नुकताच जागतिक योगदिन भारतभर साजरा झाला. तसा तो इतर देशातही साजरा झाला पण योगाच्या जननी भारतात जोर जास्तच होता. दिल्लीतील राजपथ त्यादिवशी योगपथ झाला होता. 30000 पेक्षा जास्त लोकांनी एकसाथ हाथ उपर, एकसाथ हाथ नीचे करत करत योगाभ्यास केला. एवढ्या प्रचंड संख्येने व्यायाम करण्याची ही जगातील पहिलीच घटना, त्यामुळे आयोजकांनी गिनीज बुकवाल्यांनाही बोलावणं पाठवल होतं म्हणे. दुसऱ्या दिवशी जागतिक रेकॉर्ड झाल्याचेही जाहीर झाले. तसे आपण भारतीय अनेक रेकॉर्ड्स करतच असतो. उदाहरणादाखल टीव्हीवर क्रिकेट मॅच सुरु असते तेव्हा करोडो भारतीयांचे दोन करोडो डोळे एकसाथ कित्येक तास पिक्चरट्यूबकडे नजर लावून असतात हा विक्रमच.. जोक्स अपार्ट.. भारतीयांनी अनेक जागतिक विक्रम केले आहेत. त्यातलेच पाच अचाट रेकॉर्ड्स आज आपण बघुया. चित्रात केवळ 2 फुट उंचीची नागपूर मधील ज्योती अमगे..

1. जगातील मोठी मिशी :

“मूछे हो तो नथ्थूराम जैसी” असा फेमस डायलॉग अनेकाना आठवत असेल. असाच एक राम – राम सिंग चौहान आपल्या लांबलचक मिश्यांसाठी जगप्रसिद्ध झाला. या साहेबांच्या मिश्या जरा अधिकच लांब आहेत. म्हणजे नाकापासून मोजल्यास दुसरे टोक 9 फुटावर येते. म्हणजे एकूण 18 फुटाची मिशी. एखाद्या दोरीसारखी दिसणारी ही मिशी बहुतेकवेळा गुंडाळूनच ठेवावी लागते. जरा अवघडच काम परंतू जगात भारी काम करायचे तर कष्ट हे होणारच. हो ना?

2. नाकाने टंकलेखन :

नाकाला लागलेल्या मिशीचे जागतिक उदाहरण पाहिलेच. आता नाकाने टंकलेखन. म्हणजे काय रे भाऊ? नाकाने टंकलेखन म्हणजे चक्क नाकाने टाईप रायटरची बटने दाबत टायपिंग. विनोदकुमार चौधरी या भारतीयाने नाकाने टायपिंगचा अचाट विक्रम केला. त्यासाठी त्याने त्याला दिलेली 103 अक्षरे केवळ 46.30 सेकंदात टाईप केली. हा त्याचा विक्रम त्याने 22 डिसेंबर 2014 साली केला. नाकाने कांदे सोलणे, नाक नको तिथे खुपसणे अशी अनेक कामे करणाऱ्यांसाठी हे अनोखे उदाहरण.

3. सांताक्लॉजचा जगातला मोठा घोळका :

जागतिक योगदिना दिवशी भारतात हाजारो योगींचा सामुदायिक योग झाला. ते साहजिकच होते कारण योग हा भारताने जगाला दिलेली मौलिक देणगी आहे. तेव्हा भारतात योगासाठी हजारोंनी योगदान देणे योग्यच. परंतु हाजारो संताक्लॉजनी एकत्र येणे अन ते सुद्धा इंग्लंड अमेरिकेत नव्हे तर भारतात हे काहींना अजब वाटेल परंतु सत्य आहे. दक्षिणेतील थीसूर (Thissur) गावात 2014 साली तब्बल 18112 लोकांनी सांताक्लॉजची वेशभूषा करून एका कार्यक्रमात हजेरी लावली. हा परदेशी संताचा भारतीय जागतिक विक्रम. योगासारखीच सहिष्णुता ही भारताने दिलेली देणगीच.

4. दांडगा डोसा :

आपण भारतीय खाण्या पिण्याचे शौकीन. मसालेदार खाद्य पदार्थात आपला हात कोणी धरू शकत नाही. हा! आता अजिनोमोटो नावाचा चिनी का जापनीज मसाला भारतीयांना चक्रम करतोय ही गोष्ट वेगळी पण मसाल्याच्या बाबतीत आपला नाद नाय करायचा. बरोबर? असुदे येथे गोष्ट चक्रमी मसाल्याची नाही तर एका विक्रमी डोश्याची आहे. अहमदाबाद येथील एका रेस्टॉरंटमध्ये 7 ऑक्टोबर 2013 ला एक भला मोठा डोसा तयार करण्यात आला. प्लेटमध्ये न मावणारा हा डोसा फक्त 53 फुट लांबीचा होता. इतरवेळी इत्तुसा डोसा करायला 15 मिनिटे थांबा असे सांगणाऱ्या रेस्टॉरंट आचाऱ्यांनी जगातला हा दांडगा डोसाही 15 मिनिटातच तयार केला हे विशेष.

5. तासात जास्तीत जास्त मिठ्ठ्या :

संजूबाबा जादूकी झप्पी द्यायचा अन लोकाना बरे करायचा. परंतु 29 सप्टेंबर 2012 ला जयसिंग राविराला यांनी कमालच केली. आंध्र प्रदेशातील टेक्कली ठिकाणी हाजारो लोक एका लाईनमध्ये उभे होते. समोर हे जयसिंग. हात फैलावून. शिटी वाजताच लाईन मधील सदस्य एक एक करून जयसिंग जवळ झेपावू लागले. उद्देश एकच फैलावलेल्या जयसिंगच्या हातात समा जाना. एका तासात 2436 सदस्यांनी अकेल्या जयसिंगला मिठ्ठ्या मारल्या अन झाला एक जागतिक विक्रम. जयसिंगकी जय हो!

493 total views, 1 views today