छोट्या राजमणीच्या हातातील बंदूक बघून महात्मा गांधीनां खूप आश्चर्य वाटले. ब्रम्हदेशातील सोन्याच्या खाणींच्या अतिश्रीमंत मालकाची ही लाडात वाढलेली मुलगी सोन्यात खेळायच्या ऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझादहिंद सेनेमध्ये सामील व्हायची स्वप्ने बघत असेल असे त्यांना त्यावेळी पुसटसेही वाटले नाही. “बंदुकीबरोबर खेळू नकोस” हा गांधीचा सल्ला न मानता भारताच्या स्वातंत्र्यासाठी पुरुषी वेशात इंग्रजाच्याविरुध्द हेरगिरी करून ब्रिटीशांना दमवणाऱ्या या वीर महिलेबद्दल जेव्हा स्मार्टदोस्तने वाचले तेव्हा अशा या धाडशी हेर महिलांबद्दल जगाला कळावे म्हणून हा लेख… स्त्रीयांकडे आकर्षित होणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीचा फायदा हेरगिरीसाठी करणारी “हनी ट्रॅप” माता हरी ते उत्कट देशप्रेमापोटी शानो शौरत डाव पे लगानेवाली सरस्वती राजमणी यामध्ये तुम्हाला भेटतील.

1. माता हरी (1876 -1917)

गुप्तहेर जगताची राणी म्हणून जिची जगाला ओळख झाली ती “माता हरी” (Mata Hari ) जर्मन सेनेकडून काम करायची. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात आपल्या मादक नृत्याने शत्रूसेनेतील अनेक ऑफिसर्सना भुलवून, त्यांच्याशी जवळीक निर्माण करून अत्यंत गौप्यनीय माहित गोळा करण्याचे काम माता हरी नावाच्या या लोभस स्त्रीने केले. फ्रांसचे अनेक उच्च अधिकारी तिच्या आदाकारीवर फिदा झाले होते अन तिला मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. देशाची गुप्त व अत्यंत महत्वाची माहिती माता हरीच्या एका हाकेसरशी अन होकारासाठी देण्यात अधिकाऱ्यामध्ये चढाओढ लागायची. दुर्दैवाने 1917 साली तिला पकडण्यात आले अन भर लोकांच्यात तिला शिक्षा म्हणून गोळ्या मारून ठार मारण्यात आले….

2. अॅना चॅपमन (1982 …)

रशियन ब्युटीज तश्या ब्युटीफूलच. त्यात अॅनासारखी (Anna Chapman) बिनधास्त मद्निकाम्हणजे पुरुषांसाठी डेडली कॉम्बीनेशन. अन याच पुरुषी खूळचटपणाचा फायदा रशियाने अमेरीकेविरुद्ध हेरगिरी करण्यासाठी केला. अॅना तशी साधी सुधी मुलगी नव्हती. 28 वर्षाच्या 5 फूट 8 इंच उंचीच्या या अतीसुंदर मुलीचा बुध्यांकही (IQ) तेवढाच जास्त म्हणजे 162 होता. वडील पॉवरफूल रशियन राजदूत असल्यामुळे हाय प्रोफाईल अमेरिकन्समध्ये तिचे उठणे बसणे. तिच्या या कनेक्शन्सचा उपयोग रशियासाठी हेरगिरी करण्यासाठी करायचा असे जेव्हा तिने ठरवले तेव्हा अमेरिकन गुपिते गुपिते राहिली नाहीत. 2010 मध्ये अमेरिकन्सनां या अॅनाचा शोध लागला परंतु तिच्या डिप्लोमॅट वडिलांच्यामुळे तिच्यावर केस न करता तिला परत रशियाला पटवण्यात आले.

