जगाचा कुतूहलाचा विषय असणारा “डोळे गरगरवून टाकणारा” आयफेल टॉवर पॅरीसवासियांना नको होता हे वाचले तर तुम्हांला आश्चर्य वाटेल, पण युनिव्हर्सल एक्स्पोझिशन या कलाकृती प्रदर्शनाचा भाग होवू पहाणारा हा टॉवर सुरवातीला शहरात व प्रदर्शनात नसावाच असे अनेकांचे मत होते. 324 मीटर उंचीचे व 10100 टनाचे “गुस्ताव आयफेल” नावाच्या माणसावरून नाव पडलेले हे धूड शहराला विद्रूप करणार असे अनेक फ्रेंच लोकल्सना वाटायचे.

फ्रेंच क्रांतीला सन 1889 ला शंभर वर्षे होत असलेचा योग साधून भरवल्या जाणा-या पॅरीसमधील कलाकृतींच्या प्रदर्शनात मांडण्यासाठी ज्याची निर्मिती केली गेली त्या . 1665 पायऱ्यांच्या टॉवरची ही अनोखी माहिती.

1. काम कोचेलीनचे नाव आयफेलचे :

ज्या मनोऱ्याला वर्षाकाठी 70 लाख लोक भेट देतात, ज्याच्या लिफ्टला वर्षाला “एक लाख तीन हजार” किलोमीटरचा खालीवर प्रवास करावा लागतो, तो मनोरा म्हणजे आयफेल. हे नाव गुस्ताव आयफेल नावाच्या माणसाचे. दोस्तहो.. नाव जरी आयफेलचे असले तरी या मनोऱ्याची कल्पना व डिझाईन मात्र मोरीस कोचेलीनची. त्याने व नंतर स्टीव्हन सोवेस्तर या इंजिनिअराने यावर काम केले. कमाल म्हणजे गुस्ताव आयफेलला ही कल्पना मुळीच आवडली नव्हती. पण कालांतराने टॉवर बनला व नाव आयफेलचे झाले.

2. नकोसा टॉवर :

1884 ला कागदावर व 89 ला प्रत्यक्षात उतरलेल्या या टॉवरबद्दल पॅरीसवासीय सुरुवातीपासून नाखूष होते. पॅरीसवासीयांना हा बांधला जाणारा टॉवर म्हणजे शहराची डोकेदुखी होईल असे वाटू लागले, म्हणूनच 300 कलाकारांनी एक “कमिटी ऑफ थ्री हंड्रेड” व्दारा टॉवरला विरोध दर्शविला. त्यांच्या मते धातूचे हे धुरांडे शहराला कलंक असेल असे होते. त्यानंतर टॉवर फक्त वीस वर्षे ठेवायचा असे ठरले. परंतु त्यांची प्रचंड उंची संदेश दळणवळणाचे ऍटेना म्हणून उपयोगी पडेल असे दिसताच टॉवर पाडायचे रद्द केले गेले. सुमारे 30 कोटी पर्यटकांनी आजवर भेट दिलेला हा टॉवर पॅरीसवासीयांच्या मनी उलटे नरसाळे आणि वाईट स्ट्रिट लॅम्प म्हणूनच अलीकडे पर्यंत ओळखला गेला.

3. व्हिक्टरने भंगार म्हणून विकला चक्क टॉवर :

आयफेल टॉवर फक्त 20 वर्षांसाठी बांधायचे ठरले होते परंतु तो तसाच अनेक वर्षे उभा राहिला. त्याची कंडीशन म्हणावी तितकी चांगली राहिली नव्हती कारण लोकल्सना तो नकोच होता. याचाच फायदा 1925 साली स्कॅमस्टर (आपल्या भाषेत “गेमाड”) व्हिक्टर लस्तिंगने आयफेल चक्क भंगार म्हणून विकला. अन ही करामत त्याने दोनदा केली. त्याने सरकारी अधिकारी असल्याचे भासवून भंगारवाल्यांची गुप्त बैठक घेतली अन “आंद्रे पोईसन” (Andre Poisson) नावाच्या स्क्रॅप ट्रेडरकडून भरमसाठ पैसे उकळले. पैसे घेवून तो व्हीएन्ना देशाला पळून गेला. झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणून आंद्रे तोंड दाबून गप्प बसला. याचाच फायदा घेवून गेमाड व्हिक्टर परत आला अन परत त्याने टॉवरचा पुनःच लिलाव केला…

4. फेल न झालेला देशभक्त आयफेल टॉवर :

पहिल्या महायुद्धात जर्मन फौजांनी फ्रान्सवर आक्रमण केले. शत्रूपासुन मनोऱ्याला वाचवण्यासाठी फ्रांसवासियांनी मनोऱ्याच्या लिफ्टच्या केबल्स तोडून टाकल्या जेणेकरून वर चढता येणार नाही. फ्रांस हरले अन हिटलरच्या फौजांनी फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा त्यांनी विजयाचे प्रतिक म्हणून उंच मनोऱ्यावर स्वस्तिक चिन्हाचा त्यांचा झेंडा मनोऱ्यावर फडकावयचे ठरवले. परंतु वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे क्षणातच तो होत्याचा नव्हता झाला. विशेष म्हणजे या देशभक्त टॉवरने युद्धात जर्मनीचे रेडियो सिग्नल्स, माताहारी या जर्मन हेराचे संदेश पकडून देण्याचे काम फ्रान्सच्याबाजूने केले. नंतर हिटलरने आयफेल तोडून टाकायची ऑर्डर त्याच्या मिलिटरी गव्हर्नर डीट्रीच वोन चोल्तीत्झला (Choltitz) दिली. पण डीट्रीचने तसे करण्यास नकार दिला अन फेल न होता आयफेल उभाच राहिला.

5. टॉवरशी लग्न :

आयफेलने जगाला वेड लावले. 1985 च्या “अ व्हिव टू किल” या बॉन्डपटात टॉवरवर फाईट दाखवली आहे. तसेच बीटल्सच्या “आय एम द वॉलरस” या प्रसिध्द गाण्यात आयफेल आहेच. या टॉवरच्या प्रतिकृती अमेरिकेत लास वेगासला तर चीनमध्ये शेनझेनला लोकाना आकर्षित करतात. फ्रेंच कारमेकर सिट्रॉनने तर 1925 ते 1934 या कालावधीत आपल्या गाड्यांची जाहिरात करण्यासाठी याचा उपयोग केला. अन हो.. जगातील सर्वात मोठे होर्डिंग म्हणून या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद आहे.

अश्या या टॉवरच्या प्रेमात कोणीही पडू शकेल. परंतु 2008 ला एरिका नावाच्या एका युवतीने आपले टॉवरवरील प्रेम पक्के करण्यासाठी या मनोऱ्याबरोबर चक्क लग्नच लावले. लग्नानंतर रजिस्टरमध्ये आपल्या नावाची एन्ट्री “एरिका ला टूर आयफेल” अशी करून तिने धमालच उडवून दिली.

उच्च प्रेम…. का उंच प्रेम ते हेच.

668 total views, 2 views today