फार पूर्वी “अल्बर्ट पिंटो को घुस्सा क्यू आता है” अश्या हटक्या नावाचा पिक्चर आला होता. त्यामध्ये पिंटो (नसरुद्दिन शहा) नावाच्या मनुष्याला लाईफवर जाम घुस्सा आला अन त्याने त्या रागच्या भरात जे काही केले ते दाखवले होते. वेल..लाईफने आपल्याला पाहिजे तसे वागायला पाहिजे असे अनेकांना वाटत असते. काहीकाही जणांना वाईफने तसे वागावे असे वाटत असते… काय होते ते स्मार्टने सांगायला नको. असो. आज आपण वेगळ्याच विषयावर वाचणार आहोत.

दोस्तहो, कपूर खानदानातला चिराग रणबीर अन त्याचा एक आपट चित्रपट रॉकस्टार. तर झाले असे की लव्हनिश कुमार भारद्वाज नावाचा एक साधासुधा प्रेक्षक हे रॉकस्टार प्रकरण बघायला गेला होता. केस बांधलेल्या रणबीरचे चाळे या लाव्ह्नीशला बघवेना झाले अन “आता माझी सटकली” म्हणत बाहेर येवून त्याने सरळ “रणबीर”वर टुकार पिक्चर काढला म्हणून केसच केली. डोके कसे सटकले अन उतारा म्हणून त्याने कोणत्या दावापाण्याचा सहारा घेतला हे त्याने कोर्टाला समजावून सांगायचा प्रयत्न केलाही. पण दिल्लीच्या कोर्टाने त्याचा 50000 रुपयांचा दावा फेटाळला. केस क्लोज.

पण हे बघूनच स्मार्टला अश्या गरम रक्ताच्या लोकांची अन त्यांच्या उलटडोक्याच्या कोर्टकेसेस वर लिहावे वाटले. मग असे दिसले की, असे महाभाग इथेच नाहीत तर जगभरात आहेत. वाचा तर 5 खऱ्या पण विचित्र कोर्ट केसेसची यादी.

1. चोराच्या उलट्या बोंबा :

वॉशिंग्टन सिटी.. सन दो हजार पंधरा.. टोड क्रीकपटरीक नाम का एक नामचीन चोर..जो उसके लंबे बाल और पोनीटेल के वजहसे “फोनी पोनी” नाम से भी अंडरवर्ल्ड मी मशहूर है.. वो बँकमें डाका डालनेकी तयारीमे..पर अचानक पुलीस की वहा पर एन्ट्री.. तयारी नाकाम.

मग काय टोड स्वतःचे पिस्तुल पोलिसावर रोखतो. पण पोलीस उलट फायरिंग करतात. पण टोड जखमी होतो. त्याला पकडून कोर्टात हजार केले जाते. जज्ज शिक्षा देणार इतक्यातच “उलटडोक्याने” काम केले अन टोडने चक्क पोलीसावरच केस केली. कारण काय तर पोलिसांनी पायवर गोळीबार केला अन त्यामुळे जखमा झाल्या. आता पोलिसांनी पैसे द्यावेत.

नुकसान भरपाईची रक्कम किती माहित आहे? फक्त 6.3 मिलियन डॉलर्स. म्हणजे आत्ताच्या भावात 40,59,24,750 रुपये.

भावा हे जरा जास्तच झाले असे वाटले नाही का?

2. माकडाची सेल्फी अन फाटका फोटोग्राफर :

गोष्टीतला हा फटका म्हणजे ब्रिटीश फोटोग्राफर डेव्हिड स्लेटर. हे साहेब इंडोनेशियाच्या जंगला वन्यप्राण्यांचे फोटो काढायला 2011 साली गेले होते. ट्रायपॉडवर कॅमेरा लावलाच नाही तर “मकाऊ” जातीचे एक माकड तेथे आले. कदाचित त्याने डेव्हिड फोटो काढतो ते बघितले असेल. अन म्हणूनच समोर उभे राहून त्याने बटणे दाबायला सुरु केले. मग काय सेल्फीवर सेल्फी. लॉटरी लागली असे वाटून डेव्हिडने ह्या मर्कटलीला प्रिंट करून “माकडाची सेल्फी” म्हणून विकायला सुरु केले. पण दूर तेथे अमेरिकेत “पेटा” या संस्थेने सेल्फी माकडाने काढली आहे म्हणून पैसे माकडालाच मिळायला पाहिजे असा दावा अमेरिकन कोर्टात ठोकला.

या उलटडोक्याच्या दाव्याने झाले असे की डेव्हिडला केस संपेस्तोवर पैसे मिळायचे बंद झाले, त्याउप्पर फोटोवर हक्क मिळावा म्हणून अमेरिकेत वाऱ्या कराव्या लागल्या. एक वेळ अशी आली की या महाशयांकडे जेवणालापण पैसे उरले नाही. लोकांची कुत्री सांभाळून, शेंगा विकून मी पैसे जमा करायचा विचार करतोय असे त्याने एका मुलाखतीत सांगितले. थोडक्यात काय डेव्हिडला माकडाने संपूर्ण फाटका केले. गंमत म्हणजे पैसे द्यायचे तर कुठल्या अन कोणत्या माकडाला द्यायचे या प्रश्नाचे उत्तर कोणीच देवू शकले नाही.

डेव्हिडने फोटोग्राफी सोडली असेल हे काय सांगायला नको.

