दोस्तहो, बर्मुडा ट्रँगल बद्दल लहानपणापासून एक गूढ आकर्षण स्मार्टला आहे. या ठिकाणी घडलेल्या विचित्र घटना, ते बोटींचे, विमानाचे, अन  माणसांचे नाहीसे होणे खरेच असेल का की त्या  मनघडण कहाण्या असतील याबद्दल एक उत्सुकता असायची. त्यातच या बर्मुडा त्रिकोणावर “दी लॉस्ट व्होयाज”, “दी ट्रँगल” असे  एक  दोन नव्हे तर तब्बल 13 हॉलीवूड चित्रपट चित्रित केले गेले अन सतत जगाला या जागेबद्दल जागे ठेवण्यात आले हे सत्य. काय सत्य अन काय असत्य हे समस्त जलाचा “वरुण” देवच जाणेल. असो,  प्लोरिडा आणि  बर्मूडा या भूभागाच्यामध्ये असणा-या कांहीशा त्रिकोणी सागरी प्रदेशाला बर्मूडा ट्रँगल असे म्हणतात हे जाणूया. भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही भयंकर नांव या भागाला आहे हे पण समजूया. अन गेल्या सहा दशकात शेकडोंनी अपघात झालेल्या या बर्मूडा ट्रँगलच्या 5 विचित्र घटना नक्की वाचूया..

१. कोलंबसचा खराब झालेली दिशा दर्शक :

सन 1492 मध्ये प्रसिध्द दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भूतांच्या त्रिकोणातील (बर्मूडा ट्रँगल) आपल्या प्रवासाची नोंद डायरीमध्ये केली आहे. तो म्हणतो की या प्रदेशात कांही गूढ मॅग्नेटीक ओढ आहे. बोटीवरील दिशादर्शक यंत्रे विचित्रपणे वागू लागली आहेत. आणि हो, एक आगीचा लोळ देखील नुकताच समुद्रात पडलेला खलाशांनी पाहिला आहे.

2. शांत, गूढ एकही मनुष्य नसलेले ‘सेलेस्टे’ जहाज :

सन 1872 आणखी एक भयंकर चक्रावणारी घटना समोर आली. नोव्हेंबर 7, जिनीव्हाला जाण्यासाठी ‘मेरी सेलेस्टा’ हे जहाज प्रवासी व खलाशी घेवून निघाले, एक महिन्यांनी बर्मुडा ट्रँगलमध्ये ‘मेरी सेलेस्टा’ इतर जहाजांना दिसली, परंतू एकाही मनुष्याविना. संपूर्ण जहाज त्यावरील साहित्य, मौल्यवान वस्तू अगदी जशाच्या तश्या होत्या. त्या शांत जहाजाला समुद्रात कमी होती ती फक्त मनुष्यांची.सर्वजण अगदी सागरात जणू दडून बसले होते..

3. प्लाईट 19 विमानांचे अचानक नाहिसे होणे :

5 डिसेंबर 1945  ला बर्मूडा ट्रँगलने एकाच वेळी पांच विमानांना गिळंकृत केले. रुटीन ट्रेनिंगला निघालेली तज्ञ पायलटची टीम असणारी पाच ऍव्हेंजर जातीची विमाने दुदैवाने परत येऊ शकली नाहीत. पायलटांचा प्रमुख चार्लस् टेलर, ज्याला त्या भागाची पूर्ण माहिती होती त्याने दिलेला शेवटचा संदेश फारच भयावह होता. तो म्हणतो, ‘सर्व कांही चुकलेले, वेगळे वाटत आहे. समुद्रसूध्दा नेहमीसारखा नाही. अगदी वेगळा,’ पांच विमानांचे अदृश्य होणे कमी होते की काय कारण या विमानांना शोधण्यास गेलेल्या मार्टीन मरीनर या मोठया विमानाचा देखील 23 मिनिटांनी स्फोट झाला. आज अखेर त्या पाच विमानांचा शोध लागलेला नाही.

4. नाहीशी झालेली 12000  टनी यू.एस.एस. सायक्लोप्स :

बर्मूडा ट्रँगलने घेतलेला हा 12000  टनी घास. सुमारे 522 फूटांची प्रचंड ‘सायक्लोप्स’ नांवाची अमेरिकन नौदलाची ही बोट. 8जानेवारी 1918  ला 10000 टन माल व 301 सैनिक घेवून बाल्टीमोरला जाणरी ही बोट अचानक बर्मूडा ट्रँगलला वळल्याची नोंद झाली. खरेतर हे सारे प्लॅन प्रमाणे नव्हते.कारण बर्मूडा ट्रँगल प्रवासातील मार्गात येतच नव्हते. 13 मार्चला जेंव्हा ही प्रचंड बोट कांहीच संदेश देईना तेंव्हा सा-या अमेरिकेने आपली सर्व सैनिकी ताकद लावून शोधमोहिम राबविली, परंतु तोपर्यंत 12000  टनी घास घेवून बर्मूडा गुपचूप बसला होता.

5. अघोरी नावाची विचक्राफ्ट याच :

इंग्रजीमध्ये “witch” म्हणजे चेटकीण. “Witchcraft” म्हणजे जादूटोणा. असो, तर “विचक्राफ्ट’ असे विचित्र नाव असलेली 23 फुटी याचमधून समुद्रात सैरसपाटा करायचा विचार बोटीचा मालक बराक अन एका चर्चचे फादर यांना आला. गोष्ट 22 डिसेंबर 1967 ची. नाताळचे दिवस असल्यामुळे दोघेही आनंदात होते. मियामी किनारा सोडून बोटीला फक्त काहीच मिनिटे झाली होती. अचानक बोट कशाला तरी धडकली असा आवाज झाला. बराकने आजूबाजूला पाहिले, बोटीची सुद्धा पाहणी केली पण काही नुकसान झाल्याचे त्याला दिसले नाही. बराक एक श्रीमंत बिझिनेसमन होता. उगाच धाडस करायला नको म्हणून त्याने लगेचच किनाऱ्यावरील कोस्टगार्डसना संदेश पाठवला. फक्त 19 मिनिटात मदत करणाऱ्या बोटी बराकने सांगितलेल्या ठिकाणी समुद्रात आल्या. फक्त 19 मिनिटात. पण तोपर्यंत बराक, चर्चचे फादर अन “Witchcraft” बोट नाहीशी झाली होती.

कदाचित स्वतः मायाजाल कारणऱ्या बर्म्युडाला बोटीतल्या नावातील “जादूटोणा” पसंत पडला नसेल.

2,250 total views, 3 views today