स्मार्टदोस्तने जेव्हा नुकतेच लिहायला सुरु केले होते तेव्हा त्याने जागतिक विक्रमांबद्दल एक आर्टिकल लिहले होते. त्या आर्टिकलमध्ये जायंट जॉर्ज नावाच्या श्वानाबद्दल माहिती दिली होती. या जॉर्जचा आकार फार मोठा होता. इतका मोठा की हे जॉर्जसाहेब जर दोन पायावर उभे राहिले तर सात फुट तीन इंचपर्यंत त्याचे पाय वर जात होते. म्हणजे साधारण पुरुषांच्यापेक्षा उंच. रेग्युलर उभा राहिला की तीन फुट सात इंच होणाऱ्या जॉर्जबद्दल स्मार्टदोस्तला तेव्हा फार कुतूहल होते. जॉर्जची 2010 च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होती. ग्रेट डेन जातीचे हे धुड 124.5 किलो वजनाचे होते. ग्रेट ग्रेट.
नुकतेच नेट सर्च करत असताना पुन्हा हा जायंट समोर आला अन स्मार्टदोस्तला आकाराने मोठ्ठे झालेल्या प्राण्यांची यादी तयार करावी वाटली. वाचा तर पृथ्वीवरील अगडबंब प्राण्यांची यादी.

1. कॅट मासा (MEKONG CAT FISH) :

म्हणजे बघा हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेला. तुम्हाला मासे खायची हुक्की आली अन तुम्ही वेटरला ऑर्डर दिली की “एक फुल कॅट मासा” लाव. तर कदाचित प्लेटच्या ऐवजी ट्रॉलीमधूनच या रेकॉर्ड मासोबानां घेवून यायला लागेल. जोक्स अपार्ट, पण उत्तर थायलंडमध्ये 2005 साली पकडलेल्या या गोड्या पाण्यातल्या मेकोंग जातीच्या माश्याने चक्क नऊ फुट लांबी गाठली होती. 293 किलोंचा हा मासा नंतर अनेक दिवस अनेकांच्या लक्षात अन पोटात राहिला.

2. लायगर (LIGER) :

मियामी बेट. हर्क्यूलस नावाच्या एका लायगरचे वास्तव्य. लायगर म्हणजे लायन व
टायगर यांचे हायब्रीड बाळ. तर हा हर्क्यूलस जगातला सर्वात मोठा मांजर जातीतला प्राणी ठरला. 408 किलोंचा हा हर्क्यूलस नावाप्रमाणेच ताकतवर तर होताच पण नॉन ओबेस म्हणजे जास्त चरबी नसलेला सुध्रुड सुडौल होता. आता थोडे स्मार्ट ग्यान : जगात हायब्रीड प्राणी तयार करण्याचे प्रयोग फार पूर्वी भारतात देखील केले गेले. जगातला पहिला लायगरचा प्रयोग महाराष्ट्रात कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात यशस्वी झाला होता. त्याचे फोटो तुम्हाला नेटवर मिळतीलच.

3. पाच वर्षांचा पण 900 किलोंचा डुक्कर :

900 किलोंचा का 900 किलोंचे डुक्कर या व्याकरणात गुंतून पडलो. पण सांगायची गोष्ट म्हणजे लाओनिंग प्रांतातल्या शेतकी संस्थेमधील डुक्कर फारच मोठे होते. साडे चौदा सेंटीमीटर लांब सुळे, आडीच मीटर लांबी अन वर सांगितल्या प्रमाणे फक्त 900 किलो वजन. क्या बात है.
अच्छी सेहत का क्या राज है असे जेव्हा डुक्कर मालकाला विचारले तेव्हा आपण फक्त क्वालिटी फूड या डुक्कराला देतो असे त्याने मिडीयाला सांगितले. डुक्कराचे क्वालिटी फूड काय असते ते काय आपणास माहित नाही.

4. चिली नावाचा महाबैल :

एखाद्या छोट्या हत्तीला लाजवेल असा आकार असलेला हा प्रेमळ पण महाबैल स्विडन मधील. अंगावर पांढरे ठिपके असलेल्या हा बैलोबा फक्त हिरवे गवत खावून मोठा झाला आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर या चिलीचे वजन 1 टनापेक्षा होते. अन उंची 6 फुट 6 इंच.

5. नॉडी दी घोडा :

गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या टीना नावाच्या घोडीपेक्षाही एका इंचाने उंच असलेल्या नॉडीने वाढीचे सर्व विक्रम मोडीत काढायचे ठरवले आहे असे दिसते. आता कुठे पाच वर्षांचा झालाय असे म्हणत असतानाच नॉडीने चक्क 81 इंच उंची गाठलीय. पठ्ठयाचे वजन देखील खूप म्हणजे 1300 किलो झालाय. चित्रात नॉडीची अजस्त्रता सहज दिसून येते. केवळ अज्ञाधारक आहे म्हणूनच त्याने गळ्यात दोर बांधून त्याचे टोक किरकोळ मनुष्याच्या हातात दिले आहे. होय ना?

993 total views, 2 views today