3. गरम कॉफीने केले डोके गरम :

परत एकदा अमेरिका. आता एन. वाय. सीटी म्हणजे न्यूयॉर्क. मॅथ्यू कोर स्टारबक या प्रसिध्द कॉफीशॉपमधे कॉफी प्यायला जातो. त्याला त्याच्या आवडीचा कॉफीचा कप दिला जातो. पैसेपण घेतले जात नाहीत. हो! पैसे घेतले जात नाहीत. कदाचित मॅथ्यू पोलीस असल्यामुळे असेल. तर हे पोलीस महाशय हातात कप घेवून बसले असतानाच अपघाताने ती कॉफी मांडीवर सांडते अन मांडी गरम होते.

आपण असलो असतो तर लाजून कोणी बघत नाहीना ते बघत बघत ओल्या रुमालाने पॅन्ट पुसायचा प्रयत्न केला असता. आता हा कॉफीचा डाग जाईल का? अन गेला नाहीतर काय? असाही डोक्याला ताप देणारे प्रश्न स्वतःला विचारले असते. पण उलटडोक्याच्या मॅथ्यूने स्टारबकलाच ताप द्यायचा या विचाराने कॉफी गरम का होती? असे विचारात चक्क कोर्टात केस केली. अमेरिकन न्यूज मध्ये यावर फार चर्चा झाली. गरम कॉफी सांडल्यामुळे मनाला धक्का बसला, माझा आत्मविश्वास गेला, माझ्या बायकोने माझ्यामधील पूर्वीचा पती गमावला अशी अनेक कारणे त्याने एबीसी न्यूज वार्ताहारासमोर बरळली. पुढे जावून मला Crohn’s disease या नावाचा आतड्यांचा रोग झाला अन त्यामुळे ऑपरेशन करावे लागले असे सांगत 64,42,55,000 रुपयांची मागणी स्टारबक्स कडून केली. अमेरिकेत पैसे काय झाडाला लागतात काय कोण जाणे.

असो, कॉफीवर मराठी पिक्चर निघू शकतो तर हॉलीवूडमध्ये कोर्ट ड्रामा.

4. चार हजार कोर्ट केसेसचा जोनाथन :

जर तुम्हाला जगातला सर्वात जास्त भांडखोर आदमी कोण याचे उत्तर पाहिजे असेल तर ते उत्तर आहे “जोनाथन ली रिचेस”. हा अमेरिकन नावानेच रिच नाही तर कोर्ट कचेरीच्या अन केसेसच्या बाबतीतही श्रीमंत आहे. म्हणजे त्याने हजारो केसेस कोर्टात दाखल केल्या आहेत. म्हणजे दिसलेल्या अन न पटलेल्या सर्व गोष्टीवर त्याने केसेस करायचा सपाटाच लावला. त्याच्या या केस तुफानात अमेरिकेचे प्रेसिडेंट बुश, अॅपलचे स्टीव्ह जॉब्स, सिंगर ब्रिटनी स्पिअर्स अन अगदी सोमाली “सागरी चाचे” पण आले. मग काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव “जगातील सर्वात भांडखोर” माणूस म्हणून नाव नोंदवले गेले.

गंमत म्हणजे गिनीज बुकला हे महागात पडले कारण जोनाथन महाशयांनी गिनीज बुकवर देखील केस केली. भांडखोर म्हटले म्हणून नव्हे तर केसेसचा नंबर चुकला म्हणून. नुसते गिनीज नव्हे तर ब्रिटानिका बुक अन अनेक पब्लिशर्स त्यामध्ये गोवले गेले. न्यूरिपब्लिक वेबसाईटवर त्याची माहिती आहे. एका न्यूज रिपोर्टरला लोकांचे भले करत असताना केस करून करून त्याचे हात कसे दुखतात, सांधे दुखी कशी झालीय अशी दर्दभारी त्याने बया केली आहे.

त्याग हो तो जोनाथन जैसा.

5. अख्ख्या जगावर केस करणारा पुरीसिमा :

उलटडोक्याच्या कोर्ट केसेसचा बाप (का आई) अशी ही केस. न्यूयॉर्कच्या सिटी बसमध्ये अंतोन पुरीसिमाला जेव्हा एका कुत्र्याने चावले तेव्हा या पठ्याने कुत्र्यावरचे इंजेक्शन तर घेतलेच पण चिडून एक कोर्ट केस केली. आता कोण कशावर किती रुपयांसाठी केस करू शकतो हे वरील उदाहरणावरून पक्केच समजले असेल. पण दोस्तहो, पुरीसिमा त्या सर्व केसेसना पुरून उरला. कारण त्याने जे नुकसान भरपाई मागितली ती तुमचे डोळे, डोकं (जे काही असेल ते) गरगरवून टाकेल. अख्ख्या जगवरची त्याची ही केस. टाईम डॉट कॉम वर ही फिगर आहे.

2,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000. पुरीसिमाने मागितले इतके डॉलर.. हे चाललय काय, ही किती रक्कम आहे अन तिचे रुपयात किती मूल्य होते हे शोधायच्या भानगडीत स्मार्ट पडू शकत नाही. दमलो बाबा हे वाचून. कोण कुणाला चावलाय देव जाणे. एक मात्र नक्की समजतय, दोन वर छत्तीस शून्य आहेत अन ते डॉलरमध्ये इतकेच.. अख्या जगातील त्यावेळची माया..

काय कुत्रे चावले काय असे मराठीत चिडून म्हणतात. कदाचित पुरीसिमामूळेच.

886 total views, 1 views today