षे निर्मनुष्य असल्यामुळे फतेहपूर शिक्रीबद्दल गूढ भीती वाढत गेली. आज ओसाड गावांच्या यादीत या गावाचा समावेश आहे.

5. कुलधरा – राजस्थान

1800 सालापासून ओसाड असणाऱ्या परंतु एकेकाळी प्रगत असणारे राजस्थान मधील कुलधरा हे ठिकाण स्मार्टदोस्तच्या यादीतील शेवटच्या क्रमांकावर. 12 व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवलेले हे गाव व्यापार व प्रगत शेतीसाठी प्रसिद्ध होते. परंतु 600 वर्षे गुण्या गोविंदाने राहिल्यानंतर अचानक कुलाधरा व आजूबाजूची 83 खेडी ओसाड बनली. घरे दारे स्थावर मालमत्ता सोडून सर्व कुलाधरावासी कोठे लुप्त झाली याचे रहस्य आजवर कोणालाच सोडवता आले नाही. काही कथांच्या मते सलीम सिंग नावाच्या तत्कालीन मंत्र्याची नजर कुलधरा मधील एका तरूण मुलीवर पडली. त्याने ती मुलगी स्वतःला मिळावी म्हणून कैक प्रयत्न केले. गावकऱ्यांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न केला. परंतु गावकरी त्या मुलीच्या बाजूनेच राहिले. सलीम सिंगची ताकद फार होती व त्याला लढाईत हरवणे शक्य नव्हते. म्हणूनच त्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी सर्वांनी गाव सोडून जायचा निर्णय घेतला.
कहाणी काही असो पण आज कुलधरा एक निर्मनुष्य ओसाड अन गाव झाले आहे.

4,146 total views, 7 views today