“जिंदगी ना मिले दुबारा” हा पिक्चर लाखो तरुणांना जाम आवडला. स्मार्टदोस्तलापण. तर होते काय आपली कामगिरी आटपून हे तिघे परत जायला निघतात. कतरिना आपली मागेच पिंकीश कलरचा टी शर्ट घालून. अचानक तिला र्हुतिकची आठवण येते अन एकदम भानावर येऊन ती “कॅन आय बॉरो युवर बाईक” असे कोणाला तर म्हणते अन न विचार करता झूम करून बाईक घेवून तिघांचा पाठलाग करते…. तिला बघून ते गाडी थांबवतात.. ती बाईकवरून उतरते…वा क्या बात है. बाईक चालवत चालवत तिने टी शर्टपण बदललेला असतो. आता ती चॉकलेटी रंगात. तर दोस्त हो आज बॉलीवूड पिक्चरमधील 5 मिस्टेक्स बघायच्या आहेत. माणूस म्हणले की चुका आल्याच. तेव्हा भेजा गरम नाय करायचा.

1. कभी ख़ु क ग तील जन्माआधीचा नोकिया :

सन 1991, अमिताभ बच्चन एक श्रीमंत माणूस. यश रायचंद त्याचे नाव. पिक्चरचे नाव कभी ख़ुशी कभी गम. यशच्या नावातच यश असल्यामुळे त्याला जगातल्या सर्व गोष्टी पाहिजे तेव्हा हातात मिळत असतात. तर या यशला फोनवर बोलायचे असते तेव्हा तो फोनवर बोलतो. चक्क नोकिया काम्युनिकेटर हातात घेवून. कोणी म्हणेल हातात फोन घेवून बोलणे ही काय मिस्टेक? नाही भाऊ ती मिस्टेक नाही तर ज्याफोनवर यश भाऊ बोलताना दाखवले आहे तो नोकिया काम्युनिकेटर तो फोन नोकियाने सन 1997 ला बाजारात आणला. म्हणजे 5-6 वर्षे आधीच यशकडे तो फोन होता. अहो आश्चर्यम…

2. मिल्खाचे काळाच्या पुढचे कारनामे :

तर हा आमचा मिल्खा. लहानपणापासून फार पळतो. सारखे पुढे पुढे जायचे म्हणतो. आता पहाना 1950 साली हा पठ्या गाणी म्हणतो ती कुठली तर “नन्हा मुन्ना राही हु, देश का सिपाही हु, बोलो मेरे संग जयहिंद, जयहिंद” किती छान ना? म्हणजे बघा नन्हा मिल्खा जे गाणे म्हणायला लागलाय ते “सन ऑफ इंडिया” मधले. आत हा सन ऑफ इंडिया सन 1962 मधला. म्हणजे चक्क 12 वर्षे आधीच मुन्नाला हे गाणे माहित. काळाच्या पुढे पळायची मिल्खाची हौस फक्त येथेच थांबत नाही तर मोठा झाल्यावर तो रॉयल एन्फिल्ड बुलेट चालवायला लागतो. ती पण 2012 मॉडेल. म्हणजे किती पुढे पळाला पहा… पळ मिल्खा पळ ….

3. विजेशिवाय उंच टाकीत पाणी :

शोलेमध्ये अमिताभचा यार धर्मेंद्र. तर या धर्मेंद्रला हेमा हवी. आतासारखे डायरेक्ट बोलायचे ते दिवस नव्हते. ना व्हाटस अॅप ना फेसबुक. यार अभीला हेमाच्या घरी मन की बात सांगायला पाठवतो अन स्वतः बिचारा गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून बसतो. बात काय बनत नाही. तेव्हा हा ही मॅन टाकीवरून “गाव वालो… गाव वालो… असे म्हणत उडी मारून जीव द्यायची धमकी देतो. असो. प्रत्येकाची आपापली स्टाईल. पण गंमत म्हणजे जी टाकी अख्या गावाला पाणी पाजत असते त्या टाकीत जमिनीवरून पाणी वर ढकलायला काय अरेंजमेंट केली होती ते कळतच नाही. कोणी म्हणेल त्यात काय, पंप बसवला असेल. पण रामगडमध्ये तर वीजच नव्हती… ? ? ?

4. लगानमधले बॉलचे फिक्सिंग :

अठराव्या शतकात इंग्रजांनी फसवा फसवी करून भारतीयांना भुलवले. ठार संपवले अन राज्य केल. ही झाली खरी गोष्ट. मग आला लगान. काय ठरले तर याच इंग्रजाना त्यांच्याच खेळात हरवायचे अन पिक्चर संपवायचा. हे काम भूवनवर सोपवण्यात आले. त्याने मग खेळ केला अन इंग्रज हरले. हे सर्व तुम्ही पाहिलेच आहे. पण हे लक्षात आले का कोणत्या तरी टीमने चक्क इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलबरोबर का कोणाबरोबर फिक्सिंग करून एका ओवरला फक्त सहाच बॉल टाकायचे असे ठरवले होते. म्हणजे बघा अठराव्या शतकात एका ओवर मध्ये आठ बॉल टाकले जायचे. कौन्सिलचा जन्म त्यानंतर दशकांनी झाला. त्यांनी नियम बदलून सहा बॉलची ओवर केली. पण हा नियम लगानमध्ये आधी पासूनच होता असे म्हणू या का…. यु फिक्सर…

5. डीडीएलजे का न दिखनेवाला दरवाजा :

दिलवाले दुल्हनिया ले जायेगे मधील जगप्रसिध्द सीन. ट्रेन उजवीकडून डावीकडे निघालीय. बोगीमधल्या उजव्या दरवाज्यात राज उभा. एकदम डावीकडून सिमरन पळत येते राजसाठीच. ट्रेन हळू हळू सुरु झालीय. आता काय करायचे. तिला राजपर्यंत जाता येईल का. तिच्या पासून राज उभा असलेला दरवाजा तर लांब आहे. मग काय करायचे?
अरे पण सिमरन तू बोगीचा दुसरा दरवाजा जो अगदी तुझ्या हाताशी आहे त्यातून का चढत नाहीस असे विचारायचा मूर्खपणा कोणी करेल का? म्हणतात ना प्रेमात सर्व माफ असते. बडे बडे देशोमे चुकीची चुकीची बाते होती है.

4,524 total views, 1 views today