3. नॅन्सी वेक

सुंदरतेचा वापर हेरगिरीसाठी करणाऱ्या वरील दोघी नंतर आत वळूया फायटर हेर महिलांकडे. नॅन्सी वेक (Nancy Wake) या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर. जर्मन नाझी सेनेने 1943 साली जिच्यावर 50 लाख “फ्रँक” इनाम लावले होते, जिने कोणत्याही शस्त्राचा वापर न करता केवळ हाताने अनेक नाझी ऑफिसर्सना यमसदनास पाठवले होते ती नॅन्सी. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोस्त राष्ट्राकडून प्रामुख्याने इंग्लंडकडून हेरगिरी करणाऱ्या नॅन्सीने जर्मन सेनच्या नाकी नऊ आणले होते. नाझींनी तिचे “व्हाईट माउस” असे टोपण नाव पाडले होते. नुसतीच हेरगिरी न करता व्हाईट माउसने व तिच्या साथीदारांनी 1400 नाझीना खात्म केले हे विशेष. युद्धानंतर फ्रान्समध्ये सेटल झालेल्या मूळच्या ऑस्ट्रेलियन विरांगणेस अमेरिकेचा सर्वोच्च “प्रेसिडेंशियल मेडल फॉर फ्रिडम” देण्यात आला.

4. नूर इनायत खान : (1914 – 1944 )

दोस्तहो.. 13 सप्टेंबर 1944.. निरागस चेहरा असलेल्या नूरचा निश्चल देह जर्मन कॉन्सट्रेशन कॅम्पमध्ये प्राण सोडून गेला…. अत्यंत क्रूरपणे नाझींनी तिचा छळ केल्याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. नूर एक भारतीय राजकन्या होत्या. सितार वादनात तज्ञ असलेल्या नूर युध्दकलेतही माहीर होत्या. महायुद्धाच्या काळात नाझीचे मानवतेला काळीमा लावणारे काम पाहून त्यांनी हिटलर विरुध्द काम करायचे ठरवले. आधुनिक जगाची ओळख असल्याने, पॅरीसमध्ये राहून रेडियोवरून गुप्त संदेश इंग्लंडला पाठवण्याचे हेरगिरीचे काम त्यांनी जीवावर जोखीम पत्कारून हाती घेतले. तसे करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्या नूर बेकर झाल्या अन नाझींची खडा न खडा माहिती त्यांनी दोस्त राष्ट्रांना पाठवली. पकडल्या गेल्यानंतर नाझीच्या छळाला त्या शांतपणे सामोऱ्या गेल्या. शेवटपणे त्यांच्या मुखी “स्वातंत्र” हाच शब्द होता. डोक्यामध्ये गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

मरणोत्तर या भारतीय राजकन्येला इंग्लंडच्या जॉर्ज क्रॉसने सम्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर 2012 साली त्यांचा पुतळाही इंग्लंड मध्ये उभा करण्यात आला.

5. सरस्वती राजमणी :

हेर महिलांमधील हे आणखीन एक भारतीय नाव. श्रीमंत घरातील मुलींनी स्वातंत्र चळवळीत सामील होवून तन, मन अन धनही पणाला लावल्याचे हे दुसरे भारतीय उदाहरण. राजकन्या नूर यांनी दोस्तराष्ट्रांसाठी तर राजमती या सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेकडून हेरगिरी करायच्या. पुरुषी वेशात त्या इतर साथीदारांबरोबर हेरगिरीचे काम करायच्या. ब्रिटीश कॉलनीमध्ये घरकाम करायच्या हेतूने जावून त्या माहिती गोळा करायच्या. हे जोखीमेचे काम करत असताना त्यांनी बंदुकीच्या गोळ्या देखील झेलल्या.

सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे महात्मा गांधीनी दहा वर्षाच्या छोट्या राजमणीला शस्त्रांबरोबर खेळू नकोस अन अहिंसेचा मार्ग धर असा सल्ला दिला होता. पण त्यांनी तो मानला नाही. घरातील सर्व दागदागिने चळवळीसाठी त्यांनी अर्पण केले व शस्त्र हाती घेतले. सुभाष चंद्र बोस यांनी त्यांना सरस्वती हे नाव दिले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या सोन्याच्या खाणीच्या मालकिणीला नंतर मात्र भारत विसरला. एका छोट्या टपरीवजा घरात हलाखीचे जीवन जगताना एकेकाळच्या या धनलक्ष्मीला नंतर काही लोकांनी ओळखले व त्यांच्यासाठी सरकारी पेन्शनची सोय झाली… सोयीचे भारतीय राजकारण …

दोस्त हो, नुरना परदेशियांनी दिलेला सन्मान बघितल्यावर राजमणीनां आपण भारतीयांनी काय दिले असा प्रश्न पडतो. त्यांचा चांगला फोटोही मिळवणे स्मार्टला कठीण गेले….

761 total views, 1 views today