दोस्तहो, आजच्या लेखाचे टायटल ठरवताना जरा वेळच गेला. कारण कोणीतरी भारतातील प्रसिध्द ताजमहाल व लाल किल्ला चक्क विकला असेल यावर कधी विश्वासच ठेवणार नाही. अन अश्या फेकू माहितीवर स्मार्ट काहीतरी लिहून फसवायला लागलाय असेच वाटेल. अन अशी ही फेका फेकी वाचत उगाचच का वेळ घालवायचा असे वाटून वाचन थांबवाल. तर दोस्तहो तसे करू नका कारण भारतातील मिथिलेशकुमार श्रीवास्तव ज्याला “नटवरलाल” नावानेही ओळखले गेले त्याने ही किमया केली आहे अन आज त्याच्या 5 सुरस पण सत्य गोष्टी तुम्ही वाचणार आहात.

1. एक माणूस पन्नास रूपे :

पेशाने वकील असणाऱ्या पण नंतर भारतातील सर्वात खतरनाक conman म्हणजे फसवा फसवी मेम्बर म्हणून बदनाम झालेला हा मिथिलेश. नाव तर चांगले पण या एकाच नावाचा जणू या साहेबाना कंटाळा आला असावा. अन म्हणूनच त्याने आपल्या आयुष्यात 50 वेगवेगळ्या लोकांच्या नावाचा वापर केला. नुसती त्यांची नावेच वापरली नाहीत तर त्यांच्या सारख्या वेशभूषा करून तो वावरला. कधी तो राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद व्हायचा तर कधी एखादा बिझिनेसमन तर कधी समाजसेवक. इतकेच नव्हे तर मोठ मोठ्या लोकांच्या सह्या हुबेहूब करण्यात याचा हात कोणीच धरू शकायचे नाही. याच जोरावर त्याने धीरूभाई अंबानी, टाटा अन बिर्ला यांसारख्या बड्या लोकाना फसवले अन स्किमा सांगून पैसे उकळले.

2. एक दोन नव्हे तर तीनदा विकला ताजमहाल :

भारतात लफंग्यांची कमी नाही. नाव नवीन स्कीमा काढून गरीब बिचाऱ्या लोकांचे पैसे घशात घालतात. अश्या घोटाळेबाजापेक्षा “नटवरलाल” (1912-2009) फार पुढारलेला होता. आपल्या भाषेवरील प्रभूत्व, वकिली कावा अन जगातल्या कोणाचीही सही फक्त एकदा बघितल्यावर स्वतः रिपीट करू शकणाऱ्या या नटवरलालने दिल्लीत आलेल्या परदेशी पाहुण्यांना अन देशी धेंडानां सरकारी अधिकारी असल्याचे भासवून ताज महाल विकल्याची केस जेव्हा पोलीसापुढे आली तेव्हा पोलिसांनीच नव्हे तर जगाने डोळे विस्फारले. पण हे असे एकदाच होऊन थांबले नाही तर ताज महाल नंतर नटवरने दोनदा विकला. पोलीस आत ताज महाल केसवर काम करायला लागले हे लक्षात आल्यावर नटवरने लालकिल्ला विकला. मग स्वतः राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद बनून राष्ट्रपती भवन विकले. बनवा बनवी इथेच थांबली नाही तर शेवटी त्याने पार्लमेंट भवन त्यातील 545 खासदारांसहीत विकले.

“सब लोग बीके हुये है..” असे पार्लमेंटकडे पाहून मोर्चेवाले कदाचित त्यामुळेच म्हणत असतील का?

3. पोलीस कस्टडीतून नऊ वेळा पळून जायचे रेकॉर्ड :

स्वतंत्रपूर्व काळात सुरु झालेल्या नटवरलीला स्वातंत्र्यानंतरसुद्धा चालू होत्या. आठ राज्यात शंभराहून अधिक केसेस नटवरलालवर दर्ज झाल्या. नुसत्या दर्जच नव्हे तर पोलिसांनी त्याला नऊ वेळा पकडले. नुसते पकडलेच नाही तर कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली. तीही 113 वर्षे कैदेत कोठडीत बंद रहायची. पण नुसते ठोठवून काय उपयोग शिक्षा भोगायची कैद्याची तयारी तरी पाहिजे. नटवरलालला स्वतःच्या एका रुपात कैद होऊन रहायची सवय नव्हती तरी जेलमेध्ये तरी तो कसा राहील? पठ्ठ्या नऊ वेळाही पोलिसांच्या हातवर तुरी देवून पाळला. सर्वात शेवटी म्हणजे त्याच्या वयाच्या 84व्या वर्षी धड चालताही येत नव्हते अश्या अवस्थेत त्याला पकडले गेले अन उपचारासाठी प्रसिध्द AIIMS दवाखान्यात नेत असताना 24 जून 1996 ला या नटवर आजोबांनी पलायन केले ते कधीही न सापडण्यासाठीच.

4. दोनदा मृत्यू. हेही रेकॉर्डच :

2009 साली एक अजब “नटवरलाल” रेकॉर्ड घडले. नटवरलालवरील सर्व पेंडिंग कोर्ट केसेस रद्द करण्यात याव्यात कारण नटवरलाल इज नो मोअर असे नटवरच्या वकिलांनी कोर्टाला विनंती केली. मिथिलेशकुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल दिनांक 25 जुलै 2009 इहलोक प्रवासाला गेलेत अन अश्या स्वर्गवासी माणसावर केस कशाला? असे म्हणत त्यांनी मृत्यू दाखला कोर्टात सादर केला.

हुश्श..सुटलो एकदाशी असे जज्ज साहेब म्हणत असतील नसतील.. कपाळावरील घाम पुसत असतील नसतील तोवरच “नटवरलाल”चा सख्खा भाऊ कोर्टासमोर आला एक अजब बातमी घावून. त्याच्यामते नटवरलाल 1996 लाच मृत्यू पावला होता. त्याने स्वतः ईन हातोसे.. बॉडीला (चिता) अग्नी दिला असे त्याने जेव्हा कोर्टाला सांगितले तेव्हा कोर्टालाच नव्हे तर अख्ख्या पोलिसदलाला घाम आला.

एका माणसाचा दोनदा मृत्यू घडवून नटवरने हे ही रेकॉर्ड केले.

5. गाववाल्यांच्या रॉबिनहूडचा पुतळा :

जगाला जाता जाता अन गेल्यावरही फसवणारा हा नटवरलाल त्याच्या बिहारमधील बांगारा गावात मात्र रॉबिनहूड होता. गावातील गरीब गरजूना स्वकमाईने (?) कमावलेल्या पैशाने मदत करणारा मिथिलेशच होता. त्यामुळे तो गावात फार फार प्रसिध्द होता. त्याच्या कनवाळू, मदताळू स्वभावामुळे गावात लोकांनी त्याचा पुतळा उभा केला होता. परंतु फसले गेलेल्यात काही ब्रिटीशही होते अन ब्रिटीशांचे राज्य भारतावर होते म्हणून सरकारने तो पुतळा उध्वस्त केला. असो त्यामुळेच कदाचित सरकारवर सूड उगवण्यासाठी नंतर नटवरने स्वातंत्र्यानंतर पार्लमेंटच विकून टाकली.

अश्या या फेकू माणसावर बॉलीवूडने अनेक चित्रपट काढले. बिग बी चा मिस्टर नटवरलाल हा त्यावरच… पण खोटा नटवरलाल. खरा नटवरलाल तो मिथिलेशकुमार श्रीवास्तवच ..

1,501 total views, 2 views today