पती पत्नीमध्ये ताण तणाव निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी लाईफमध्ये डोकावतात अन त्यांना सामोरे कसे जायचे हे अनेकवेळा दोघांनाही उमजत नाही. कधी कधी ही कारणे अगदी शुल्लक असतात पण संबंध बिघडवायला पुरेसी असतात. अन संसाराची गाडी घसरायला, घडी बिघडवायला काफी असतात. हीच गाडी परत रुळावर यायला वेळ तर जातोच पण कष्टही भरपूर घ्यायला लागतात. दोस्तहो, संसारात भांड्याला भांडे लागणारच असे अनेकांकडून ऐकले असेलच परंतु थोडे प्रयत्न केल्यास भांड्याचा हा कलकलाट अन भांडणाचा त्रास कमी करता येतो हे नेटवर वाचनात आले अन वाटले शेअर करावे तुमच्याबरोबर..

ह्या टिप्स खास अश्या पतीलोकांसाठी आहेत ज्यांच्या पत्नींची “हाऊस वाईफ” म्हणून ओळख करून दिली जाती. हाउस वाईफ म्हणजे नोकरी करत नसलेल्या सौ. तर जे पती नोकरी करतात त्यांनी नोकरी न करणाऱ्या त्यांच्या पत्नीशी बोलताना कोणत्या 5 गोष्टींची काळजी घ्यावी ते पहा. सुखी आयुष्याची फळे चाखायची असतील तर तुमच्या बोलण्यात चुकुनही करू नका ह्या वाक्यांचा प्रयोग.

1. “निर्णय मी घेणार कारण पैसे मी कमावतो”

बऱ्याच वेळा सौ घरामध्ये सौसौ कामे करत असते हे अनेकांना उमजतच नाही. तिला या कामाचा मोबदला पैश्याच्या रुपात मिळत नाही इतकेच. त्यामुळे “निर्णय मी घेणार कारण पैसे मी कमावतो” या वाक्यापेक्षा जास्त दुखावणारं काहीच नाही. तुमची पत्नी घरी पगार कमवून आणत नसली, तरी त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या दोघांच्या नात्यात ती कधीच काहीच निर्णय घेऊ शकत नाही. कोण घराबाहेर काम करतं आणि कोण घरात, ह्यावर कोणाच्या हाती निर्णय सोपवायचे हे ठरत नाही.

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी लग्न करता, तेव्हा सगळे महत्त्वाचे आणि लहानसहान निर्णय तुम्ही जोड्याने घेतले पाहिजेत – आर्थिक निर्णय सुद्धा.

2. “जर तू काही विकत घेणार असशील, तर तू माझी परवानगी घेतलीच पाहिजेस”

तुमची पत्नी ही काही तुमची नोकरचाकर नव्हे, आणि तुमचं असं बोलणं हे दर्शवतं की कुठेतरी तुम्ही तसं मानता. खूप मोठी खरेदी करण्यापूर्वी पैशाच्या बाबतीत सल्लामसलत करून घ्यायला पत्नीला सांगणं हे एकीकडे, पण तिला जर लंच साठी बाहेर जायचं असेल तर तिला असं वाटता कामा नये की ती तुमच्याकडून पैसे “उधार” घेतेय. याउलट, जर का ती तुमच्याशी अशी वागली असती, तर तुम्हाला तिचं असं अधिकार गाजवणारं वागणं अजिबात आवडलं नसतं.

लक्षात ठेवा, तुमची पत्नी ही तुमची साथीदार आहे. आयुष्यातल्या उतारचढावात तुम्ही एकमेकांना आधार दिला पाहिजे.

3. “मी माझ्या पैशाचं काय करतो किंवा करत नाही हे तुला सांगायची गरज नाही”

तुमच्यामुळे बॅंकेतलं अकाऊंट भरत असेल पण त्यामुळे पैशावर ताबा ठेवायचा संपूर्ण अधिकार फक्त तुमचा होत नाही. कारण तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी, नोकरी करण्यासाठी जे वातावरण, मदत केली असते ते तुमच्या पत्नीनेच. तुम्ही वेळेत नोकरीवर पोहोचावे, जेवणात तुम्हाला घरचे अन्न मिळावे, तुम्ही मिळवलेल्या पैश्याचे एक जोडपं म्हणून निट नियोजन करणे अशी कामे पत्नीने केलीच असतात. त्यामुळे पगाराचे पैसे मिळवण्यात तिचाही हातभार असतो हे विसरायला नको. म्हणून माझे पैसे अन मी त्याचे काहीही करणार अशी बालिश वाक्ये दोघांमध्ये हमखास तणाव पैदा करतात.

4. “घरच्या उत्पन्नाला तूझा काय हातभार?”

भांडणात तुम्हाला राग येणे स्वाभाविकच. म्हणून काय आत माझी सटकली असे म्हणत “घरच्या उत्पन्नाला तूझा काय हातभार?” असले डायलॉग टाकू नका. तुम्हाला कितीही राग आलेला असला, तरी हा प्रश्न तुम्ही पत्नीला अजिबात विचारता कामा नये. तुमची पत्नी तुमच्या फॅमिलीसाठी आणि घरासाठी खूप काही करते. जर तुमच्या फॅमिलीला आर्थिक समस्या सतावत असेल, तर त्याचा दोष तुमच्या पत्नीला देऊ नका. त्याऐवजी वस्तुस्थिती लक्षात घेऊन, फॅमिलीला मदत करण्यासाठी तुम्ही दोघं स्वतःमध्ये काय-काय बदलाव आणू शकता, ह्यावर शांतपणे बसून चर्चा करा.

पत्नीला जास्त त्रास न देता कुटुंबात काटकसर कशी करता येईल किंवा जास्तीचं उत्पन्न कसं मिळवता येईल हे बघा.

5. “माझ्या पैशासाठीच तू माझ्याबरोबर आहेस”

बहुतांशी स्त्रिया घराबाहेर पडून काम करण्यासाठी पूर्णपणे लायक असतात पण त्या घरी राहून कुटुंबाची काळजी घेणं निवडतात. नोकरीधंद्यातून मिळणाऱ्या समाधानाऐवजी त्यांनी मातृत्व आणि घरकामातून मिळणारं समाधान निवडलेलं असतं. कुठल्याही परिस्थितीत “माझ्या पैशाकडे बघूनच   तू माझ्याबरोबर आहेस” हे बोलणं योग्य नाही.

जर तुमच्या पत्नीने तुमच्या कुटुंबासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल, तर प्रत्येक पुरुषाने तिच्या ह्या त्यागाची कदर केली पाहिजे आणि तिच्या घरातल्या कामाची किंमत जाणली पाहिजे.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

1,847 total views, 4 views today